अध्याय तेरावा
द्वंद्वाची उखिविखी । सोडूनि वसती एकीं । एकेकातें पोखी । निजगुणें गा ॥147॥ ऐसें न मिळे तयां साजणें । चळे धैर्यें जेणें । तयां नांव म्हणें । धृती मी गा ॥148॥ आणि जीवेंसी पांडवा । या छत्तिसांचा मेळावा । तो हा एथ जाणावा । संघातु पैं गा ॥149॥ एवं छत्तीसही भेद । सांगितले तुज विशद । यया येतुलेयातें प्रसिद्ध । क्षेत्र म्हणिजे ॥150॥ रथांगांचा मेळावा । जेवीं रथु म्हणिजे पांडवा । कां अधोर्ध्व अवेवां । नांव देहो ॥151॥ करीतुरंगसमाजें । सेना नाम निफजे । कां वाक्यें म्हणिजती पुंजे । अक्षरांचे ॥152॥ कां जळधरांचा मेळा । वाच्य होय आभाळा । नाना लोकां सकळां । नाम जग ॥153॥ कां स्नेहसूत्रवन्ही । मेळु एके स्थानीं । धरिजे तो जनीं । दीपु होय ॥154॥ तैसीं छत्तीसही इयें तत्त्वें । मिळती जेणें एकत्वें । तेणें समूहपरत्वें । क्षेत्र म्हणिपे ॥155॥ आणि वाहतेनि भौतिकें । पापपुण्य येथें पिके । म्हणोनि आम्ही कौतुकें । क्षेत्र म्हणों ॥156॥ आणि एकाचेनि मतें । देह म्हणती ययातें । परि असो हें अनंतें । नामें यया ॥157॥ पैं परतत्त्वाअरौतें । आणि स्थावरांता आंतौतें । जें कांहीं होतें जातें । ते क्षेत्रचि हें ॥158॥ परि सुरनरउरगीं । घडत आहे योनिविभागीं । तें गुणकर्मसंगीं । पडिलेंसातें ॥159॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जिये वृत्तीचिया आवडी, बुद्धी होय वेडी
अर्थ
म्हणजे वैराविषयी वादविवाद सोडून एकोप्याने रहातात; इतकेच नव्हे, तर अर्जुना, आपल्या गुणाने एक दुसर्याला पोशीत असतो. ॥147॥ याप्रमाणे ज्यांचे स्वभावत: एकमेकांशी पटत नाही, त्यांची एकमेकांशी मैत्री असणे हे ज्या धैर्याच्या योगाने चालते, त्याचे नाव धृति, असे मी म्हणतो ॥148॥ आणि अर्जुना, वर सांगितलेल्या या पस्तीस तत्वांचा जीवभावाने असणारा समुदाय, हा समुदाय येथे छत्तिसावे संचात नावाचे तत्व जाणावे ॥149॥ याप्रमाणे छत्तीसही प्रकार तुला स्पष्ट सांगितले. या एवढ्यांना क्षेत्र म्हणतात, हे प्रसिद्ध आहे. ॥150॥ चाक, जूं वगैरे रथाच्या भागांच्या समुदायास, अर्जुना, ज्याप्रमाणे रथ म्हणावे, किंवा (शरीराच्या) वरच्या व खालच्या अवयवांस एकत्र मिळून जसे देह हे नाव येते, ॥151॥ हत्ती, घोडे वगैरेंच्या समुदायास जसे सैन्य हे नाव उत्पन्न होते किंवा अक्षरांच्या समुदायांना वाक्ये म्हणतात ॥152॥ अथवा ढगांचा समुदाय, आभाळ या नावाने बोलला जातो अथवा सर्व लोकांस मिळून जग हे नाव येते, ॥153॥ अथवा तेल, वात व अग्नि यांचा एके ठिकाणी संयोग करून ठेवणे, तोच लोकांत दिवा म्हणून प्रसिद्ध होतो, ॥154॥ त्याप्रमाणे ही छत्तीस तत्वे ज्या एकतत्त्वाने जमा होतात, त्या समुदायपरत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते. ॥155॥ लागवडीस आणलेल्या या शरीराच्या योगाने येथे (शरीररूप शेतात) पापपुण्यरूप पीक पिकते, म्हणून आम्ही कौतुकाने ह्या देहाला क्षेत्र असे म्हणतो. ॥156॥ कित्येकांच्या मताने याला देह असे म्हणतात. पण आता हे राहू दे. या क्षेत्राला अनंत नावे आहेत. ॥157॥ परंतु परब्रह्माच्या अलीकडे व स्थावराअखेरपर्यंत धरून त्या दोहोंच्या दरम्यान जे जे काही उत्पन्न होते व नाहीसे होते, ते सर्व क्षेत्रच होय. ॥158॥ परंतु गुण व कर्म यांच्या संगतीत सापडले असता देव, मनुष्य, सर्प वगैरे जातींच्या वेगवेगळेपणाने या क्षेत्राची रचना होते. ॥159॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नाना भ्रामकाचें सन्निधान, लोहो करी सचेतन


