दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 05 जून 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 15 ज्येष्ठ 1948; तिथि : पंचमी 25:19; नक्षत्र : श्रवण अहोरात्र;
- योग : ब्रह्मा 09:41; करण : कौलव 12:27;
- सूर्य : वृषभ; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:13;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार
टीम अवांतर
रुस्तम-ए-हिंद, मराठी कुस्तीगीर आणि कुस्ती-प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचा जन्म 5 जून 1950 रोजी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड या गावी झाला. त्यांचे वडील पहिलवान होते. त्यामुळे वडिलांनी कुस्ती खेळण्यातले हरिश्चंद्रांच्या अंगचे गुण हेरून त्यांना 1965 च्या सुमारास तालीम करण्यासाठी कोल्हापुरच्या गंगावेस तालमीत धाडले.
1969 मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी दादू चौगुले यांना हरवत त्यांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्याच वर्षी कानपूर येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी हिंदकेसरी किताबही जिंकला. 1970 मध्ये स्कॉटलंडमध्ये एडिंबरा येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून बिराजदारांनी आपली विजयी पताका सातासमुद्रापार गेली. या साऱ्या बहुमानाने हरिश्चंद्र बिराजदार हे नाव कुस्तीच्या विश्वामध्ये सर्वतोमुखी झाले, पण कुस्तीशौकिनांच्या मनात हरिश्चंद्र बिराजदार हे नाव अजरामर झाले ते त्यांनी बेळगाव येथील मैदानात दिल्लीचा प्रसिद्ध मल्ल सतपाल याला अस्मान दाखविल्यानंतर!
हेही वाचा – शर्वरीने राहुलला खूप मोठं गिफ्ट दिलं!
स्वातंत्र्यपूर्व काळात राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीकलेला मोठा आश्रय दिला, पण स्वातंत्र्योत्तर काळात हे चित्र बहुतांश बदलून गेले. कोल्हापूर ही कुस्तीपंढरी म्हणून नावलौकिक टिकवून होती. 1975 नंतर उत्तरेकडील मल्लांची स्वारी कोल्हापुरात थडकली आणि कुस्तीच्या विश्वात कोलाहल माजला. उत्तरेचा मल्ल सतपाल महाराष्ट्रातील नामवंत मल्लांना चारीमुंड्या चीत करीत होता. त्याला असमान दाखवण्याचे आव्हान बिराजदार यांनी स्वीकारले.
बिराजदार यांनी सतपाल याला 14 व्या मिनिटाला चितपट केले. खचाखच भरलेल्या मैदानात कोल्हापुरी फेटे उडविले गेले. ‘हरी रे हरी, तूने मारी भरारी’ अशा घोषणांनी सारे बेळगाव दुमदुमून गेले. तर, कुस्तीच्या माहेरघरात कोल्हापुरात जानेवारी महिन्यात दिवाळी साजरी झाली. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जागोजागी साखर वाटून कोल्हापूरकरांनी आपला आनंद व्यक्त केला. दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात दाखल झालेल्या हरिश्चंद्र बिराजदारांची कोल्हापूरकरांनी हत्तीवरून मिरवणूक काढली. संस्थाने खालसा झाल्यावर हत्तीवरून निघालेली ती पहिलीच मिरवणूक होती.
कुस्तीमधून निवृत्ती घेतल्यावर बिराजदार यांनी पुण्यातील गोकुळ वस्ताद तालीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरूवात केले. तिथे त्यांनी असंख्य शिष्य घडविले. 1971 साली बिराजदार यांना शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 1972 साली त्यांनी रूस्तम-ए-हिंद पुरस्कारने गौरविण्यात आले होते. त्यानंतर 1998 साली त्यांना दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला. याशिवाय 2006 साली भारत सरकारच्या ध्यानचंद पुरस्काराचे ते मानकरी ठरले. 14 सप्टेंबर 2011 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे; पण त्याची फार चिंता करू नका, कारण तुमचे उत्पन्न चांगले असेल. तुमची मते कुटुंबात गांभीर्याने विचारात घेतली जातील आणि त्याचे कौतुक देखील होईल. व्यावसायिक क्षेत्रातील वातावरण सुधारेल. आज स्वतःच्या जीवनशैलीत काही बदल करण्याचा विचार करू शकता. तसे करणे नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने हितकारक आहे.
वृषभ – अंगावर जबाबदारी घेऊन काम पूर्ण करण्याचा दिवस असेल. कोणत्याही प्रलंबित सरकारी कामाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात विवाहेच्छुकाचे लग्न जुळल्यासारखी एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. राजकारण किंवा सामाजिक वर्तुळात प्रतिष्ठा वाढू शकते. आईच्या आरोग्याबाबत थोडीशी काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी कोणाच्याही गोड बोलण्याला बळी पडू नका.
मिथुन – खर्च थोडा जास्त होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपले बजेट आणि गरजा यांचा ताळमेळ साधणे उत्तम राहील. व्यवसायात नवीन सौदे होऊ शकतात, फक्त सावधगिरी बाळगा. भूतकाळातील एखाद्या निर्णयाबद्दल सध्या थोडा पश्चात्ताप वाटू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंता वाढेल. लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने तुमचा मूड हलका होईल आणि तणाव कमी होईल.
कर्क – प्रत्येक गोष्टीचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. कठोर परिश्रमाचा मार्ग थोडा खडतर असेल, पण अडथळे हळूहळू दूर होऊ लागतील. नोकरीत किंवा कामात अपेक्षित परिणाम न मिळाल्यास थोडी अस्वस्थता येऊ शकते. दुसऱ्यावर अवलंबून न राहता, स्वत: काम उरकण्यावर भर द्या. कर्ज घेणे टाळणे शहाणपणाचे ठरेल. व्यवसायात केलेले बदल भविष्यात मोठे फायदे मिळवून देऊ शकतात.
सिंह – नवीन मालमत्ता किंवा मोठी वस्तू खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या, दुसऱ्याचे वाहन वापरणे टाळा. थोडा आळसवाणा दिवस वाटू शकतो आणि कामे पुढे ढकलावीत, अशी इच्छाही होऊ शकते. मात्र त्यामुळे नंतर कामाचा भार वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक सौहार्दपूर्ण होईल. घरी नवीन पाहुण्यांच्या आगमनाने आनंद मिळू शकतो.
कन्या – नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. भूतकाळातील चुकांमधून शिकून पुढे वाटचाल केल्यास नक्कीच यश मिळेल. संवादातून कौटुंबिक तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा, त्याने दिलासा मिळेल. भावंडांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. घराच्या नूतनीकरणाचे किंवा सजावटीचे कामही आज सुरू करू शकाल.
तुळ – आजचा दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. जोडीदारापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो, म्हणून मोकळेपणाने बोला. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. छंद आणि चैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढेल. समाजातील आदर आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत थोडे संवेदनशील असाल. तब्येतीची काळजी घ्या.
वृश्चिक – आज कामाचा ताण जास्त असू शकतो, पण तुमची नेतृत्व कौशल्ये इतरांना प्रभावित करतील. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील, पण त्यांना वैयक्तिक गोष्टी सांगणे टाळा. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या सरकारी कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. एखाद्या सहकाऱ्याच्या बोलण्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पण संयम बाळगा, लगेच प्रतिक्रिया देऊ नका.
हेही वाचा – धोंडा माझा भला…
धनु – संयम आणि प्रेमळ शब्द ही तुमची सर्वात मोठी शक्ती ठरेल. कामात दिरंगाई केल्यास नंतर समस्या निर्माण होऊ शकतात. संततीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. जुन्या आर्थिक व्यवहारांमधून किंवा आर्थिक तणावातून सुटका होण्याची शक्यता आहे. बोलताना संयम ठेवा, कोणी दुखवले जाणार नाही, याची काळजी घ्या.
मकर – नोकरीसंबंधीच्या समस्या हळूहळू सुटतील. व्यवसायात आणि कामात जोडीदार तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवल्यास सकारात्मक परिणाम मिळतील. काही सरकारी कामे पूर्ण होऊ शकतात. गुंतवणुकीसंबंधी काही सूचना मिळाल्यास, घाईने निर्णय घेणे टाळा. विशेषत: गुंतवणुकीच्या बाबतीत प्रलोभनांना भुलू नका, जाणकारांचा सल्ला घेतल्यानंतरच निर्णय घ्या.
कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी खास ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध राहतील, तुम्हाला काम करताना आनंद मिळेल. एका मोठ्या व्यावसायिक कराराला अंतिम रूप मिळू शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे सहजपणे पूर्ण होतील. संततीच्या शिक्षणासंदर्भात एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. त्यासाठी शिक्षकांचा सल्ला उपयुक्त ठरेल.
मीन – कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे, पण तो न वाढविणे शहाणपणाचे ठरेल. घरातील वडीलधाऱ्या सदस्यांकडून मिळणारा आधार तुम्हाला बळ देईल. एका कायदेशीर प्रकरणामुळे तुमची चिंता वाढू शकते, त्यामुळे सतर्क राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळेल. प्रवास करताना किंवा फिरताना महत्त्वाची माहिती मिळू शकते.


