नंदा खरे लिखित ‘उद्या’ ही भविष्यकाळाचा वेध घेणारी विलक्षण कादंबरी आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आल्यापासून जगभरात अनिश्चिततेच वातावरण आहे – नोकऱ्यांचे स्वरूप काय असेल? नोकर्या मिळतील की नाही? इथपासून हुकूमशाही येईल… इथपर्यंत. माणसाचे अस्तित्व धोक्यात आहे, ही भीती आहेच. भविष्यात मानव जातीपुढे काय वाढून ठेवले आहे? हे दाखवणाऱ्या या कादंबरीला 2020मध्ये साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. कादंबरी Dystopia (अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतला समाज) प्रकारात येते.
‘सबव्हर्जन सर्व्हेलंस प्रोग्राम्स’ हे शब्द पहिल्याच पानावर, खरं तर अर्ध्या पानावर वाचायला मिळतात आणि आपल्या भुवया उंचावतात. ‘समजायला कठीण वाटतंय’, असं वाटत असताना ‘तरी कळून घ्यायलाच हवं’ हा विचार मनात येतो. अनेक इंग्रजी वाक्ये आणि शब्द देवनागरीत लिहिलेली असल्याने थोडे अडखळायला होते, वाचनाचा वेग मंदावतो. पण ती विषयाची गरज आहे. त्या शब्दांचे मराठी भाषांतर बोजड होईल.
सर्व भारतीयांना आधारकार्ड बनवणे सक्तीचे झाले, त्यावेळी डाव्या विचारसरणीने विरोध केला. कादंबरीची सुरवात सुदीपचे अस्तित्व कार्ड हरवते, इथपासून होते. ‘अस्तित्व’ आधारसारखे कार्ड आहे. सुदीप ज्या काळात राहतोय, त्या काळात अस्तित्व कार्ड हीच त्याची ओळख आहे. थोडक्यात आता तो माणूस नाही तर, कार्डवरचा नंबर आहे. त्याला साधे पाणी मिळणे कठीण होते, झोपायला जागा मिळत नाही…
सुदीप हा वर्तमानपत्रात काम करणारा अनुवादक असतो. त्याच्या कुटुंबात फक्त एक धाकटी बहीण उरलेली असते, जिच्याशी त्याचा फारसा संबंध नसतो. तिच्यावर संकट कोसळल्यावर तो गावी तिच्याकडे जाऊन राहतो. शेती पाहायला लागतो. शहरासारखीच गावातली स्थिती सुद्धा भीषण असते.
हेही वाचा – करुणाष्टक… आई गेल्यावर बरंच काही जातं!
अरुण आणि अनू हे जोडपे. अरुण सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट असून एक्सप्रेशन रेकग्निशन प्रोग्रॅम्स बनवत असतो म्हणजे चेहऱ्यावर उमटलेल्या भावनांना, विचारांना ओळखण्याचा प्रोग्रॅम! अनू प्रशासनिक सेवेत असते. नक्षलवादी भागात अरूणचे पोस्टिंग झाले आहे. केंद्र सरकार, सुरक्षा संस्था, स्थानिक राजकीय पक्ष यांचे संबंध, सततचे वादविवाद सुरू आहेत. दोघांना परदेशी कंपनीकडून जॉबची ऑफर येते. नोकरी स्वीकारल्यावर दोघांनाही आपण विचित्र सापळ्यात अडकल्याची जाणीव होते. त्यांचा मुलगा बुद्धिमान असूनही प्रशासनिक सेवेत प्रथम श्रेणीत त्याला प्रवेश मिळणार नाही, हे त्याला माहीत असते.
आश्लेषा वाघेला विद्वान असून त्यांचे भाषांवर प्रभूत्व असते आणि भाषेमुळे माणूस सुसंस्कृत होतो, असे त्यांना वाटत असते. मोठ्या पदांवरच्या लोकांना त्या माहितीचे, ज्ञानाचे, विचार पुरवून सुसंस्कृत वाटायला मदत करतात. गगन या अर्थशास्त्र्यासाठी त्या हे काम करतात. त्या गांभीर्याने विनोद करतात! मेळघाटात वाघ आणि कुपोषण या दोन समस्या होत्या .कुपोषण संपले कारण माणसे संपली, असे त्या एक सूरात निर्विकारपणे सांगतात.
औषध कंपन्या संशोधन विकत घेतात. देऊ केलेली रक्कम संशोधकाने स्वीकारली तर ठीक नाहीतर, चोरी करून किंवा त्याला मारून जे हवे ते मिळवतात. तंत्रज्ञान संपत्ती मिळवून देते, संपत्ती निर्मिती करते… पण संपत्ती संशोधकाला मिळत नाही तर व्यापार्याला मिळते. लेखक लिहितात commercial exploiter not creater लेखकाने antitrust सिनेमाचा दाखला देऊन पटवून द्यायचा प्रयत्न केला आहे की, इतरांची संशोधने हडपून काबीज करून व्यावसायिक वापरात आणणाऱ्या लोकांचा जमाना आहे.
सानिका धुरू नावाची तरुण पत्रकार मुलगी पनिशमेंट पोस्टिंगवर चारगाव या दुर्गम भागात जाते. तिथे ती रोजनिशी लिहिते. चारगाव हे नागेपल्ली, तांबेवाडा, आतमपल्ली आणि देवठान या चार गावांचे मिळून असलेले ठिकाण जे स्वयंपूर्ण आहे. केवळ चार हजार लोकसंख्या आहे. बाहेरच्या लोकांवर ते फक्त व्यापारासाठी आणि शैक्षणिक संस्थांसाठी अवलंबून आहेत. ते लोक सानिकाकडे ‘शेती न करणाऱ्या लोकांतून आलेली’ अशा नजरेने पाहतात. दुर्गम प्रदेश असूनही संगणकावरून माहिती काढून हे लोक शिकले आहेत. जगाला धक्काही न लावणारे हे सरळमार्गी लोक जीवघेण्या स्पर्धेचा बळी ठरतात.
नितीन गरिबीतून वर आलेला, आयआयटीतून शिकून आलेला मुलगा गावाचा विकास करण्यासाठी गावातच राहतो. तो त्याच्या आवडत्या शिक्षकांना, भाकरे सरांना, म्हणतो की, तुम्ही मला सगळे शिकवलेत, पण मूल्य ओळखायला शिकवले नाहीत. मोठ्या कंपनीची फ्रेन्चाईझी घेतो, पण त्यांच्या नफाखोरीमुळे तो निराश होतो. भरोसा आणि विकास हे दोनच उद्योगसमूह बव्हंशी उद्योग चालवतात. अब्जावधी लोकसंख्या असलेल्या जगावर मूठभर लोक सत्ता गाजवतात. मोठी मानाची, सत्तेची पदे हेच लोक आलटून पालटून पटकावतात.
हेही वाचा – वेगवेगळया पातळ्यांवर लढणारी ‘केतकर वहिनी’
जीव वाचवण्यासाठी महिकादलासारख्या गुंड लोकांच्या संघटनेशी सलोखा करावा लागतो. मुले आणि मुली यांच्या संख्येत मोठा फरक पडलेला असतो. त्यामुळे लग्न करायला मुली मिळत नाहीत. श्रीमंत लोक मुली मिळवतात. मुली पुरवण्याचा उद्योग जोमाने चालू लागतो.
जिथे खनिजे सापडतात तो प्रांत पारतंत्र्यात जातो किंवा सहज श्रीमंत होतो. लेखक ‘संसाधनांचा शाप’ असे म्हणतात. ताजमहालच्या खाली असे काही मूल्यवान मिळाले तर… असाही प्रश्न विचारतात.
कॉन्स्टंट व्हिजिलंस इज द प्राईस ऑफ फ्रीडम. The rich get reacher and the poor get children… अशी अंगावर येणारी वाक्य मधे मधे येतात. सर्व्हिलियंसच्या काळात असूनही, इतके जागोजागी कॅमेरे असूनही खुनी पकडला जात नाही. लेखक केवायसीला तंबूतला उंट म्हणतात.
निसर्गाला ओरबाडून जगणारे लोक आणि चारगावासारखे निसर्गाची हानी न करता जगणारे लोक दोघांसाठी त्याच यातना आहेत.त्यांच्यात असलेला संघर्ष लेखकाने दाखवला असला तरी सर्वांचा शेवट सारखाच होणार आहे. सत्तालोलुपता आणि नफाखोरी यांच्या पाठी धावणाऱ्या जगात इतर मूल्यांना स्थान नाही.
कथानकाची गुंफण गुंतवून ठेवते. लेखकाचा जगण्याचा अनुभव आणि व्यासंग दिसत राहतो. वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक स्तरातील लोकांची मानसिकता त्यांनी समजून घेतली आहे… भाषा आणि संस्कृती सुद्धा!
ही कादंबरी समजायला अवघड वाटते. देवनागरी लिपीतून लिहिलेले इंग्रजी वाचायची सवय नसल्याने काही वेळा रसभंग होतो. संदर्भ मुद्दाम लक्षात ठेवावे लागतात. लेखकाने भविष्याचा, ‘उद्या’चा आरसा दाखवला आहे, हे खरे पण कुठेच आशेचा किरण दिसत नाही. “उम्मीद पे तो दुनिया कायम है!’ कादंबरी वाचून झाल्यावर निराशा दाटते…
अशा Distopian धाटणीच्या कादंबऱ्या अभावानेच वाचायला मिळतात. मराठीत तर अगदीच कमी आहेत. ही पुरस्कार प्राप्त कादंबरी वाचायला हवी.


