सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद् ध्यानं विशिष्यते। ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिनिरन्तरम् ॥12॥
अभ्यासाहूनि गहन। पार्था मग ज्ञान। ज्ञानापासोनि ध्यान। विशेषिजे ॥141॥ मग कर्मफलत्यागु। तो ध्यानापासोनि चांगु। त्यागाहूनि भोगु। शांतिसुखाचा ॥142॥ ऐसिया या वाटा। इहींचि पेणा सुभटा। शांतीचा माजिवटा। ठाकिला जेणें ॥143॥
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च। निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥13॥
जो सर्व भूतांचां ठायीं। द्वेषांतें नेणेंचि कहीं। आपपरु नाहीं। चैतन्या जैसा ॥144॥ उत्तमातें धरिजे। अधम तरि अव्हेरिजे। हें काहींचि नेणिजे। वसुधा जेवीं ॥145॥ कां रायाचें देह चाळूं। रंका परौतें गाळूं। हें न म्ह्णेचि कृपाळू। प्राणु पैं गा ॥146॥ गाईची तृषा हरूं। कां व्याघ्रा विष होऊनि मारूं। ऐसें नेणेंचि का करूं। तोय जैसें ॥147॥ तैसी आघवांचि भूतमात्रीं। एकपणें जया मैत्री। कृपेशीं धात्री। आपणापां जो ॥148॥ आणि मी तूं हे भाष नेणें। माझें कांहींचि न म्हणे। सुखदुःख जाणणें। नाहीं जया ॥149॥ तेवींच क्षमेलागीं। पृथ्वीसि पवाडु आंगीं। संतोषा उत्संगीं। दिधलें घर ॥150॥
संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः। मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥14॥
वार्षियेंवीण सागरू। जैसा जळें नित्य निर्भरु। तैसा निरुपचारु। संतोषी जो ॥151॥ वाहुनि आपुली आण। धरी जो अंतःकरण। निश्चया साचपण। जयाचेनि ॥152॥ जीव परमात्मा दोन्ही। बैसोनि ऐक्यासनीं। जयाचां हृदयभुवनीं। विराजती ॥153॥ ऐसा योगसमृद्धि। होऊनि जो निरवधि। अर्पी मनोबुद्धि। माझां ठायीं ॥154॥ आंतु बाहेरि योगु। निर्वाळलेयाहि चांगु। तरि माझा अनुरागु। सप्रेम जया ॥155॥ अर्जुना गा तो भक्तु। तोचि योगी तोचि मुक्तु। तो वल्लभा मी कांतु। ऐसा पढिये ॥156॥ हें ना तो आवडे। मज जीवाचेनि पाडें। हेंही एथ थोडें। रूप करणें ॥157॥ तरी पढियंतयाची कहाणी। हे भुलीची भारणी। इयें तंव न बोलणीं। परी बोलवी श्रद्धा ॥158॥ म्हणोनि गा आम्हां। वेगा आली उपमा। एऱ्हवीं काय प्रेमा। अनुवादु असे ॥159॥ आतां असो हें किरीटी। पैं प्रियाचिया गोष्टी। दुणा थांव उठी। आवडी गा ॥160॥ तयाही वरी विपायें। प्रेमळु संवादिया होये। तिये गोडीसी आहे। कांटाळें मग ॥161॥ म्हणोनि गा पांडुसुता। तूंचि प्रियु आणि तूंचि श्रोता। वरी प्रियाची वार्ता। प्रसंगें आली ॥162॥ तरी आतां बोलों। भलेंया सुखा मीनलों। ऐसें म्हणतखेंवीं डोलों। लागला देवो ॥163॥ मग म्हणे जाण। तया भक्तांचे लक्षण। जया मी अंतःकरण। बैसों घालीं ॥164॥
हेही वाचा – Dnyaneshwari : म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती, इयें वोझीं नेघे मती
अर्थ
अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग अधिक बरा आणि कर्मफलत्यागापेक्षाही शांति श्रेष्ठ आहे ॥12॥
अर्जुना मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे आहे ॥141॥ मग कर्मफलत्याग जो आहे तो ध्यानापेक्षा चांगला आहे आणि कर्मफलत्यागापेक्षा शांतिसुखाचा भोग (म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव) चांगला आहे॥142॥ अर्जुना, अशा या वाटेने व याच मुक्कामाच्या क्रमाने ज्याने शांतीचा मध्य गाठला ॥143॥
सर्व भूतांच्या ठिकाणी द्वेष न करणारा, मैत्रीने वागणारा आणि तसाच कृपायुक्त, मी माझेपण रहित सुख व दु:ख समान मानणारा क्षमाशील ॥13॥
सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परकेपणाचा भाव कोठेच नसतो, त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपला व परकेपणा राहिला नाही. म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही. ॥144॥ उत्तमाचा स्वीकार करावा, आणि नीच म्हणून (नीचाचा) त्याग करावा हे ज्याप्रमाणे पृथ्वी मुळीच जाणत नाही ॥145॥ किंवा अर्जुना, राजाच्या देहाची हालचाल करावी व दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा असे कृपाळू प्राण केव्हाही म्हणतच नाहीत ॥146॥ गाईची तहान भागवू आणि वाघाला विष होऊन मारू असे करणे पाण्याला जसे ठाऊकच नसते ॥147॥ त्याप्रमाणे ऐक्यबोधाने संपूर्ण प्राणिमात्रांशी ज्याची मैत्री असते व जो आपण स्वत: कृपेची जन्मभूमी असतो ॥148॥ आणखी ‘मी तू’ अशी भाषा त्याला माहीत नसते, आणि माझे असे तो काहीच म्हणत नाही व ज्याला सुखदु:खांची जाणीव नसते ॥149॥ त्याप्रमाणे क्षमेच्या बाबतीत ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे, व त्याने आपल्या मांडीवर संतोषाला घर दिले आहे (संतोष ज्याच्यामुळे वाढला आहे). ॥150॥
सर्वदा संतुष्ट, योगी, नियतचित्त, माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे असा, माझ्या ठिकाणी ज्याने मन व बुद्धि अर्पण केली आहेत असा जो माझा भक्त असतो, तो मला प्रिय आहे. ॥14॥
वर्षाऋतुशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहेमी पूर्ण भरलेला असतो, तसा जो कोणताही बाह्य उपचाराशिवाय संतोषाने नेहेमी पूर्ण भरलेला असतो. ॥151॥ जो अंत:करणाला आपली शपथ घालून आवरून धरतो आणि ज्याच्या योगाने निश्चयाला खरेपणा असतो ॥152॥ त्याच्या अंत:करणरूपी घरामधे जीव व परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत (जीव व परमात्मा यांचे ऐक्य, ज्याच्या अनुभावाला आले आहे) ॥153॥ असा ऐक्यरूपी ऐश्वर्याने संपन्न होऊन जो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या ठिकाणी अर्पण करतो ॥154॥ अंत:करणात (आत्मैक्यप्रतीतीच्या दृढतेने) व बाह्य शरीरात (ध्यान, धारणा इत्यादिकांच्या द्वारे) चांगल्या तर्हेने योगात तयार होऊन देखील ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते, ॥155॥ अर्जुना तो भक्त, तोच योगी व तोच मुक्त. तो जशी काही स्त्री व मी पती इतका तो मला आवडतो ॥156॥ इतकेच नाही, तर तो मला जीवाइतका प्यार आहे. पण माझे जे त्याच्यावर प्रेम आहे, त्याला ही देखील उपमा अपुरी आहे ॥157॥ परंतु प्रेमळ भक्तांच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीत. पण अर्जुना तुझी माझ्यावरील श्रद्धा मला असली न बोलावयाची गोष्ट (पण) बोलावयास लावते ॥158॥ म्हणून आम्ही (बायकोची व जीवाची) झटकन् उपमा देऊ शकलो. नाहीतर हे प्रेम बोलून दाखावता येईल काय ॥159॥ आता अर्जुना हे असू दे. पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट बळ चढते ॥160॥ त्यात आणखी कदाचित संवाद करण्यास प्रेमळ मनुष्य मिळाला तर मग त्या आनंदाला दुसरी उपमा आहे काय ॥161॥ म्हणून अर्जुना, तूच प्रेमळ भक्त आणि तूच श्रोता आहेस. शिवाय आणखी प्रसंगानुसार प्रेमळाची गोष्ट बोलण्याची वेळ आली ॥161॥ (जरी प्रेमळाची गोष्ट शब्दांनी बोलून दाखविता येत नाही, तरी मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे प्रेमळाच्या त्रिपुटीचा प्रसंग आला आहे). म्हणून आता मी बोलतोच. या बोलण्याच्या सुखाचा आपल्याला कसा चांगला योग आला आहे ! असे म्हणतांक्षणीच देव डोलावयला लागले ॥163॥ मग श्रीकृष्ण म्हणाले, ज्या भक्ताला मी आपले अंत:करण बसावयास घालतो. त्या भक्ताची लक्षणे समजून घे ॥164॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें


