अध्याय तेरावा
शिवतलें गुरुचरणीं । भलते जे पाणी । तया तीर्थयात्रें आणी । तीर्थे त्रैलोक्यींचीं ॥448॥ श्रीगुरूचें उशिटें । लाहे जैं अवचटें । तैं तेणें लाभें विटे । समाधीसी ॥449॥ कैवल्यसुखासाठीं । परमाणु घे किरीटी । उधळती पायांपाठीं । चालतां जे ॥450॥ हें असो सांगों किती । नाहीं पारु गुरुभक्ती । परी गा उत्क्रांतमती । कारण हें ॥451॥ जया इये भक्तीची चाड । जया इये विषयींचें कोड । जो हे सेवेवांचून गोड । न मनी कांहीं ॥452॥ तो तत्त्वज्ञाचा ठावो । ज्ञाना तेणेंचि आवो । हें असो तो देवो । ज्ञान भक्तु ॥453॥ हें जाण पां साचोकारें । तेथ ज्ञान उघडेनि द्वारें । नांदत असे जगा पुरे । इया रीती ॥454॥ जिये गुरुसेवेविखीं । माझा जीव अभिलाखी । म्हणोनि सोयचुकी । बोली केली ॥455॥ एऱ्हवीं असतां हातीं खुळा । भजनावधानीं आंधळा । परिचर्येलागीं पांगुळा- । पासूनि मंदु ॥456॥ गुरुवर्णनीं मुका । आळशी पोशिजे फुका । परि मनीं आथि निका । सानुरागु ॥457॥ तेणेंचि पैं कारणें । हें स्थळ पोखणें । पडलें मज म्हणे । ज्ञानदेवो ॥458॥ परि तो बोलु उपसाहावा । आणि वोळगे अवसरु देयावा । आतां म्हणेन जी बरवा । ग्रंथार्थुचि ॥459॥ परिसा परिसा श्रीकृष्णु । जो भूतभारसहिष्णु । तो बोलतसे विष्णु । पार्थु ऐके ॥460॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : श्रीगुरु वोंवाळिजती, कां भुवनीं जे उजळिती
अर्थ
ज्या कोणत्याही पाण्याला श्रीगुरुचरणांचा स्पर्श झाला आहे, त्या पाण्याला तीर्थ असे समजून त्रैलोक्यातील तीर्थे त्या पाण्यात आली आहेत असे तो समजतो ॥448॥ त्याला जेव्हा श्रीगुरूचे उच्छिष्ट अकस्मात प्राप्त होते, तेव्हा त्या लाभापुढे तो समाधीस विटतो ॥449॥ अर्जुना, श्रीगुरु चालत असतांना त्यांच्या पायामागे जी धूळ उडते, त्यातील रज:कण तो गुरुभक्त मोक्षसुखाच्या योग्यतेचे समजतो ॥450॥ हे राहू दे! मी गुरुभक्तिसंबंधाने किती सांगू? गुरूंवरील प्रेमाला अंत नाही, परंतु माझ्या बुद्धीत अफाट स्फूर्ति झाली, हेच या विस्ताराचे कारण आहे. ॥451॥ ज्याला या भक्तीची इच्छा आहे ज्याला या विषयीचे कौतुक आहे व जो या सेवेवाचून दुसरे काही चांगले मानत नाही, ॥452॥ तो पुरुष तत्वज्ञानाचे ठिकाण आहे. ज्ञानाला त्याच्याच योगाने इभ्रत असते. हे वर्णन पुरे. अशी गुरूची सेवा करणारा जो आहे, तो देव आहे व ज्ञान त्याचा भक्त आहे. ॥453॥ ह्या रीतीने खरोखर तेथे (त्या गुरुभक्ताच्या ठिकाणी) जगाला पुरेल इतके ज्ञान उघड्या दाराने नांदते, हे तू खरोखर समज. ॥454॥ (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) ह्या गुरुसेवेविषयी माझ्या अंत:करणात उत्कट इच्छा आहे, म्हणून मर्यादा सोडून गुरुभक्तीचे व्याख्यान केले. ॥455॥ नाहीतर मी गुरुसेवेविषयी हात असून थोटा आहे, डोळे असून मी भजनाकडे लक्ष देण्याचे कामी आंधळा आहे व सेवा करण्याविषयी पाय असून पांगळ्यापेक्षा मंद आहे. ॥456॥ वाचा असून गुरुवर्णनाविषयी मुका व ज्यास फुकट पोसावे लागते असा मी आळशी आहे. परंतु माझ्या मनामधे गुरुभक्तिविषयी चांगले प्रेम आहे. ॥457॥ त्याच कारणामुळे मला ह्या (आचार्योपास्ति) पदाचे व्याख्यान विस्तृत करणे भाग पडले, असे ज्ञानदेव म्हणतात. ॥458॥ तरी ते माझे लांबलचक व्याख्यान सहन करावे आणि मला सेवा करण्याला सवड द्यावी. आता पुढे ग्रंथाचा अर्थच चांगला सांगेन. ॥459॥ ऐका ! ऐका ! भूतांचे ओझे सहन करणारा विष्णु जो श्रीकृष्ण, तो बोलत आहे व अर्जुन ऐकत आहे. ॥460॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु क्षेत्र गुरु देवता, गुरु माय गुरु पिता


