माझा रोजचा कार्यक्रम म्हणजे सकाळी सात वाजता चहा घेत घेत पेपरचं वाचन सुरू करायचं. नऊ वाजता बायको गरमागरम चविष्ट ब्रेकफास्ट समोर सादर करते, तेव्हाच पेपर बाजूला करायचा… आज असाच पेपर वाचत होतो आणि नऊ वाजता बायकोनी डिशमध्ये चुरमुरे माझ्यापुढे ठेवले. मी विचारलं की, “ही स्टार्टर डिश आहे का?”
बायको म्हणाली, “आजपासून हीच मेन कोर्सची ब्रेकफास्ट डिश राहणार आहे… काल फेसबुकवर एक डाएटिशियनची ऑनलाइन कन्सल्टेशनची जाहिरात होती. फक्त पाचशे रुपये चार्ज होता! मी पाचशे रुपये भरले आणि त्यांना मी फोन करून विचारलं – जो माणूस दिवसभर पेपरमध्ये आणि मोबाइलमध्ये असतो… फिरणे शून्य, व्यायाम शून्य… त्याचे डाएट काय असावं उत्तम तब्येती करता?
डाएटिशियनने दिवसभराच्या खाण्यापिण्याबद्दल काही प्रश्न विचारले, वजन किती आहे, वगैरे असे जुजबी प्रश्नही विचारले. त्यांनी सांगितले, सकाळचे आणि रात्रीचे जेवण आहे तसेच सुरू ठेवा. सकाळचा ब्रेकफास्ट आणि संध्याकाळचे खाणे यात फक्त साधे चुरमुरेच देत जा. जेवढे खातील तेवढे चुरमुरे खाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. बाकी आहे ते रूटिन सुरू ठेवा. त्यांची तब्येत एकदम मस्त राहील. काहीही वाटलं तर, फोन करा. पुढे कन्सल्टेशन फ्री असणार आहे…”
घरात बायकोने ठरवलं म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आता ही रेघ कशी पुसावी, हाच प्रश्न आहे. नवीन शेड्युलप्रमाणे आज पण माझे सकाळचे पेपर वाचन आणि चुरमुऱ्याचा नाश्ता हे सुरू होते. तेव्हाच एक अननोन नंबरवरून फोन आला –
“मी छाया बोलतेय.”
(छाया या नावाची माझी एक मैत्रीण आहे. म्हणून मी एकदम म्हणणार होतो – ‘हं, बोल छाया, काय म्हणतेय, आज एकदम सकाळी सकाळी आठवण कशी काय? आज व्हॅलेंटाइन डे आहे असं चुकून वाटलं की काय!’ वगैरे वगैरे… आणि नंतर लक्षात आलं की, हा आवाज जरा वेगळा वाटतोय, म्हणजे छाया दुसरी दिसतेय!)
हेही वाचा – कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…
मी : नमस्कार नमस्कार, काय म्हणताय?
छाया : तुमचं पोट कसं आहे? पोट फुगणे किंवा दुखणं असं काही त्रास नाही ना?
(मला काही लिंक लागेना, या मॅडम एकदम माझ्या पोटावर का आल्या, हे समजेना!)
मी : माझं पोट छानच आहे. पोट फुगणे किंवा दुखणं असा काहीही त्रास नाही. तुमचा राँग नंबर लागलेला नाही ना? कारण माझ्याच नावाचे अजून सात-आठ जण आहेत. त्यापैकी तुमच्या ओळखीच्या कुणाला पोटाचा त्रास आहे आणि तुम्हाला त्यांची चौकशी करायची आहे…
छाया : सॉरी सॉरी, माझं नेहमी असंच होतं. आधी थोडी बॅकग्राऊंड सांगून मग पुढचं बोलायचं, हे मी नेहमीच विसरते आणि एकदम पुढचं बोलायला लागते. सवय जात नाही, असे म्हणतात ना, तोच प्रकार आहे… सॉरी!
फोन तुम्हालाच मी केला आहे. मध्यंतरी मी फेसबुकवर तुम्ही लिहिलेलं वाचलं होतं की, तुम्ही दिवसभर पेपर वाचन, मोबाइल यामध्ये बुडलेले असता आणि त्यामुळे शरीराला काहीच हालचाल होत नसते. तुमच्या मिसेसने ऑनलाइन माहिती काढली होती की, माणसाची दिवसभर काहीही हालचाल होत नसेल तर, त्याने चुरमुरे खावे म्हणजे तब्येत उत्तम राहते आणि त्याप्रमाणे तुमचे रोज सकाळ-संध्याकाळ चुरमुरे खाणे सुरू आहे… आणि म्हणूनच मला विचारायचं होतं की, रोज चुरमुरे खाल्ल्यामुळे पोटाला काही त्रास तर होत नाही ना?
मी : तुम्ही वाचलेलं अगदी बरोबर आहे. मी रोजच आता सकाळ, संध्याकाळ फक्त चुरमुरे खातो. चुरमुरे खाऊन माझी तब्येत उत्तम आहे. पोट उत्तम आहे…
( मनामध्ये : चुरमुरे खातोय कारण माझ्यापुढे दुसरा काहीच ऑप्शन नाही, बायको दुसरं काहीच खायला देत नाही!)
छाया : वा, छानच. आता माझ्या मूळ मुद्द्याकडे येते. माझे मिस्टर पण रिटायर्ड झाल्यापासून दिवसभर पेपर, टीव्ही आणि मोबाइल यामध्ये गटांगळ्या खात असतात. दिवसभर शरीराला काहीही हालचाल नसते. त्यांना पण तुमच्यासारखाच चुरमुरे नाश्ता सुरू करावा, असा विचार मनात आला. विचार केला – एकदा तुमच्याशी प्रत्यक्ष बोलावं आणि मगच सुरू करावं. आता बोलणे झालेच आहे, आता ‘शुभस्य शीघ्रम’ म्हणजे उद्यापासून सुरू करते.
हेही वाचा – असाही ड्राय-डे! तुम्ही सहमत आहात?
अधून मधून फोन केला तर चालेल ना? म्हणजे जरा इकडच्या तिकडच्या गप्पा पण होतील, गाणी म्हणता येतील वगैरे वगैरे. मला पण गाण्याची आवड आहे. फेसबुकवरचे तुमचे लेख मी नेहमीच वाचते आणि तुमची गाणी छानच असतात. चुरमुऱ्यांमुळे आपली ओळख झाली, हे पण छानच झाले.
मी : अवश्य फोन करा. मला आवडेल. छान गप्पा होतील. तुमची गाणी ऐकायला मला नक्की आवडेल. तुमचा नंबर सेव्ह करून ठेवतो, आणि तुमचे नाव माझ्या ग्रुपमध्ये ॲड करतो. मिलते रहेंगे, बाय-बाय…
इथेच संवाद संपला. यापुढे छायाचे अधून मधून फोन येतीलच आणि अशाच प्रकारचे बऱ्याच बायकांचे पण नवऱ्याकरिता चुरमुऱ्यांच्या नाश्त्याबद्दल फोन येतील, अशी आशा आहे. चला चुरमुऱ्यांमुळे भरपूर नवीन नवीन ओळखी होतील, आणि गप्पाटप्पांचा स्कोप वाढेल…
That is the Life…


