पल्लवी खरोसे आंबेकर
तो हॉस्पिटलमध्ये ओटी बाहेर अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता… आतून त्याच्या बायकोच्या वेदनादायी किंचाळण्याचा आवाज येत होता… आणि तिच्या त्या आवाजाने याचं काळीज दुप्पट वेगाने धावत होत… खूप प्रेम होतं त्याचं… पण तो सध्या हतबल होता… त्याला वाटलं तरी तो तिला मदत करू शकत नव्हता! काहीवेळाने तिचा आवाज थांबला आणि एक नाजूकसा रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला… तो आवाज एकून अधीर झालेला तो ओटीकडे नजर लावून होता…
तेवढ्यात एक नर्स लगबगीने बाहेर आली…
“काँग्रॅच्युलेशन्स सर तुम्हाला मुलगी झाली…” तिने त्याचं अभिनंदन केलं आणि परत ऑपरेशन थिएटरमध्ये निघून गेली…
मुलगी झाली हे ऐकून तो खाली बेंचवर बसला… त्याच्या डोळ्यांतून अश्रूंची धार लागली… हेच ऐकण्यासाठी त्याचे कान किती आतूर झाले होते, हे त्याच त्यालाच ठाऊक… कितीतरी वर्षांनी हा आनंद त्याच्या आयुष्यात आला होता… खूपच भावूक झाला होता तो…
काहीवेळाने त्याला आत जायची परवानगी मिळाली… त्याने त्या छोट्याशा पिल्लाला हातात घेतलं… किती नाजूक होती ती, जणू कापसाचा गोळा…. इवले-इवले हात पाय, छोटंस नाक आणि गुलाबी ओठ… त्याने बायकोकडे नजर टाकली सेम तिच्यासारखी तर दिसत होती… अगदी तिचीच कॉपी…
त्याने त्याच्या पिल्लाला खाली पाळण्यात ठेवलं… आणि बायकोकडे वळला… ती बेडवर शांत झोपली होती. थकली होती खूप… त्याने हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि कपाळावर हलकेच किस केलं… “तू मला आज जगातला सगळ्यात मोठा आनंद दिलास… लव्ह यु शर्वरी…” म्हणत त्याने तिचा हात हातात घेतला आणि त्यावर किस करून तो तिला व्यवस्थित पांघरूण घालून बाहेर पडला.
हेही वाचा – About Website : ‘अवांतर’ नावामागची कथा…
गाडी काढली अन् तो थेट घरी गेला… त्याने सगळ्या नोकरांना सांगून बंगला नव्या नवरीसारखा सजवायला सांगितला… त्याला त्याच्या पिलूचं खूप जंगी स्वागत करायचं होतं! सगळ्या दुनियेला त्याला ओरडून सांगायचं होतं की, तो आज बाप झाला… त्याच्या आयुष्यात एक क्युटशी परी आली… जिनं आता त्याचं आयुष्यच बदलवून टाकलं!
तो आज खूप आनंदी होता. आता त्याच्या आयुष्यात शर्वरीशिवाय कोणीतरी आलं होत… त्याची फॅमिली आता कम्प्लिट झाली होती… तो खुशीतच फ्रेश झाला… शर्वरीसाठी त्याने मेडला सांगून हलकंस, पण पौष्टिक जेवण बनवून घेतलं आणि परत हॉस्पिटलमध्ये निघाला…
आता शर्वरीला स्पेशल रूममध्ये शिफ्ट केलं होतं… तो आत आला तर, शर्वरी उठून बसली होती. त्याने तिच्याकडे एक पाहिलं, तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आणि आनंद दिसत होता… का नाही दिसणार? तब्ब्ल दहा वर्षांनी त्यांच्या घरात पाळणा हलला होता!
काय काय केलं नव्हतं तिनं हे सुख मिळवण्यासाठी… उपास-तापास, बुवा, दवाखाना सर्व काही… आणि त्याचं फळ एवढ्या वर्षांनी मिळालं…
त्याने जवळ जाऊन तिला मिठी मारली… तिनेही ती मिठी घट्ट केली आणि हळूच कानात म्हणाली “काँग्रॅच्युलेशन्स राहुल…”
“तुलाही…” म्हणत त्याने तिला दूर केल आणि तिचं जेवण एका प्लेटमध्ये वाढून तिच्या समोर ठेवलं… तिलाही खूप भूक लागली होती… तिने जेवण उरकून घेतलं… तेवढ्यात पिलूने पाळण्यात चुळबूळ सुरू केली… राहुलने पटकन तिला उचलून घेतलं आणि शर्वरीजवळ आणून दिलं… तिने तिला पाजलं तसं ती परत शांत झोपून गेली…
दोन दिवसांनी त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली…
शर्वरी आणि बाळाला घेऊन राहुल घरी आला… शर्वरीची नजर बाहेर गेली तर त्यांचा बंगला रोषणाईने पूर्ण उजळून निघाला होता… ती गाडीतून हळूच खाली उतरली….गेटपासून फुलांच्या पाकळ्या आंथरल्या होत्या… तिला ते पाहून खूप आनंद झाला. तिने समाधानाने त्याच्याकडे पहिले… तर तो पिलूला हळूवारपणे हातात पकडून काळजीपूर्वक चालत होता… त्यांना दरवाज्यातच थांबवून रमा काकूने त्यांना ओवाळून आत यायला सांगितलं… (रमा काकू त्यांची मेड कम काकू होती.)
हेही वाचा – बोल माधवी… मनात चाललेले महाभारत!
एकेदिवशी शुभमुहूर्त बघून तिचं नामकरण करण्यात आलं… त्याने त्या दिवशी खूप मोठी पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला सगळ्या नामवंत लोकांनी हजेरी लावली होती… सगळे त्यांचं कौतुक करत होते…
असेच दिवसावर दिवस जात होते… तो तर ऑफिस आणि आपल्या मुलीमध्येच बिझी असायचा… खूप जीव होता त्याचा मुलीवर… ती जे मागेल ते तो तिला पुरवत असे… पण शर्वरीला हे पटायचं नाही…. तिने त्याला कधी विरोध करायचा प्रयत्न केला तर, तो तिलाच ओरडायचा… पण तिला नेमकं काय म्हणायचं आहे, ते तो कधीच समजून घ्यायचा नाही… तो तर फक्त तिचे लाड आणि हट्ट पुरवत असायचा… यामुळेच शर्वरी आणि राहुलमध्ये आता बरेच खटके उडायला लागले… तरीही शर्वरी त्याला सांभाळून घ्यायचा प्रयत्न करायची; पण नाही…
आजकाल ती खूपच हट्टी होत चालली होती… आणि तिचा हाच हट्टीपणा एकेदिवशी या दोघांची वाट लावणार होता…
क्रमशः
नोट : ही कथा लेखकाची स्वरचित असून पूर्णपणे काल्पनिक आहे. याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर काही संबंध आढळून आलाच तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.


