मागील दोन लेखांत आपण लेखनातून आणि वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याबाबत जाणून घेणार आहोत.
संवादाविषयी थोडक्यात…
संवाद म्हणजे संभाषण, बातचीत, चर्चा, वार्तालाप होय. संवाद प्रक्रियेत कमीत कमी दोन व्यक्तींचा सहभाग अपेक्षित आहे. पण यास देखील अपवाद आहे. कित्येकदा आपण स्वतःशी देखील संवाद साधत असतो आणि याला आपण ‘स्वसंवाद’ किंवा ‘आत्मसंवाद’ असे संबोधतो.
संवादाची काही ठळक उदाहरणे म्हणजे कौटुंबिक संवाद, मित्र परिवारातील संवाद, व्यवसायधंद्यातील कामानिमित्त संवाद, गुरुजी /शिक्षक /अध्यापक आणि विद्यार्थी /विद्यार्थीनी यांचा शिक्षणासंबंधित संवाद, सभेमध्ये वक्ता आणि श्रोते यांतील संवाद, प्रवासातील संवाद तसेच दैनंदिन जीवनात ओळखीच्या तसेच अनोळखी व्यक्तींशी संवाद इत्यादी. या आणि तत्सम उदाहरणांवरून संवादाचे आपल्या आयुष्यातील उपयुक्त स्थान सहजी लक्षात येईल.
हेही वाचा – वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
संवाद बोलण्यातून अथवा लिखित स्वरूपात साधता येतो. सर्वसाधारणपणे नानाविध भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. असे असले तरी देहबोलीतून संवाद साधणे हे देखील संवादाचे उपयुक्त माध्यम आहे.
संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
संवाद हे व्यक्त होण्याचे प्रभावी साधन आहे. व्यक्त होण्याच्या या प्रक्रियेतून विचारांचे आदानप्रदान होते.
संवादातून व्यक्तिला पुढील मानसिक आरोग्य लाभ प्राप्त होतात :
- संवादातील व्यक्त होण्याच्या प्रक्रियेमुळे मन मोकळे होते, परिणामी मनावरील ताण हलका होतो.
- संवादातून समजून घेणे तथा समजावून सांगणे या दोन्ही गोष्टी सुलभ होतात आणि गैरसमजाला थारा मिळत नाही. यामुळे मानसिक सामंजस्य साधले जाते.
- संवादातून समस्यांवर समर्पक उपाय ज्ञात होत असल्याने समस्या निवारण सुकर होते. यामुळे तणावमुक्त जीवनाचा आनंद घेता येतो.
- संवादातून विचारांची देवाणघेवाण होत असल्याने व्यक्तीचा दृष्टिकोन व्यापक तथा सकारात्मक बनतो.
- संवाद कौशल्य व्यक्तिमत्त्व विकास प्रक्रियेचे मूलभूत अंग आहे.
- संवादातून आत्मविश्वास वृद्धींगत होतो.
- संवादातून मनःशांती तसेच मनःस्वाथ्य लाभते आणि यातूनच मानसिक आरोग्य संवर्धन होते.
संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ लक्षात आल्यावर संवाद साधावा, असे वाटले तर आवर्जून साधा. या लेखात संवाद म्हणजे अर्थातच सुसंवाद अभिप्रेत असून विसंवादाला अलिप्त ठेवणे श्रेयस्कर असेल. असे केल्यास मानसिक आरोग्य खचितच निरामय होईल.
हेही वाचा – लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
निवृत्तीनंतर मी ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’, ही तीन पुस्तके लिहिली. या तीनही पुस्तकांच्या माध्यमातून मी साधकांशी वैयक्तिक संवाद साधण्याचा मनापासून केलेला प्रयत्न पुस्तकांना मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादांतून तसेच उत्स्फूर्त अभिप्रायांतून सिद्ध झाला आहे.
आपण पुढील लेखात आरोग्यावर सुपरिणाम करणाऱ्या अशाच एका विषयाबाबत जाणून घेणार आहोत.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


