दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 14 जुलै 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 23 आषाढ शके 1948; तिथि : अमावस्या 15:13; नक्षत्र : पुनर्वसु 24:09;
- योग : व्याघात 11:57; करण : किंस्तुघ्न 25:30;
- सूर्य : मिथुन; चंद्र : मिथुन 18:49; सूर्योदय : 06:07; सूर्यास्त : 19:19;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
दर्श अमावस्या
अमावस्या समाप्ती दुपारी 03:13
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे
टीम अवांतर
ख्यातनाम मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी 14 जुलै 1884 रोजी झाला. मुंबई विद्यापीठाच्या एमए आणि एलएलबी या पदव्या मिळविल्यानंतर यवतामाळ येथे त्यांनी वकिली सुरू केली. 1940 पर्यंत त्यांचा हाच पेशा होता. त्याचबरोबर संशोधनाचे कार्यही सुरू ठेवले होते.
मुंबईस महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि इतिहासाचार्य राजवाडे यांच्या कार्याने देशपांडे प्रभावित झाले होते. त्यामुळे 1926 साली यवतमाळ येथे ‘शारदाश्रम’ नावाची एक संस्था स्थापन करून त्यांनी संशोधन, संग्रहादी कार्यांसाठी सुविधा निर्माण केली. भारतभर संचार करून मठमंदिरांतून संस्कृत-मराठी ग्रंथ, ऐतिहासिक कागदपत्रे, शिलालेख, ताम्रपट, नाणी, मूर्ती, छायाचित्रे अशी ऐतिहासिक संशोधनाची साधने त्यांनी मोठ्या प्रमाणावर जमविली. प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर नवा प्रकाश टाकणारे अनेक शोधनिबंध त्यांनी लिहिले.
हेही वाचा – ज्योतिष, मनोविज्ञान आणि वेदांत
‘शारदाश्रम’तर्फे निघालेल्या शारदाश्रम वार्षिकाचे ते संपादक होते. थिऑसाफिकल सोसायटी आणि प्राच्यविद्यापरिषद यांच्या कार्यातही त्यांनी रस घेतला. 1939 मध्ये झुरिक येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांना लाभला होता. ब्रुसेल्स येथे झालेल्या प्राच्यविद्यापरिषदेलाही ते गेले होते. रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन ह्या संस्थेचे सन्मान्य सदस्यत्व त्यांना देण्यात आले होते.
महानुभाव पंथासंबंधी त्यांनी केलेल्या संशोधन-लेखनाबद्दल त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. महानुभाव वाङ्मयाचा साकल्याने परिचय घडवून आणण्याच्या हेतूने त्यांनी महानुभावीय मराठी वाङ्मय हा ग्रंथ लिहिला. त्यासाठी केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर अगदी पंजाब, पेशावरपर्यंत त्यांनी प्रवास केला. विविध महानुभाव मठांना भेटी देऊन आणि त्या पंथातील अनेक महंतांशी संपर्क साधून माहिती गोळा केली. महानुभावांचे अनेक ग्रंथही पाहिले. श्रीऋद्धिपुरवर्णन, श्री चक्रपाणी-चरित्र, पंडित भीष्माचार्य संकलित निरूक्तशेष यांसारख्या महानुभावीय ग्रंथाचे त्यांनी संपादन केले आहे. विदर्भातील ऐतिहासिक लेखांचा एक संग्रहही त्यांनी संपादित केला आहे. ‘माझी शांती’ ही एक कादंबरीही त्यांनी लिहिली आहे. 20 नोव्हेंबर 1970 रोजी नागपूर येथे त्यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – नशिबाची साथ मिळाल्याने अनेक प्रलंबित कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनमिळाऊ स्वभावामुळे नवीन लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मात्र तुमच्या संभाषणात कठोर शब्द वापरणे टाळणे योग्य ठरेल. कोणताही मोठा निर्णय घेण्याची घाई करू नका. जर तुम्ही कोणाला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल, तर सावधगिरी बाळगा, कारण ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे.
वृषभ – आजचा दिवस अत्यंत व्यग्र राहील. कामाच्या वाढत्या दबावामुळे अधिक धावपळ करावी लागेल. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना तुम्हाला थोडा ताण जाणवू शकतो. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा, कठीण काळात तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील. पोटाच्या कोणत्याही समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.
मिथुन – यशाचा मार्ग चांगल्या नियोजनात आणि संयमात आहे. आज घाईने घेतलेला निर्णय अडचणीत आणू शकतो. भूतकाळातील चुकांमधून शिकणे भविष्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. कठोर परिश्रमापासून दूर पळू नका, कारण तीच तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आधी बजेटचा आढावा घ्या.
कर्क – खर्च नियंत्रणात ठेवणे आज महत्त्वाचे ठरेल. कुटुंबात किरकोळ वाद होऊ शकतात, त्यामुळे वडिलार्जित मालमत्तेबाबत ताठर भूमिका घेऊ नका. एखाद्या नातेवाईकाच्या आगमनाने घरातील वातावरण बदलू शकते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीत शिक्षकांची मोठी मदत मिळेल.
सिंह – आजचा दिवस सुखद आणि समाधानकारक असेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारा आर्थिक प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे भविष्याबद्दलचा तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या सल्ल्यामुळे व्यवसायात नफा होऊ शकतो. काही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो.
कन्या – तुमचे शब्दच तुमची सर्वात मोठी ताकद ठरतील. बोलण्यापूर्वी विचार करा. कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात इतरांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. विरोधक तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुम्ही त्यांना पुरून उराल. आर्थिक परिस्थिती भक्कम राहील, खर्चाची मोठी चिंता राहणार नाही. काही व्यावसायिक योजनांबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. पण परिस्थिती लवकरच सकारात्मक बनेल.
तुळ – धन आणि समृद्धी वाढण्याची आज सकारात्मक चिन्हे आहेत. आरोग्याच्या जुन्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात, त्यामुळे खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. कोणताही मोठा व्यावसायिक करार अंतिम करण्यापूर्वी, सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा; यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल.
वृश्चिक – खर्चावर नियंत्रण ठेवणे आज महत्त्वाचे ठरेल. दिखाऊपणाच्या नादात केलेल्या खर्चामुळे नंतर समस्या निर्माण होऊ शकतात. संभाषणादरम्यान जोडीदार दुखावला जाईल, असे शब्द वापरणे टाळा. कौटुंबिक वाद वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम आणि समजूतदारपणा दाखवा.
हेही वाचा – घराच्या आकाशगंगेतील ग्रह…
धनु – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येत आहे. पैशांचा सुज्ञपणे वापर करणे महत्त्वाचे ठरेल. कौटुंबिक बाबींमध्ये तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. आईवडिलांच्या आशीर्वादाने प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. घरगुती सुविधांवरील खर्च वाढण्याचीही शक्यता आहे.
मकर – आज सकारात्मक उर्जेचे वातावरण असेल. इतरांना मदत करण्याची संधी मिळेल. स्वतःच्या अवाजवी खर्चाच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये तुमची प्रतिष्ठा अधिक मजबूत होऊ शकते. कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. प्रवासाला जाताना सजगतेने वाहन चालवा.
कुंभ – आज सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे. काही लोक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात, अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. कायदेशीर बाबींमुळे तुमचा त्रास वाढू शकतो. कोणत्याही मोठ्या व्यावसायिक भागीदारीच्या करारात प्रवेश करण्यापूर्वी, प्रत्येक पैलूचा काळजीपूर्वक विचार करा. यामुळे भविष्यातील समस्या टाळता येतील.
मीन – आजचा दिवस सर्वसामान्य, पण अनेक लहान लहान, सुखद अनुभवांनी भरलेला असेल. घरासाठी एखादी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता. वडिलांचा सल्ला अत्यंत फायदेशीर ठरेल, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही कौटुंबिक समस्यांमुळे थोडी चिंता वाटू शकते. पण पुढील काही दिवसांमध्ये या समस्याही सुटतील. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. हलका आहार घ्या.


