रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, दुधी तसेच गाजर हलवा, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा.
- आंब्याचा रस उरला तर पॅनमध्ये आटवावा. लवकर आटतो. आटवून गोळा करून ठेवावा. मग नारळ परतून आणि मावेल तेवढी पिठीसाखर घालून वड्या पाडाव्यात. या वड्या भरपूर व छान होतात. त्याचप्रमाणे श्रीखंड उरले तरी ते बारीक गॅसवर आटवावे. गोळा होत आला की त्यात थोडे चांगले तूप टाकावे, आणि गार झाल्यावर जेवढी साखर मावेल तेवढी घालावी. वड्या छान होतात आणि भरपूर होतात.
हेही वाचा – Kitchen Tips : बीटचा मठ्ठा, मेथीची कोफ्ताकरी, स्वादिष्ट पन्हे बनविण्याच्या टिप्स
- दुधी हलवा किंवा गाजर हलवा झटपट आणि चांगला होण्यासाठी दुधी/ गाजर किसून ताबडतोब रस काढण्याच्या गाळणीने घट्ट पिळून मंद गॅसवर शिजत ठेवावे. त्यात लगेच चवीएवढी साखर घालावी. (अर्धा किलो दुधीस 100 ग्रॅम खवा, मावा अथवा पेढे मिसळावेत आणि ढवळत राहावे.) दुधीमध्ये साखरेचे पाणी होते आणि त्यातच तो किस शिजतो. गॅसही कमी लागतो आणि हलवा चवदारही लागतो. किसाचा रस मुलांना प्यायला द्यावा, पौष्टिक असतो.
- नारळाच्या वड्या करताना दूध घालून मिश्रण आटवल्यास वड्या व्हायला खूप वेळ आणि गॅस लागतो. त्यासाठी एका नारळाला एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून, कुस्करून मऊ करून घालावा. खव्याची चव हवी असल्यास खवा अथवा साय घालावी. अशी वडी लवकर होते आणि रंग पांढरा शुभ्र होतो. सारण गॅसवरून खाली उतरवल्यावर थोड्या वेळाने वड्या थापण्यापूर्वी
थोडी पिठीसाखर घालावी म्हणजे वड्या चांगल्या होतात.
हेही वाचा – Kitchen Tips : दुधीची कोफ्ता करी, मेथी-पालक पुरी अन् खारी गवार करताना…
- बुंदीचे लाडू लवकर संपत नाहीत आणि शिळे लाडू चांगले लागत नाहीत. अशा वेळी लाडू मोडून दुधात टाकून उकळावे. त्यात अंदाजाने साखर, काजूचे तुकडे वगैरे टाकून खीरीप्रमाणे उकळून घ्यावे. ही बुंदीच्या लाडूंची खीर खूप छान लागते आणि अगदी झटपट तयार होते. तसंही कोणाला जेवायला बोलावलं आणि जास्त वेळ नसेल तर, पटकन करायला सोपं जातं.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


