काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक विषय फार गाजत होता — राधा ही ऐतिहासिक व्यक्ती होती की नव्हती? एक गट ब्रह्मवैवर्त पुराण आणि इतर संदर्भ देत राधेचे अस्तित्व मान्य करत होता, तर दुसरा गट महाभारतात राधेचा स्पष्ट उल्लेख नाही, तसेच श्रीमद्भागवतात केवळ एका विशेष गोपीचा उल्लेख आढळतो, ती कदाचित राधा असावी असे म्हणत होता.
हे सर्व वाचताना मला कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचायचे नव्हते. कारण मला त्या वादापेक्षा एक वेगळाच प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटू लागला. रुक्मिणीचा स्पष्ट उल्लेख श्रीमद्भागवत, हरिवंश आणि इतर अनेक ग्रंथांत आढळतो. सत्यभामाही कृष्णाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. तरीसुद्धा संतांच्या अभंगांत, गवळणच्या गोडव्यात, कवींच्या कवितांत आणि लेखकांच्या शब्दांत राधाच इतकी पुन्हा पुन्हा का उमटत गेली असावी?
कदाचित काही व्यक्ती इतिहासात असतात आणि काही लोकांच्या भावविश्वात… आणि कधी कधी भावविश्वात जिवंत राहणाऱ्या व्यक्ती इतिहासापेक्षाही अधिक प्रभाव टाकून जातात.
इथे मी रुक्मिणी आणि राधेची तुलना करत नाही. दोघींच्याही भूमिका तितक्याच महत्त्वाच्या आहेत. एकीकडे वास्तव, जबाबदारी आणि सामाजिक व्यवस्था आहे; तर दुसरीकडे मनाच्या अतिशय आत दडलेली, शब्दांच्या पलीकडची प्रेमभावना आहे… कदाचित अपूर्ण गोष्टी मनात जास्त काळ घर करून राहतात! जे सहज मिळून जातं ते आयुष्याचा भाग होतं; पण जे पूर्णत्वाला जात नाही, ते आठवण बनून मनात रेंगाळत राहतं… आणि कदाचित सर्जनशीलतेचं मूळही इथेच दडलेलं असावं!
पूर्णत्व शांत करतं; पण अपूर्णता सतत मनाशी संवाद साधत राहते. ती प्रश्न निर्माण करते, आठवणी जाग्या ठेवते, आणि माणसाला व्यक्त व्हायला भाग पाडते. म्हणूनच कदाचित अनेक महान कविता, अभंग, गवळणी आणि प्रेमकथा या पूर्णत्वातून नाही, तर अपूर्णतेतून जन्माला आल्या असतील.
हेही वाचा – ….म्हणून ‘सुकून’ शोधणं गरजेचं!
खरंतर “राधा” हा शब्द “धारा” या शब्दाचा उलटा आहे. धारा म्हणजे ठरलेला प्रवाह. समाजाने आखून दिलेली दिशा. लग्न, संसार, कर्तव्य, मर्यादा, व्यवहार… आणि त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने शांतपणे वाहणारी भावना म्हणजे कदाचित राधा.
पूर्ण झालेल्या कथा जगल्या जातात, अपूर्ण राहिलेल्या कथा लिहिल्या जातात. म्हणूनच कदाचित संतांच्या शब्दांत, गवळणींच्या सुरांत आणि कवितांच्या ओळींमध्ये राधा पुन्हा पुन्हा जन्म घेत राहिली असेल. कारण राधा ही कदाचित केवळ एक व्यक्तिरेखा नाही, तर मनात आयुष्यभर न संपणारी एक भावना आहे.
हेही वाचा – ती अन् तिचं स्वतंत्र अस्तित्व!
धारा आणि राधा
ही म्हणजे वास्तव भूमिका आणि मर्यादेचे भान
ती म्हणजे अफाट अनाकलनीय शुद्ध प्रेमाचे दान
ही म्हणजे खांद्यावर कर्तव्याचा भार
ती म्हणजे मुरलीचे सूर अलवार
ही म्हणजे कुंकू जोडवे मंगळसूत्र
ती म्हणजे सखा सहेला परममित्र
ही म्हणजे सामाजिक व्यवस्था
ती म्हणजे आंतरिक अवस्था
ही म्हणजे धारा
ती म्हणजे राधा


