नीता चंद्रकांत कुलकर्णी
काळे आजींना भेटायला मी जात असते. काका गेले तेव्हापासून आजी जरा नरम गरम असतात. रात्री सोबतीला एक बाई झोपायला येते. दिवसा दोन बायका येऊन जाऊन कामाला येत असतात. त्यांना एकच मुलगी आहे. ती जवळ राहते. त्या तिला तायडी म्हणतात. ती दिवसातून एकदा तरी येऊन जाते.
खरंतर, आईला तिच्या घरी घेऊन जायला ती तयार आहे. जावई पण “या माझ्याकडे रहायला,” म्हणत असतो. पण त्या म्हणतात अजून मला होत आहे, तोपर्यंत मी एकटी राहते. नंतर तुमच्याकडेच येणार…
मला एकदा म्हणाल्या, “अगं असं लेकीच्या सासरी नको वाटतं गं! मी गेले की, त्यांचं सगळं आयुष्य बदलेल…”
आजी शहाण्या आणि समंजस आहेत.
अशीच त्या दिवशी आजींकडे गेले. खुर्चीवर बसणार तेवढ्यात त्या म्हणाल्या,
“अगं नीता, आधी इथं माझ्याजवळ कॉटवर ये.”
गेले…
माझा हात हातात घेऊन म्हणाल्या,
“अगं किती सुरेख हिरव्या बांगड्या घातल्या आहेस… घालाव्या गं! बघायला किती छान वाटतंय बघ बरं…”
आजींना खरं ते सांगितले, म्हटलं…
“काल कपाट आवरताना दिसल्या म्हणून अशाच घातल्या. हल्ली रोज काचेच्या बांगड्या घालते असं नाही.”
हेही वाचा – मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!
“तुला सांगू मला तर हिरव्या बांगड्या फार आवडायच्या…”
“आवडायच्या म्हणजे, आता नाही आवडत?”
“अगं, असं काय विचारतेस? हे गेले… आता कुठलं हिरव्या बांगड्या घालणं नशीबात!”
“पण हिरव्या बांगड्यांचा आणि काकांचा काय संबंध?”
“मी काय म्हणते तुला समजलं नाही…”
“कळलं मला… तुम्ही लग्नाआधी हिरव्या बांगड्या घालत होता?”
“हो…”
“मग तेव्हा कुठे काका होते?”
“अग पण ते वेगळं…”
“वेगळं कसं?”
“अगं सवाष्णीचं लेणं… मी कसं घालू?” हे बोलताना आजींचे डोळे भरून आले होते.
“थांबा तुम्हाला सांगते… आत्मा अमर आहे. मृत्यूनंतर शरीर नष्ट होते, पण आत्मा मरत नाही… आवडत्या व्यक्तीभोवती तो फिरत असतो… त्याचं काय चाललं आहे, ते बघत असतो… हे आपण वाचलं आहे की नाही?”
“हो, मग त्याचा इथं काय संबंध?”
“तुमची तायडी तिची मुलं… मार्गाला लागली आहेत. आता काकांचा आत्मा दुसरीकडे नाही तर, तुमच्या भोवतीच फिरत असणार…! तुम्ही हिरव्या बांगड्या घातल्या तर काकांच्या आत्म्याला आनंदच होईल… तुमचा आनंद तोच त्यांचा आनंद…”
“अगं, पण समाजाचं काय?”
“कुठला समाज?” असं म्हटल्यावर त्या विचारात पडल्या.
म्हटलं, “तुम्हाला भेटायला येणारे लोक हा समाज? त्यांचं तुमच्या हाताकडे लक्ष तरी असतं का?”
“हो गं… तू म्हणतेस ते पटतंय बघ… आणि आजकाल फारसं कोणी घरी येतही नाही. त्यांचंही बरोबर आहे, प्रत्येकजण आपापल्या नादात… ज्याला त्याला आपला संसार, नोकरी-धंदा आहे त्यांना कामंही असतात गं…”
सत्य आहे ते, आजींनी स्वीकारलं होतं. हे सांगताना त्यांचा आवाज शांत होता.
हळूवारपणे त्यांचा हात हातात घेऊन त्यांना सांगितलं…
“घालावीशी वाटते ना हिरवी बांगडी तर घाला…”
“नको गं नको….” आजी अगदी घाईने म्हणाल्या.
“आहेत का तुमच्याकडे?”
“हो, समोरच्या कपाटात डबा आहे त्यात आहेत.”
मी डबा आणून दिला. त्यातल्या हिरव्या बांगड्या काढून हातात घेऊन त्या बसल्या होत्या डोळे भरून आले होते…
संस्कारांच्या दबावाचा एक खोल ठसा वर्षानुवर्ष मनावर कोरलेला असल्याने त्यांना बांगड्या घालायचे धैर्य झाले नाही…
रूढी-परंपरा मोडणं इतकं सोपं नसतंच… त्याची मूळं मनात खोल घट्ट रुतून बसलेली असतात.
“राहू दे… नकोच…” असं म्हणत त्यांनी हळूच बांगड्या डब्यात ठेवून दिल्या.
निघताना त्यांनी परत माझे हात हातात घेतले… माझ्या पोटात तुटत होते… डोळे भरून आले होते… घरी आले तरी आजीच दिसत होत्या…
मध्यंतरी एका लग्नघरी बांगड्या भरायचा कार्यक्रम होता. तिथे कासारीणबाई सहजपणे म्हणाल्या,
“या हिरव्या रंगाच्या बऱ्याच प्रकारच्या बांगड्या आणलेल्या आहेत आणि “तशा” बायकांसाठी या इतर रंगाच्या पण आहेत…”
म्हणजे बदल करायचं मनात असेल तरीसुद्धा समाज तुम्हाला त्या रूढीची आठवण करून देत राहतो… हे असे विचार लगेच पुसले जातच नाहीत!
आठ दिवसांनी आजींचा फोन आला… “नीता भेटायला येशील का…?”
गेले… बांगड्यांचा डबा उशीजवळ होता.
“ये गं ये… तुझीच वाट पाहात होते…” त्या लगेच सांगायला लागल्या,
“तू सांगितलेल्या गोष्टींवर मी विचार केला मग पटलं मला. तू म्हणतेस ते खरं आहे… आता मी काय गंमत करते माहीत आहे? कोणी नसलं की, मी बांगड्या हातात घालते… अगं पहिल्यांदा घातल्या तेव्हा तर इतका आनंद झाला म्हणून सांगू? लग्नाचा चुडाच आठवला…”
हे सांगताना त्यांचे डोळे चमकत होते… पुढे म्हणाल्या,
“आता मनात आलं की घालते… पण कोणी नसताना! परवा तर काय झालं… तायडी लॅच-कीने दार उघडून आली की अचानक आणि हातात बांगड्या तशाच! पण तिचं माझ्या हाताकडे लक्ष गेलंच नाही, चांगली दोन तास होती…”
“बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही?”
“हो गं…”
“आज तुला घालून दाखवते…”
आजींनी आठ-आठ बांगड्या हातात घालून हात पुढे केला…
अपार आनंद चेहऱ्यावर होता… आज आजींचे डोळे हसत होते… त्यांचे सुरकुतलेले हात मी हातात घेतले अन् म्हटलं,
“आज काकांचा आत्माही हसत असेल… बायकोला खूश बघून!”
हेही वाचा – गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…
“इश्श…” म्हणताना आजी मस्तपैकी लाजल्या. त्याचं वर्णन शब्दांत करूच नये… असा सहज ओसंडून वाहणारा आनंद कुणाच्या चेहऱ्यावर दिसला की, मी समाधानी असते. असा निरपेक्ष आनंद वाटत राहावा…
खरं सांगू… त्यासाठी खूप काही कराव लागत नाही….
एके दिवशी तायडी माझ्यासाठी डझनभर हिरव्या बांगड्या घेऊन आली,
“नीता मावशी…” म्हणताना तिचे डोळे भरून वहात होते…
“अगं आता आईला बांगड्यांच्या नादच लागला आहे. त्यामुळे हल्ली आई खूप आनंदात असते…”


