अध्याय तेरावा
आत्मरूप गणेशु केलिया स्मरण । सकळ विद्यांचें अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूचे ॥1॥ जयांचेनि आठवें । शब्दसृष्टि आंगवे । सारस्वत आघवें । जिव्हेसि ये ॥2॥ वक्तृत्व गोडपणें । अमृतातें पारु म्हणे । रस होती वोळगणें । अक्षरांसी ॥3॥ भावाचें अवतरण । अवतरविती खूण । हाता चढे संपूर्ण । तत्त्वभेदें ॥4॥ श्रीगुरूचे पाय । जैं हृदय गिंवसूनि ठाय । तैं येवढें भाग्य होय । उन्मेपासी ॥5॥ ते नमस्कारूनि आतां । जो पितामहाचा पिता । लक्ष्मीयेचा भर्ता । ऐसें म्हणे ॥6॥
श्रीभगवानुवाच :- इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते । एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥1॥
पार्था परिसिजे । देह हें क्षेत्र म्हणिजे । हेंचि जाणे तो बोलिजे । क्षेत्रज्ञु एथें ॥7॥
क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत । क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम ॥2॥
तरि क्षेत्रज्ञु जो एथें । तो मीचि जाण निरुतें । जो सर्व क्षेत्रांतें । संगोपोनि असे ॥8॥ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें । जाणणें जें निरुतें । ज्ञान ऐसें तयातें । मानूं आम्ही ॥9॥
तत् क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारि यतश्च यत् । स च यो यत्प्रभावश्च तत् समासेन मे शृणु ॥3॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन
अर्थ
सर्व विद्यांचे अश्रयस्थान जे आत्मरूप गणेशाचे स्मरण तेच श्रीगुरूचे श्रीचरण होत. त्यांस नमस्कार करू ॥1॥ ज्या श्रीगुरूंचरणांच्या स्मरणाने शब्दसृष्टि स्वाधीन होते (म्हणजे शब्दमात्रावर प्रभुत्व येऊन, मनात स्फुरणारे विचार योग्य शब्दांनी स्पष्ट सांगण्याचे सामर्थ्य येते) व सकल विद्या जिव्हेवर येतात ॥2॥ वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे सर, असे म्हणते व नवरस हे (वक्तृत्वातील) शब्दांची सेवा करतात ॥3॥ निरनिराळ्या तत्त्वांतील फरक दाखवून अभिप्रायाची स्पष्टता करणारी जी मार्मिक खूण ती सर्वच्या सर्व आपल्या स्वाधीन होते ॥4॥ जेव्हा हृदय श्रीगुरूचे पाय धरून राहते, तेव्हा ज्ञानाला एवढे दैव प्राप्त होते ॥5॥ त्या श्रीगुरूच्या चरणांना आता नमस्कार करून (मी, ज्ञानेश्वर, ग्रंथ सांगणे पुढे चालू करतो) तो ब्रह्मदेवाचा वडील व लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण असे म्हणाला ॥6॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे कौंतेया, या शरीराला शरीराला क्षेत्र असे म्हणतात (आणि) जो हे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे त्यांस जाणणारे लोक म्हणतात ॥1॥
अर्जुना ऐक. या देहाला क्षेत्र म्हणावे व या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला येथे क्षेत्रज्ञ म्हणावे. ॥7॥
हे भरतकुलोत्पन्ना, आणि सर्व क्षेत्रांच्या ठिकाणी जो क्षेत्रज्ञ, तो सुद्धा मी आहे असे जाण. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे (वेगळीकपणाचे) जे ज्ञान, ते (यथार्थ) ज्ञान आहे, असे माझे मत आहे ॥2॥
तरी सर्व क्षेत्रांना पालन करून असतो असा जो क्षेत्रज्ञ तो येथे मी आहे हे पक्के समज ॥8॥ क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे त्याला ज्ञान असे आम्ही समजतो ॥9॥
ते क्षेत्र कोणते, कोणत्या प्रकारचे, कोणत्या विकारांनी युक्त आणि त्यापासून कोणते कार्य उत्पन्न होते आणि तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव कोणता, हे माझ्यापासून संक्षेपाने श्रवण कर ॥3॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जो भक्तजनवत्सलु, प्रेमळजनप्रांजलु


