सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय ॥9॥
अथवा हें चित्त। मनबुद्धीसहित। माझां हातीं अचुंबित। न शकसी देवों ॥104॥ तरि गा ऐसें करीं। या आठां पाहारांमाझारीं। मोटकें निमिषभरी। देतु जाय ॥105॥ मग जें जें कां निमिख। देखेल माझें सुख । तेतुलें अरोचक। विषयीं घेईल ॥106॥ जैसा शरत्कालु रिगे। आणि सरिता वोहटूं लागे| तैसें चित्त काढेल वेगें। प्रपंचौनि ॥107॥ मग पुनवेहूनि जैसें। शशिबिंब दिसें दिसें। हारपत अंवसे। नाहींचि होय ॥108॥ तैसें भोगाआंतूनि निगतां। चित्त मजमाजीं रिगतां। हळूहळू पांडुसुता। मीचि होईल ॥109॥ अगा अभ्यासयोगु म्हणिजे। तो हा एकु जाणिजे। येणें कांहीं न निपजे। ऐसें नाहीं ॥110॥ पैं अभ्यासाचेनि बळें। एकां गति अंतराळे। व्याघ्र सर्प प्रांजळे। केले एकीं ॥111॥ विष कीं आहारीं पडे। समुद्रीं पायवाट जोडे। एकीं वाग्ब्रह्म थोकडें। अभ्यासें केलें ॥112॥ म्हणोनि अभ्यासासि कांहीं। सर्वथा दुष्कर नाहीं । यालागी माझां ठायीं। अभ्यासें मिळ ॥113॥
हेही वाचा – Dnyaneshwari : एऱ्हवीं तरी माझियां भक्तां, आणि संसाराची चिंता
अर्थ
अथवा माझ्या ठिकाणीं चित्त स्थिर करण्याला समर्थ नसलास तर हे धनंजया (चित्तैकाग्रतेचा) अभ्यास करून माझी प्राप्ति करून घेण्य़ाची इच्छा कर ॥9॥
अथवा जर मनबुद्धिसहित हें चित्त माझ्या हाती अनुच्छिष्ट (सकलवासनारहित असें) तू देऊं शकणार नाहीस ॥104॥ तर अर्जुना, असें कर कीं आठ प्रहरांमधे नेमकें निमिषभर चित्त (मला) देत जा ॥105॥ मग जितकें जितकें निमिष तुझें चित्त माझें सुख पाहील तितकें तितकें तुझे चित्त विषयांच्या ठिकाणीं अरुची घेईल ॥106॥ ज्याप्रमाणें शरद ऋतूचा प्रवेश झाला असता नद्यांचे पाणी कमी होऊं लागतें, त्याप्रमाणें तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरूपांत जसजसा प्रवेश होईल, तसतसें तुझें चित्त प्रपंचांतून वेगानें निघेल ॥107॥मग ज्याप्रमाणें पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचे बिंब कमी होत होत अमावास्येला अगदी नाहींसे होतें ॥108॥ त्याप्रमाणें भोगांतून तुझें चित्त निघून माझ्यामध्यें प्रवेश करतां करतां अर्जुना, ते तुझें चित्त हळूहळू मद्रूप होईल ॥109॥ अरे अभ्यासयोग जो म्हणतात तो हाच एक आहे, असें समज. याच्या योगानें कोणतीहि गोष्ट प्राप्त होणार नाहीं असें नाही ॥110॥ अभ्यासाच्या सामर्थ्यानें कित्येक आकाशाच्या पोकळींत चालू शकतात व कित्येकांनी वाघ व साप यासारखे दुष्ट प्राणी स्वाधीन करून घेतले ॥111॥ विष खाण्याचा अभ्यास केला असतां तें विष देखील पचनीं पडते. अभ्यासाच्या योगाने समुद्रावरून पायाने जाता येते. कित्येकांनी वेदांचा अभ्यास करून ते वेद आटोक्यांत आणले ॥112॥ म्हणून अभ्यासाला कोणतीहि गोष्ट मुळींच कठीण नाहीं. याकरतां माझ्या स्वरूपीं तूं अभ्यासानें एकरूप हो ॥113॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जे मन बुद्धि इहीं घर केलें माझां ठायीं


