सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
हे कीर माझां चित्तीं । प्रतीति आथि जी निरुती । परि पुसणें योगपती । तें याचिलागीं ॥27॥ जें देवा तुम्हीं नावेक । अंगीकारिलें व्यापक । तें साचचि कीं कवतिक । हें जाणावया ॥28॥ तरि तुजलागीं कर्म । तूंचि जयांचें परम । भक्तीसी मनोधर्म । विकोनि घातला ॥29॥ इत्यादि सर्वीं परीं । जे भक्त तूंतें हरी । बांधोनियां जिव्हारीं । उपासिती ॥30॥ आणि जें प्रणवापैलीकडे । वैखरीयेसी जें कानडें । कायिसयाहि सांगडें । नव्हे जें वस्तु ॥31॥ तें अक्षर जी अव्यक्त । निर्देशदेशरहित । सोऽहंभावें उपासित । ज्ञानिये जे ॥32॥ तयां आणि जी भक्तां । येरयेरांमाजी अनंता । कवणें योगु तत्त्वता । जाणितला सांगा ॥33॥ इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला । म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करूं ॥34॥
श्री भगवानुवाच – मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥2॥
तरि अस्तुगिरीचां उपकंठीं । रिगालिया रविबिंबापाठीं । रश्मी जैसे किरीटी । संचरती ॥35॥ कां वर्षाकाळीं सरिता । जैसी चढों लागें पांडुसुता । तैसी नीच नवी भजतां । श्रद्धा दिसे ॥36॥ परि ठाकिलियाहि सागरु । जैसा मागीलही यावा अनिवारु । तिये गंगेचिये ऐसा पडिभरु । प्रेमभावा ॥37॥ तैसें सर्वेंद्रियांसहित । मजमाजीं सूनि चित्त । जे रातिदिवो न म्हणत । उपासिती ॥38॥ यापरी जे भक्त । आपणपें मज देत । तेचि मी योगयुक्त । परम मानीं ॥39॥
ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ॥3॥
आणि येर तेही पांडवा । जे आरूढोनि सोऽहंभावा । झोंबती निरवयवा । अक्षरासी ॥40॥
हेही वाचा – Dnyaneshwari : म्हणोनि अंबे श्रीमंते, निजजनकल्पलते
अर्थ
महाराज, माझ्या चित्तात हाच (व्यक्त आणि अव्यक्त ही दोन्ही रूपें एकच आहेत) खरोखरी निश्चये करून अनुभव आहे; परंतु योगेश्वरा, आपल्याला विचारावयाचे ते एवढ्याचकरिता की, ॥27॥ हे श्रीकृष्णा, तुम्ही जी मागे क्षणभर व्यापक रूपाची ग्राह्य म्हणून शिफारस केलीत, ते तुमचे प्रतिपादन खरोखर मनापासूनचे आहे किंवा तो एक तुम्ही क्षणाभर केलेला विनोद आहे, हे नीट समजून यावे म्हणून (मी आपल्यास खुलासा विचारत आहे). ॥28॥ तरी जे भक्त तुझ्या प्राप्तीकरिता कर्म करतात आणि तू ज्यांची परमगती आहेस आणि ज्यांनी आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला विकल्यासारखे वाहिले आहेत. ॥29॥ हे कृष्णा, या आणि अशाच इतर सर्व प्रकारांनी, जे भक्त तुला आपल्या अंत:करणात दृढ धारण करून तुझी उपासना करतात, ॥30॥ आणि जी वस्तू ॐकारापलीकडे आहे आणि वैखरी नावाच्या वाचेस जी दुर्बोध आहे आणि जी वस्तू कशाही सारखी नाही, ॥31॥ ती वस्तू अविनाशी आणि इंद्रियांना विषय न होणारी आहे. ती वस्तू दाखविता येण्याजोगी नाही आणि ती देशाने मर्यादित नाही, अशी आहे; अशा वस्तूची जे ज्ञानी ‘ती वस्तू मी आहे’ अशा भावनेने उपासना करतात ॥32॥ महाराज, अशा या योगी आणि भक्तांपैकी कोणी एकाने, हे अनंता, खरोखर योग जाणला, सांगा बरे? ॥33॥ या अर्जुनाच्या बोलण्याने ते जगद्बंधु श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होऊन म्हणाले, ‘अरे अर्जुना, तू प्रश्न करण्याचे चांगले जाणतोस.’ ॥34॥
श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन ठेवून, नित्ययुक्त होऊते, अतिशय श्रद्धेने युक्त असे जे माझी उपासना करतात, ते सर्वात उत्कृष्ट योगी असे मी समजतो. ॥2॥
तर अर्जुना, अस्ताचलाच्या समीप सूर्य गेल्यावर सूर्यबिंबामागून जशी किरणे जातात, ॥35॥ अर्जुना, ज्याप्रमाणे पावसाळ्यात नदीचे पाणी रोज वाढते, त्याप्रमाणे माझे भजन करीत असताना माझ्या भक्तांचे माझ्याविषयीचे प्रेम नित्य नवे (वाढणारे) दिसते. ॥36॥ परंतु गंगा नदी समुद्रास प्राप्त झाल्यानंतरही जसा (तिच्या) मागील पाण्याचा अनिवार लोट येत रहातो, त्या गंगेसारखा ज्याच्या प्रेमभावाला जोर असतो, ॥37॥ तसेच जे रात्र आणि दिवस असे काही न म्हणता, सर्व इंद्रियांसहित माझ्या स्वरूपी दृढ अंत:करण ठेवून माझी उपासना करतात, ॥38॥ याप्रमाणे जे भक्त मला आपला आत्मभाव देतात, त्यांनाच मी श्रेष्ठप्रतीचे योगयुक्त मानतो. ॥39॥
तथापि जे अक्षर, अनिर्देश्य, अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य. अविकारी, अचल आणि ध्रुव (अशा) वस्तूची उपासना करतात ॥3॥
आणि अर्जुना याशिवाय दुसरे (निर्गुणाचे उपासक) जे ‘ते ब्रह्म मी आहे,’ अशी दृढ भावना करून अवयवरहित आणि अविनाशी अशा ब्रह्माला धरावयास पाहतात. ॥40॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तरि व्यक्त आणि अव्यक्त, हें तूंचि एक निभ्रांत


