आपण गाडी घेऊन बाहेर पडलो की, पार्किंगला जागा मिळेल का? हा प्रश्न प्रत्येकाच्याच समोर असतो, आणि त्याच्या जोडीला हाही प्रश्न असतो की, पार्किंगला जागा मिळाली, तर नंतर गाडी बाहेर काढता येईल का?
आपला टु-व्हीलरवाल्यांचा पार्किंगचा अनुभव साधारण असा असतो –
आपण गाडी घेऊन बॅंकेजवळ, दुकानाजवळ किंवा हॉटेलजवळ थांबतो. गाडी लावायला कुठेच जागा नसते. पुढे जावे का? असा विचार करीत असतो आणि कुणीतरी त्याची गाडी काढताना दिसतो. आपण लगेच आपली गाडी आत घुसवतो आणि कामाला जातो. कधी कधी जागाच मिळत नाही, मग लांब कुठेतरी गल्लीबोळात जाऊन गाडी लावावी लागते. काम झाल्यावर आपण गाडीजवळ येतो आणि आपली गाडी आजूबाजूच्या गाड्यांमध्ये अशी पॅक झालेली असते की, तिरपे-तारपे होऊन कसरत करत गाडी बाहेर काढावी लागते. कधी कधी आपल्या गाडीच्या मागे बाइक आडवी लावलेली असते. अशा वेळेस थांबणे किंवा as off sight conditions कसरत करणे, हाच पर्याय असतो.
फोर-व्हीलरला सहसा पाहिजे तिथे पार्किंग मिळतच नाही. पार्किंग मिळालंच तर समांतर पार्किंगमधून गाडी काढणे मुश्कील असते. मागची गाडी एकदम जवळ असते आणि समोर खेटून बाईक उभ्या असतात.
यावर लोक काय डोकं चालवतील हे आपल्या कल्पनेच्या नक्कीच पलीकडचे आहे.
गेल्या सोमवारी आम्ही नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पड्लो. रस्त्यात शंकराचे मंदिर आहे. शंकर देव फक्त सोमवारीच पावतात असा आपला समज. त्यामुळे इतर दिवशी शुकशुकाट असणाऱ्या या मंदिरात त्या दिवशी झुंबड होती. अशा ठिकाणी टु-व्हीलरपेक्षा फोर-व्हीलरवाले जास्त असतात. या रोडवर समांतर पार्किंगची सोय आहे.
हेही वाचा – फोनवर पुणेरी उत्तरे…
एका गाडीचा मागचा भाग मला एकदमच वेगळा वाटला. कारच्या मागच्या बंपरच्या मागे साधारण तीन फूट लांब स्टॅण्ड होता आणि त्याला कुलूप होते. मी जरा वेळ बघत थांबलो की, हा काय प्रकार आहे? मग लक्षात आले की, मागच्या गाडीला पार्क करताना तेवढे तीन फूट अंतर सोडावेच लागणार.
तेवढ्यात गाडीचे मालक आलेच. त्यांनी आल्या आल्या कुलूप काढले आणि आडवा केलेला स्टॅण्ड गाडीच्या मागच्या भागावर फ़ोल्ड केला. मी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या कल्पनेबद्द्ल त्यांचे अभिनंदन केले. स्टॅण्ड वजनाला एकदम हलका होता. मी स्टॅण्ड फोल्ड – अनफोल्ड करून बघितला. मालक गाडीत बसले. स्टॅन्डमुळे मागे मोकळी जागा होतीच. त्यांनी गाडी मागे घेतली आणि आरामात बाहेर काढली. काही कारच्या मागे सायकल अडकवलेली असते, त्यावरूनच ही कल्पना मालकांना सुचली होती. सकाळी फिरताना मोबाइल जवळ नसतो, त्यामुळे फोटो घेता आला नाही.
अडचण आपली मानली तर, त्यावर मातही करता येतेच, याची प्रचिती आली.
0000
टु-व्हीलरकरिता अशीच पण लय भारी कल्पना अलीकडेच बघण्यात आली –
दोन दिवसांपूर्वी लक्ष्मी रोडलगतच्या रोडवर काही कामानिमित्त गेलो होतो. फूटपाथच्या बाजूला अगदी एकमेकांना चिकटून भरपूर टु-व्हीलर उभ्या होत्या. काहींनी फूट्पाथवर पण गाड्या लावल्या होत्या. लोकांची गाड्या लावण्याची आणि गाड्या काढ्ण्याची कसरत दिसत होती. वयस्कर स्त्री-पुरुषांची दमछाक पण होत होती. या सगळ्या सीनमध्ये एक स्कुटी मात्र लक्ष वेधून घेत होती. गाडीच्या दोन्ही बाजूला एक एक फूट मोकळी जागा होती, गाडीच्या मागे कुणी गाडी लावली नव्हती आणि गाडीच्या सीटवर एक शिकारी कुत्र्यासारखे दिसणारे कुत्रे आरामात बसले होते. बघून पूर्ण कल्पना येत नव्हती. सीटवरच चारही बाजूंनी वाचता येईल, असा बोर्ड ठेवला होता. बोर्ड वाचायला जवळ गेलो, कुत्रे शांत होते. बोर्डवरचा मजकूर असा होता –
“तुमची गाडी या स्कुटरच्या दोन्ही बाजुला फूटभर तरी अंतर सोडून उभी करा. जास्त जवळ गाडी लावलेले टॉमीला आवडत नाही. या गाडीच्या मागे गाडी उभी केलेली, पण याला आवडत नाही. अशा वेळेस तो काय करतो हे अनुभवच सांगू शकेल आणि असा अनुभव घेणे महागात पण पडू शकेल. टॉमी भाड्याने आणला आहे, त्यामुळे याला रॅबीजचे इंजेक्शन दिलेले आहे की, नाही हे माहीत नाही.
Happy Parking.”
मी विचार केला की, गाडीच्या मालकाला भेटून अजून माहिती काढायला पाहिजे. तेवढ्यात एक मोठी बाइक आली आणि या स्कुटीच्या मागे उभी राहिली. कुत्र शांत होतं. आपलाच रस्ता आहे या थाटात, बाइक थांबली होती, तिथेच ती पार्क करण्याकरिता त्यांनी साइड स्टॅंड बाहेर काढला आणि उतरण्याची पोझ घेतली. टॉमीचं डोकं सरकलं आणि त्यानी भुंकण्याचं अस्त्र बाहेर काढलं. सटारणे हा काय प्रकार आहे ते बघायला मिळाले. तो माणूस बाइकचा साइड स्टॅंड वर न करताच बाइक घेऊन पळता झाला…
तेवढ्यात एक मॅडम आल्या. त्यांना बघताच टॉमी सीटवरून खाली उतरला. चान्स बघून मी मॅडमशी संवाद साधला —
मी : मॅडम, तुमची टॉमीची कल्पना नुसतीच भारी नाही तर, लय भारी आहे. भाड्याने टॉमी हा काय प्रकार आहे?
मॅडम : 20 रुपये तासाने याला आणले आहे. आमच्या भागात कुत्र्यांचे डे-केअर सेंटर आहे. एक मॅडम ते सेंटर चालवतात. लोक गावाला जाताना त्यांचे पाळीव कुत्रे त्यांच्याकडे सोडून जातात आणि दिवसभरासाठीही त्यांच्याकडे कुत्रे असतात. त्या मॅडम उत्तम ट्रेनर आहेत. कुत्र्यांना ठेऊन घेणं आणि नीड-बेस ट्रेनिंग देणं अशी कामं त्या करतात. Know the society and human beings at large या ट्रेनिंगच्या शीर्षकाखाली त्या कुत्र्यांना अनोळखी माणसांबरोबर नाममात्र चार्जेस घेऊन बाहेर पाठवतात. आम्हाला गळ्यात हा टॅग लावावा लागतो, ज्याला हा टॉमी ओळखतो. टॉमीमुळे पार्किंगमधून गाडी बाहेर काढणे एकदम सोपे झाले आहे. आता जाताना हा समोर पायाशी उभा राहतो. बाइक असेल तर तो मागच्या सीट्बर बसतो किंवा मागे बसणाऱ्याच्या मांडीवर बसतो.
मी ट्रेनर मॅडमचा फोन नंबर घेतला, मॅडमना बाय केलं आणि टॉमीला बाय केलं.
हेही वाचा – कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…
कुत्री पाळणाऱ्यांची संख्या वाढते आहे… त्या पटीत कुत्र्यांची डे-केअर सेंटर पण वाढतील आणि पार्किंगची समस्या थोडी हलकी करायला लवकरच प्रत्येकाच्याच टु-व्हीलरवर भाड्याचे टॉमी / जिमी / मोती दिसायला लागणार हे निश्चित!
तुमच्याकडे फोर-व्हीलर असेल आणि तुम्हाला जर बाहेर गेल्यानंतर पार्किंगचा प्रॉब्लेम येत असेल, तर मागच्या साइडला फोल्डिंग स्टॅण्ड लावायचा विचार जरूर करा. मला जर ती कार पुन्हा दिसली तर, मी नक्कीच तिचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करीन, सगळ्यांच्या माहितीकरिता!
मंडळी, अडचणीवर मात करायचीच, असं आपण ठरवलं, तर अशक्य असं काहीच नाही… याचा छान आणि मजेशीर अनुभव आला.


