दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 06 जून 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 16 ज्येष्ठ शके 1948; तिथि : षष्ठी 26:40; नक्षत्र : श्रवण 06:03;
- योग : ऐंद्र 10:03; करण : गरज 14:04;
- सूर्य : वृषभ; चंद्र : मकर 19:02; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:13;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
शिवराज्याभिषेक सोहळा – किल्ले रायगड
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
कन्नड कवी, कथाकार मास्ती वेंकटेश अयंगार
टीम अवांतर
प्रख्यात कन्नड कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि समीक्षक मास्ती वेंकटेश अयंगार यांचा जन्म 6 जून 1891 रोजी म्हैसूर राज्यातील मास्ती गावाजवळील होंगेन हळ्ळी येथे झाला. ‘श्रीनिवास’ या टोपणनावाने त्यांनी काव्य आणि कथालेखन केले. त्यांची मातृभाषा तमिळ, पण त्यांचे सर्व लेखन कन्नडमध्ये झाले. मद्रास विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन प्रथम क्रमांक आणि सुवर्ण पदक मिळवून एम. ए. झाल्यावर त्यांनी त्यावेळच्या म्हैसूर संस्थानात विविध खात्यात नोकरी केली. 1942मध्ये ते अबकारी आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून 1962पर्यंत त्यांनी जीवन मासिकाचे उत्कृष्ट संपादन करून त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. इंग्रजीवर तसेच संस्कृतवरही त्यांचे चांगले प्रभूत्व होते. तसेच, एक नाणावलेले वक्ते म्हणूनही त्यांचा लौकिक होता.
बी.ए. ला असताना त्यांची पहिली लघुकथा ‘रंगपन्न मदुवे’ (रंगाचे लग्न) प्रसिद्ध झाली. त्यांनी भावगीते, कथाकाव्ये नाटके (गद्य आणि पद्य), चरित्र, कथा, कादंबरी आणि कादंबरिका, ललित निबंध, समीक्षा, अनुवाद, आत्मचरित्र यासारख्या प्रकारांत विपुल लेखन केले. कन्नड साहित्यात त्यांना लघुकथाकार, कादंबरीकार तसेच कवी म्हणून विशेष महत्त्वाचे स्थान आहे. आधुनिक कन्नड लघुकथेचे ते जनक मानले जातात. त्यांच्या कथांचे तेरा संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. आपल्या काही कथा त्यांनी स्वतःच इंग्रजीत अनुवादित करून त्या प्रसिद्धही केल्या.
हेही वाचा – आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…
मास्तींच्या चिक्कवीर राजेंद्र या 1956मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रदीर्घ कादंबरीस 1983चा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ प्राप्त झाला. चिक्कवीर राजेंद्र ही कोडगू (कूर्ग) येथील शेवटचा राजा वीर राजेंद्र याची आणि त्याच्या राज्याच्या अधोगतीची शोकांतिका आहे. उमाकांत ठोंबरे यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला असून तो नॅशनल बुक ट्रस्टतर्फे 1981मध्ये प्रसिद्ध झाला.
1946मध्ये मद्रास येथे भरलेल्या दक्षिण भारतीय भाषा परिषदेचे अध्यक्ष, 1961मध्ये मुंबईस भरलेल्या अखिल भारतीय लेखक परिषदेचे अध्यक्ष, अखिल भारतीय ‘पेन’चे उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष, कन्नड साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष, साहित्य अकादमीचे फेलो तसेच सदस्य, बेळगाव येथे भरलेल्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यासारख्या मानाची पदे त्यांनी आपल्या प्रदीर्घ साहित्यसेवेत भूषविली. म्हैसूरच्या महाराजांनी त्यांना 1942मध्ये ‘राजसेवा प्रसक्त’ हा किताब देऊन तसेच कर्नाटक विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डी. लिट. देऊन त्यांचा गौरव केला. 1968मध्ये सण्ण कथेगळु या त्यांच्या कथासंग्रहात साहित्य अकादमी पुरस्कार तसेच 1983मध्ये भारतीय ज्ञानपीठाचा दीड लाख रुपयांचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. कन्नड साहित्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण केलेल्या मास्ती यांचे 6 जून 1986 रोजी निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस थोडा आव्हानात्मक असेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल, पण सहकाऱ्यांची मदत मिळेल. इतरांच्या सल्ल्यावर आंधळेपणाने अवलंबून राहू नका. सभोवतालच्या लोकांचे खरे हेतू ओळखणे महत्त्वाचे आहे. आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या, नाहीतर पश्चात्तापाची वेळ येईल. संततीचे यश पाहून आनंद वाटेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
वृषभ – आवडत्या व्यक्तीसोबत संपूर्ण दिवस व्यतीत कराल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य येईल. अविवाहित जातकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. कामातील निष्काळजीपणा हानिकारक ठरू शकतो, वरिष्ठांचा रोष ओढावून घ्याल. छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडचिड केल्याने कौटुंबिक वातावरण बिघडू शकते, त्यामुळे संयम राखा.
मिथुन – खर्च आणि उत्पन्न यात समतोल साधावा लागेल, तरच आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. एखाद्या सहकाऱ्याच्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटू शकते, तथापि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कार्यालयात वैयक्तिक बाबींवर चर्चा करणे टाळा. व्यवसायात नवीन करार होतील, त्यातून भविष्यात फायदा होईल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील.
कर्क – दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. जुनी कर्जे फेडण्याच्या दृष्टीने चांगली प्रगती होईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली सरकारी कामे पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिक भागीदारीत सावधगिरी बाळगा, कारण वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळेल.
सिंह – आजचा दिवस नवी आशा घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. लोक तुमची प्रशंसा करतील. कामासंदर्भात अचानक प्रवासाला जावे लागू शकते. एखाद्या कामाबद्दल मनात शंका असल्यास, त्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करा. संतती एखाद्या परीक्षेत चांगले यश मिळेल. तब्येतीची काळजी घ्या, पथ्यपाणी सांभाळा.
कन्या – नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे. प्रलंबित कामेही लवकर पूर्ण होतील. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असणाऱ्या जातकांना नवीन पद किंवा जबाबदारी मिळू शकते. पटकन कोणावरही विश्वास ठेवू नका, सभोवतालचे छुपे शत्रू ओळखणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा.
तुळ – आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला असेल. उत्पन्नातील वाढ आनंद देऊन जाईल. बोलताना कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. वडिलांच्या बोलण्यामुळे थोडे दुःख होऊ शकते, मात्र त्यामागचा चांगला उद्देश लक्षात घ्या. जोडीदार पूर्णपणे पाठिंबा देईल. कोणाला उसने दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता सध्यातरी फारशी नाही.
वृश्चिक – मालमत्तेसंबंधीचा एखादा महत्त्वाचा निर्णय आज तुमच्या बाजूने लागू शकतो. आत्मविश्वासाने वागल्यास, नक्कीच यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल आणि पदोन्नतीसंदर्भात चर्चा होऊ शकते. कामाच्या बाबतीत सहकाऱ्यांना सांभाळून घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. दुसऱ्याचे वाहन उसने घेणे टाळा.
हेही वाचा – सहावे इंद्रिय… मन
धनु – एखाद्या खास व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. खर्च नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. भूतकाळातील जुन्या चुका अचानक समोर येऊ शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगा. गुंतवणूक करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्या. सध्या व्यवसायात मोठे बदल करणे टाळा. अविवाहितांसाठी दिवस आनंददायी ठरू शकतो.
मकर – सध्या प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागेल. एखाद्या निर्णयाबद्दलची चिंता कायम राहू शकते. कुटुंबातील गैरसमज दूर करण्याची जबाबदारी तुमच्यावर असेल. त्यामुळे संयमाने प्रत्येकाशी संवाद साधावा लागेल. विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु मन:शांती ढळू देऊ नका. नवीन नोकरी किंवा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
कुंभ – धार्मिक कार्य आणि कार्यक्रम यामध्ये संपूर्ण दिवस मग्न असाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या बोलण्याकडे कानाडोळा करणे हानिकारक ठरू शकते. तुमची कार्यक्षमता इतरांना प्रभावित करेल. घरगुती कामांकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे असेल. घराचे नूतनीकरण किंवा सजावट सुरू करण्याचा विचार करू शकता.
मीन – समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. लोक तुमची प्रशंसा करतील. जोडीदाराकडून एखादा सुखद आश्चर्याचा धक्का मिळू शकते. आर्थिक ताण वाढू शकतो, त्यामुळे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. नोकरीच्या ठिकाणी डोक शांत ठेवून काम करणे गरजेचे आहे, कोणत्याही वादापासून दूर राहा. संततीच्या लहरी स्वभावामुळे देखील चिंता वाढू शकते.


