आषाढ महिना सुरू झाला की, “भेटी लागी जीवा लागलीसे आस…” अशी स्थिती वैष्णवजनांची असते. मन धावू लागते पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलच्या दर्शनासाठी… आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रभरातून दिंड्या निघतात, त्यातील वारकऱ्यांच्या मुखी अखंड ‘ग्यानबा तुकारामा’चा जप आणि विठूरायाची भजनं असतात. या वारीत वर्षानुवर्षे सहभागी होणारे असतात, तसे पहिल्यांदाच वारीचा अनुभव घेणारे असतात. शनिवार, दि. 25 जुलै 2026 रोजी पंढरपुरी चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा जमेल, त्यानिमित्ताने…
लेखनवारी
माऊलींची पालखी निघाली डौलात
कळस हालला वर बघा गगनात
वारीचे गारूड भल्याभल्यांना भुलवते
संसार सोडून म्हातारी वारीत पळते
पाण्याची घागर डोक्यावर वाहते
तेच मस्तकं आज वृंदावन पेलते
थंडी वारा पाऊस सारंच सोसते
सखी बरोबर आनंदाने फुगडी खेळते
हेही वाचा – गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…
हरिपाठ अभंग ओवी भारूड ऐकते
त्यातील तत्व तिच्या जगण्यात दिसते
ठेका धरून टाळ चिपळ्या वाजवते
मुखाने निवृत्ती ज्ञानदेव गजर करते
हेच ऐकायला ती वारीला निघते
काही दिवस सुख दुःख विसरते
विणेकऱ्यांच्या पायी डोई ठेवते
पालखीच्या बैलांना प्रेमाने बघते
रिंगणाचा सोहळा डोळ्यात साठवते
बुक्यासारखी माती कपाळी लावते
वाटते तसे हे चालणे सोपे नसते
संत नामांच्या गजरात वाट सरते
माऊली विठूराया विठ्ठल म्हणते
त्या सावळ्याची सर्वांना मायाच वाटते
जाता जाता पालखी नजरेला दिसते
पादुकांवर ती भक्तीने डोके टेकवते
हेही वाचा – मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा
आता भरून पावले, असे ती सांगते
आयुष्याचे सार्थक झालेसे वाटते
पंढरीस जाता कळसाचे दर्शन घेते
सुखी ठेव सर्वांना आशीर्वाद मागते
वर्षानुवर्षे ही परंपरा चालते
पुण्य असल्यावर वारी घडते
मार्ग विठोबाचा धरा तरच हे साधते
हे जीवनाचे तत्त्वज्ञान वारी शिकवते
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


