भाग – 28
शर्वायने आराध्याच्या डोळ्यांत पाहत उत्तर दिलं, “कारण कदाचित हेच खरं आहे. तुझं साधं हसणं, तुझी कष्टाळू वृत्ती… सगळंच वेड लावतं. तुझ्याभोवती असणारी निरागसता मला माझ्या आयुष्याच्या गुंतागुंतीतून दूर नेते.”
आराध्याच्या गालावर हलकीशी लाली आली.
“शर्वाय… मला हे सगळं नवीन आहे. कधीच असं वाटलं नव्हतं की, माझ्या साध्या आयुष्यात असा कुणी येईल जो मला इतकं महत्त्व देईल.”
शर्वायने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, “माझं मन सांगतंय की, तुझा माझ्यावर एक हक्क आहे. तुझं सुख, तुझी सुरक्षितता, सगळी माझी जबाबदारी आहे.”
त्या पावसात दोघंही न बोलता एकमेकांच्या नजरेत हरवून गेले. पाऊस त्यांना चिंब करत होता, पण त्या क्षणी दोघांच्या मनात प्रेमाचा अंकुर फुलू लागला होता. शर्वायच्या नजरेत जिव्हाळा आणि आराध्याच्या डोळ्यांत ओलसर चमक होती.
त्या गारव्यात शर्वायने आपली जॅकेट काढून आराध्याच्या खांद्यावर घातले,
“चल, आता भिजणं पुरे. तुझी तब्येत बिघडली तर मलाच दोष दिला जाईल.”
आराध्या हलकंसं हसली आणि दोघं परत गाडीकडे निघाले.
त्या पावसात दोघांच्या हृदयात प्रेमाचा सागर उफाळून येत होता. पण त्यांच्या प्रेमाचं हे नवं वळण अजून कुणालाच माहीत नव्हतं… आणि पुढे काय होईल, हे नियतीनेच ठरवलं होतं.
0000
दिवाकर कामानिमित्त काही दिवस बाहेर गेले होते. परतल्यावर त्यांनी सुमित्रा आजींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. आजींच्या चेहऱ्यावर एक समाधानाची झलक होती.
“आई, कसं काय सगळं? घरी सगळे ठीक आहेत ना?” दिवाकरने विचारलं.
“हो रे, सगळं व्यवस्थित आहे. पण एक गोष्ट आहे… तुला सांगायचं होतं,” सुमित्रा आजी म्हणाल्या.
दिवाकर थोडासा गोंधळला, “काय झालं आई? काही समस्या आहे का?”
सुमित्रा आजी हसत म्हणाल्या, “अरे, काहीच समस्या नाही. उलट आनंदाची बातमी आहे. आपल्या घरात आराध्या आली आहे. प्राजक्ता आणि सुशांतची मुलगी माझी बालमैत्रीण लक्ष्मीची नात.”
हेही वाचा – ट्रेनिंगदरम्यान आराध्याला एक फाइल सापडली…
“आराध्या? म्हणजे… ती इथे का?” दिवाकरने आश्चर्याने विचारलं.
“गुरुजींनीच तिला इथे आणायला सांगितलेलं. काही संकट जरी आलं तरी पण ती इथे येऊन आपल्या कुटुंबाला मदत करेल… गुरुजींनी तिला आशीर्वाद दिलाय आणि सांगितलं की, ती आपल्या घराची ओळख पुनः प्रस्थापित करेल.”
दिवाकरच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव उमटला… “आई, गुरुजींनी असं का सांगितलं? म्हणजे काही मोठं कारण आहे का?”
सुमित्रा आजीने हलकं हसून उत्तर दिलं, “हे मलाही पूर्ण समजलेलं नाही, पण गुरुजींच्या शब्दांवर मला विश्वास आहे. आराध्या साधी मुलगी नाही. तिच्यात एक विलक्षण ताकद आहे, जी अजून तिच्या लक्षातही आलेली नाही.”
दिवाकर विचारमग्न झाला…. “आई, आराध्याला काही त्रास तर नाही ना? ती इथे येऊन सुखरूप आहे का?”
“हो, अगदी ठीक आहे. शर्वाय तिचा खूपच सांभाळ करतोय. ऑफिसमध्येही तिची काळजी घेतोय,” सुमित्रा आजी अभिमानाने म्हणाल्या.
दिवाकरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, “आई, गुरुजी काही चुकीचं बोलत नाहीत. जर त्यांनी तिच्याबाबत अस काही सांगितलं असेल, तर नक्कीच काही गंभीर आहे. आपणही तिची पूर्ण काळजी घेऊ.”
सुमित्रा आजीने समाधानाने मान डोलावली. “हो बेटा, तू बरोबर म्हणतोस. पण तुला अजून एक सांगायचं आहे… माधव काहीसा विचित्र वागतोय. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.”
दिवाकर गंभीरपणे म्हणाला, “आई, मी लक्ष ठेवतो. आराध्याच्या सुरक्षिततेला काहीही बाधा येऊ देणार नाही.”
त्या रात्री दिवाकर विचारमग्न होता. आराध्याचं आगमन आणि गुरुजींचं मार्गदर्शन यात नक्कीच काही गूढ होतं. त्याला वाटत होतं की, हे सर्व एका मोठ्या रहस्याच्या अंगभूत घटकांचा भाग असू शकतं.
दिवाकर गुरुजींना भेटायला त्यांच्या आश्रमातील कुटीरमध्ये गेले. गुरुजी ध्यानस्थ होते. दिवाकरने थोडा वेळ शांतपणे थांबून त्यांची प्रतीक्षा केली. काही वेळानंतर गुरुजींनी डोळे उघडले आणि मंद स्मित करून म्हणाले,
“ये दिवाकर, तुझीच वाट पाहत होतो.”
दिवाकरने नम्रपणे नमस्कार केला आणि गुरुजींना विचारलं, “गुरुजी, आराध्याबाबत काही कळलं का? आईने सांगितलं की तुम्ही तिला आशीर्वाद दिला आहे आणि ती आमच्या घराची ओळख पुनः प्रस्थापित करेल असं म्हणालात.”
गुरुजींच्या चेहऱ्यावर एक गहन शांत भाव आला. ते हळू आवाजात म्हणाले, “दिवाकर, काही गोष्टी नियतीच्या नियमानुसार घडत असतात.”
“आराध्या म्हणजे केवळ एक साधी मुलगी नाही. तिच्या अंगी एक अद्भुत शक्ती आहे. ती शक्ती सध्या सुप्त अवस्थेत आहे, पण योग्य वेळ आली की, ती प्रकट होईल.”
दिवाकर थोडासा गोंधळला… “गुरुजी, म्हणजे नक्की काय?”
गुरुजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, “शर्वाय आणि आराध्या हे दोघे नियतीने एकत्र बांधलेले आहेत. त्यांच्यातील नातं केवळ मानवी नाही, तर आध्यात्मिक बंध आहे.”
“आराध्याच्या शक्तीचा योग्य उपयोग शर्वायच्या साहाय्यानेच होऊ शकतो. त्याची हुशारी आणि तिच्या ताकदीचं संयोग म्हणजेच त्यांच्या कुटुंबाचं रक्षण.”
दिवाकरला हे ऐकून धक्का बसला. “गुरुजी, याचा अर्थ आराध्या आणि शर्वायचं नातं आधीच ठरलेलं आहे का?”
गुरुजी मंद हसले… “अगदी तसंच! पण त्यांच्या आत्म्यांचा बंध प्राचीन आहे. दोघे एकत्र आल्यासच कुटुंबाच्या हितासाठी ते लढू शकतात. मात्र, माधवसारखे लोक या नात्याला धक्का लावू पाहतील. म्हणून शर्वाय आणि आराध्याला एकत्र ठेवणं गरजेचं आहे.”
दिवाकर विचारात पडला… “माधवचं धोकादायक वागणं मला जाणवलं आहे. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावं लागेल.”
गुरुजींनी डोळे मिटून आशीर्वाद दिला, म्हणाले, “शर्वायला आराध्याचा सांभाळ करायला सांग. तिच्या भोवतीचा धोका अजून संपलेला नाही. हे दोन तरुण एकमेकांच्या आधारानेच संकटांचा सामना करतील.”
दिवाकर गुरुजींचं म्हणणं समजून घेत होता. त्याने गुरुजींना वचन दिलं की, तो शर्वाय आणि आराध्याला सुरक्षित ठेवेल.
दिवाकर घरी परतताना त्यांच्या मनात विचारांचं वादळ होतं. शर्वाय आणि आराध्याचं नातं, त्यांच्यातील आध्यात्मिक बंध आणि माधवचा वाढता धोका… सगळ्याचा एका धाग्यात गुंफलेला गूढपट उलगडत होता.
0000
इथे माधवने आपल्या नव्या डावाचा पहिला टप्पा आखला — आराध्याला शर्वायसमोर कसं अपमानित करता येईल, चुकीची दाखवता येईल, त्यासाठी त्याने प्लॅन केला.
ऑफिसचमध्ये आराध्या आपल्या टेबलावर बसून कामात गढलेली असताना माधव तिच्याजवळ आला. आवाजात सौम्यता ठेवत तो म्हणाला, ” आराध्या, ही फाइल शर्वायला दे. त्याने या प्रोजेक्टच्या कागदपत्रांची मागणी केली होती.”
आराध्या हसतच… “ठीक आहे, मी देईन…”
आराध्या फाइल घेऊन मीटिंग करता शर्वायच्या केबिनकडे निघाली.
केबिनमध्ये आराध्याने फाइल देताच शर्वाय ने ती उघडून पाहिली. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि थोडं नाराजीचं भाव उमटलेले आराध्याला दिसले.
शर्वाय थोड्या गंभीर आवाजात म्हणाला…
“आराध्या, ही फाइल चुकीची आहे. यात प्रोजेक्ट ‘उत्तन’चे नाही तर ‘गुहाघर’ प्रोजेक्टचे कागद आहेत.”
आराध्या हे ऐकूनच थक्क झाली… “पण… मला तर माधव सरांनीच दिली.”
शर्वाय शांतपणे म्हणाला, ” काही हरकत नाही. तुझी चूक नाहीये. तू एक काम कर, माधव सरांना सांग की, मला ‘उत्तन’ प्रोजेक्टची फाइल हवी.”
आराध्या परत मागे फिरली. तिने येऊन माधवला चुकीची फाइल दिली गेल्याचं सांगितलं.
माधव खोटं हसत, “अरेरे! माझीच चूक झाली का? खरंच सॉरी आराध्या, मीच न पाहता घाईत दिली. ही घे, ही खरी फाइल आहे,” असं म्हणत त्याने आणखी एक फाइल काढून तिला दिली.
आता मात्र आराध्याने फाइल हातात घेताच उघडून नीट पाहिली. हीच ती फाइल आहे, याची खात्री होताच आराध्या पुन्हा फाइल घेऊन शर्वायच्या केबिनकडे निघून गेली.
आता आणलेली फाइल शर्वायच्या हातात देताना आराध्याने माफी मागितली. “आपण ती फाइल न पाहताच घेऊन आलो होतो. ती योग्य फाइल आहे की नाही, याची मी खात्री करायला हवी होती,” असं ती म्हणाली.
शर्वाय मात्र न चिडता मधुर आवाजात म्हणाला, “काही हरकत नाही, आराध्या. प्रत्येकाकडून चुका होतात. तू टेन्शन नको घेऊ. पण यातून एक मात्र शिकलीस कोणत्याही वस्तू किंवा घटनेची प्रथम खात्री करून घेणं गरजेचं असतं. सहज विश्वास ठेऊन मोकळं होऊ नये.”
तो तिच्याकडे पाहत हलकसं हसतो…
आराध्या ही हलकसं हसत… “धन्यवाद सर…” म्हणून तिथून निघाली.
शर्वायने दाखवलेल्या त्या विश्वासाने आराध्याच्या मनात त्याच्याविषयी आदर अजून वाढला.
हेही वाचा – शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!
इथे मात्र आराध्याला हसत येताना पाहून माधवचा संताप झाला.
ती समोर येताच माधव ने आराध्याला ‘शर्वायकडून काही बोलणी खावी लागली का?’ असे विचारले.
आराध्यानेही गंभीरपणे ‘नाही’ सांगितले. “सर काहीही बोलले नाही. उलट, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, मला समजून घेतले,” असे ती म्हणाली.
हे ऐकून तर माधवच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला… तो विचार करू लागला,
“शर्वाय आराध्याला काहीच कसं बोलला नाही? उलट तिच्यावर विश्वास दाखवला… हे असं झालंच कसं?”
कामात जराही चूक झालेली जराही चालत नसणारा शर्वाय तिला काहीच बोलला नाही, याचेच त्याला आश्चर्य वाटत होते. माधव मनातून नुसता चरफडत होता. आपला हा डाव फसला, आता अजून एका डावाची योजना करावी लागेल, अशाच विचारात तो होता.
शर्वायच्या त्या शांत राहण्यामुळे आणि विश्वासामुळे आराध्याच्या मनात शर्वायविषयीची ओढ वाढू लागली. तिला आता वाटू लागतं की, शर्वाय फक्त एक यशस्वी व्यावसायिकच नाही, तर एक आदर्श प्रमुख आणि उत्तम माणूसही आहे.


