सुरेखा मोंडकर
माझ्या गावात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. बहुतेकांकडे सायकल किंवा दुचाकी असते. काही जण चारचाकी पण बाळगून आहेत. एकमेकांचं वाहन वापरणं तर इथे सर्रास होतं. हे औद्योगिक क्षेत्र आहे. काही कारखान्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था केलेली आहे. तरीही, असे बरेच आहेत की, चालण्याखेरीज दुसरा पर्याय नाही त्यांच्याकडे! अशा चालत जाणाऱ्यांना कनवाळू दुचाकीवाले विनंती केल्यास ‘लिफ्ट’ देतात. कधी कधी एका दुचाकीवर तीन किंवा चार माणसं का असतात, त्याचं कारण मला या खेड्यात राहायला आल्यावर कळलं… त्यामागील अपरिहार्यता अगतिकता पण कळली.
माझे परिचित गाववाले खूप अबोल आहेत. पण आपण स्वतःहून बोललो तर ते खुलतात. नम्रपणे मदु स्वरात गप्पा मारतात. हे गाववाले एकदा त्यांची शिफ्ट संपल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता दुचाकीवरून घरी चालले होते. वाटेत एकाने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. प्रत्येकालाच अडचणी माहिती असतात, त्यामुळे इथे साधारणपणे कोणी नकार देत नाहीत. गाववाल्याने रस्त्यावरील त्या अपरिचित माणसाला दुचाकीवर मागे बसवून घेतलं.
हेही वाचा – संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज
अनाहूत वाटसरू एका जागी म्हणाला, “इथे थांबा… मी इथे उतरतो.”
तिथे जवळपास गाव नव्हतं, वस्ती नव्हती… सगळीकडे शेतंच होती! असल्या निर्मनुष्य ठिकाणी उतरुन हा जाणार तरी कुठे? हा विचार आलाच त्या गाववाल्याच्या मनात!! पण ते म्हणाले, “उतरायचंय तर उतर बाबा!”
तो ‘बाबा’ उतरला. घरी गेल्यावर गाववाल्याच्या लक्षात आलं, त्यांच्या पाठीमागच्या खिशातलं पैशाचं पाकीट मारलं आहे.
मी ऐकून चकीतच झाले!
मला अगदी हळहळ वाटली. “आई गं… बापरे… अरेरे… कुणाला मदत करायचे दिवसच राहिलेले नाहीत…” अशा नेहमीच्या चार प्रतिक्रिया देऊन मी विचारलं, “मग आता काय करता तुम्ही?”
माझ्या शहरी विचारसरणीप्रमाणे मला वाटलं होतं, ते म्हणतील… “तेव्हापासून कानाला खडा. कुणाला लिफ्ट देत नाही!” अन् मला असा निर्णय घेणं योग्य पण वाटत होतं.
मी अपेक्षेने त्यांच्याकडे पाहिलं.
हेही वाचा – मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!
शांतपणे नेहमीच्या मृदू स्वरात ते गाववाले म्हणाले, “तेव्हापासून मी पाकीट पुढच्या खिशात ठेवतो. वाहनच नाही तर कसा जाणार माणूस? किती तंगडतोड करणार!”
मी थक्क!
असा हा दुसरा win win विचार सहसा मनात येतच नाही. बहुतेक वेळा एकतर्फी निर्णय घेतला जातो आणि आपण म्हणतो… ‘बरोबर आहे, अनुभवाने माणूस बदलतो!’
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


