सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
हें कहीं नव्हतें देखिलें । म्हणोनि भय जें तुज उपजलें । तें सांडीं एथ संचलें । असों दे प्रेम ॥638॥ आतां करूं तुजयासारिखें । म्हणितलें विश्वतोमुखें । तरि मागील रूप सुखें । न्याहाळीं पां तूं ॥639॥
संजय उवाच – इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः ॥ आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥50॥
ऐसें वाक्य बोलतखेंवो । मागुता मनुष्य जाहला देवो । हें ना परि नवलावो । आवडीचा तिये ॥640॥ श्रीकृष्णचि कैवल्य उघडें । वरी सर्वस्व विश्वरूपायेवढें । हातीं दिधलें कीं नावडे । अर्जुनासी ॥641॥ वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्नासि दूषण ठेविजे । नातरी कन्या पाहूनियां म्हणिजे । मना न ये हे ॥642॥ तया विश्वरूपायेवढी दशा । करितां प्रीतीचा वाढु कैसा । सेल दीधलीसे उपदेशा । किरीटीसि देवें ॥643॥ मोडोनि भांगाराचा रवा । लेणें घडिलें आपलिया सवा । मग नावडे जरी जीवा । तरी आटिजे पुढती ॥644॥ तैसे शिष्याचिये प्रीती जाहलें । कृष्णत्व होतें तें विश्वरूप केलें । तें मना नयेचि मग आणिलें । कृष्णपण मागुतें ॥645॥ हा ठाववरी शिष्याची निसी । सहाते गुरु आहाती कवणे देशीं । परी नेणिजे आवडी कैशी । संजयो म्हणे ॥646॥ मग विश्वरूप व्यापुनि भोंवतें । जें दिव्य योगतेज प्रगटलें होतें । तेंचि सामावलें मागुतें । कृष्णरूपीं तिये ॥647॥ जैसें त्वंपद हें आघवें । तत्पदार्थी सामावे । अथवा द्रुमाकारु साठवे । बीजकणिके जेवीं ॥648॥ नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा । गिळी चेइली जीवदशा । श्रीकृष्णें योगु तैसा । संहारिला तो ॥649॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें
अर्थ
हे विश्वरूप म्हणजे (पूर्वी) कधी न पाहिलेली गोष्ट, म्हणून तुला याचे भय उत्पन्न झाले आहे. ते भय टाक आणि या विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम साठवलेले राहू दे. ॥638॥ आता तुझ्या म्हणण्यासारखे करू. तर अर्जुना, मागील (सगुण) रूप तू खुशाल पाहा, असे सर्व बाजूंनी ज्याला मुखे आहेत असा विश्वरूप परमात्मा श्रीकृष्ण म्हणाला. ॥639॥
संजय म्हणाला, असे बोलून याप्रमाणे वासुदेवाने पुन्हा स्वत:चे (पूर्वीचे) रूप दाखविले आणि तो महात्मा पुन्हा सौम्यस्वरूपधारी होऊन भयभीत अर्जुनाला धीर देता झाला. ॥50॥
महाराज (राजा धृतराष्ट्रा), असे वाक्य बोलताक्षणीच देव पुन्हा मनुष्य झाले, यात काही मोठेसे आश्चर्य नाही. परंतु श्रीकृष्णास अर्जुनाविषयी जे प्रेम होते, त्या प्रेमाचेच मोठे आश्चर्य आहे (असे संजय म्हणाला). ॥640॥ श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म होतेच; असे असूनसुद्धा त्या परब्रह्म श्रीकृष्णाने विश्वरूपाएवढे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले, असे असून ते (विश्वरूप) अर्जुनाला आवडले नाही. ॥641॥ ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूचा स्वीकार करून (मग ती वाईट म्हणून) टाकून द्यावी किंवा ज्याप्रमाणे अस्सल रत्नात काहीतरी खोड काढीत बसावे, अथवा मुलीला पाहून मग ती आपल्याला मानत (मान्य) नाही, असे ज्याप्रमाणे म्हणावे, ॥642॥ श्रीकृष्णांनी आपल्या चतुर्भुज सगुण देहाचा विश्वरूपाएवढा विस्तार केला. या गोष्टीवरून अर्जुनाविषयी श्रीकृष्णाच्या प्रेमाची वाढ कशी होती (हे स्पष्ट दिसते). अर्जुनाला देवांनी विश्वरूप दाखविले हा त्याला शेलका (अति उत्कृष्ट) उपदेश केला. ॥643॥ सोन्याची लगड मोडून त्याचा जसा आपल्या इच्छेनुरूप दागिना कारावा आणि मग तो दागिना जर आपल्या मनाला आवडला नाही, तर तो पुन्हा आटवून टाकावा, ॥644॥ त्याप्रमाणे शिष्याच्या प्रीतीकरता वरील दृष्टांताप्रमाणे गोष्ट घडली. प्रथम सगुण श्रीकृष्णमूर्ती होती, त्याचे विश्वरूप केले, ते अर्जुनाच्या मनाला येईना, मग सगुण कृष्णरूप पुन्हा आणले. ॥645॥ येथेपर्यंत शिष्याने दिलेला त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशात आहेत? परंतु, देवाचे अर्जुनाविषयी कसे प्रेम आहे, ते कळत नाही, असे संजय म्हणाला. ॥646॥ मग श्रीकृष्णाने विश्वरूपाचा पसारा घालून आपल्या सभोवती जे अलौकिक योगाचे तेज प्रकट केले होते, तेच त्याने पुन्हा त्या सगुण कृष्णरूपात एकत्र करून साठविले. ॥647॥ ज्याप्रमाणे ‘त्वम्’ हे सर्वपद (अल्पज्ञ, अल्पशक्तिमान्, परतंत्र, परिच्छिन्न अशा जीवाचे लक्ष्य जे कूटस्थ चैतन्य ते) ‘तत्’ पदाच्या अर्थामध्ये (सर्वज्ञ, सर्वशक्तिमान्, स्वतंत्र, विभू अशा ईश्वरतत्वाचे लक्ष्य जे ब्रह्म, त्यात) सामावते. अथवा वृक्षाचा सर्व आकार जसा बीजाच्या कणात साठवतो, ॥648॥ अथवा जीवाची जागृतावस्था ही स्वप्नाच्या सर्व विस्ताराला ज्याप्रमाणे गिळते, त्याप्रमाणे तो योग (विश्वरूपाचा विस्तार) श्रीकृष्णांनी आपल्यात सामावून घेतला. ॥649॥
क्रमश:
हेही वाचा – साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026


