दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 23 मे 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 02 ज्येष्ठ शके 1948; तिथि : अष्टमी 28:26; नक्षत्र : मघा 26:08;
- योग : ध्रुव 06:13, व्याघात 28:42; करण : विष्टि 16:40;
- सूर्य : वृषभ; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:08;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
दुर्गाष्टमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
सौंदर्यवती महाराणी गायत्री देवी
टीम अवांतर
जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक अशी ख्याती मिळवलेल्या दिवंगत महाराणी गायत्री देवी यांचा जन्म 23 मे 1919 रोजी लंडन येथे झाला. लंडन, शांतिनिकेतन आणि स्वित्झर्लंड येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पुढे गायत्री देवी यांचा विवाह जयपूरचे महाराजा सवाई मान सिंह (द्वितीय) यांच्यासोबत 9 मे रोजी 1940 रोजी झाला. हा त्यांचा प्रेमविवाह होता. केवळ महाराणीच नव्हे तर, उत्तम घोडेस्वार आणि पोलो प्लेअर म्हणून देखील त्या ओळखल्या जात होत्या. त्यांना शिकारीचीही आवड होती. याशिवाय, त्यांना विविध आकर्षक गाड्यांचाही शौक होता. त्यांच्याकडे मर्सिडीज बेंज, रोल्स रॉयल आणि एक विमान देखील होते.
हेही वाचा – मन माऊली सकळांची…
आकर्षक डोळे, शॉर्ट हेअर्स, डोक्यावरून पदर आणि शिफॉन साडीत खुलणारे अप्रतिम सौंदर्य म्हणजेच जयपूरच्या महाराणी गायत्री देवी असं म्हटलं जात असे. भारतात पेस्टल कलरच्या शिफॉन साड्यांचा ट्रेंड त्यांनी सुरू केला होता. त्या दिसायला इतक्या सुंदर होत्या की, त्यांना कधीच मेकअप करण्याची गरज भासली नाही. त्यामुळेच त्यांच्या सौंदर्याची चर्चा केवळ भारतातच नाही तर, संपूर्ण जगभरात झाली होती. धाडसी व्यक्तीमत्व आणि सौंदर्यासाठी त्या ओळखल्या जायच्या. प्रसिद्ध फॅशन मॅगझिन ‘वोग’ने त्यांना जगातील सर्वाधिक सुंदर 10 महिलांपैकी एक मानले होते.
गायत्री देवी राजकारणातही सक्रिय होत्या. स्वातंत्र्यानंतर 1962 ते 1975 या काळात महाराणी गायत्री देवी खासदार म्हणून सलगपणे निवडून आल्या होत्या. 1962मध्ये त्यांनी स्वतंत्र पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली होती आणि काँग्रेसच्या उमेदवार शारदी देवी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. एकंदर 2 लाख 50 हजार 270 पैकी गायत्री देवींना 92 हजार 909 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या उमेदवाराला 35 हजार 217 मते मिळाली. इतक्या मोठ्या फरकाने निवडणूक जिंकल्यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलं. निवडून आल्यावर त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यांसाठी वाहून घेतले, विशेषतः राजस्थानमध्ये पडदा पद्धत बंद करण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी काम केले.
महाराणी गायत्री देवी आणि इंदिरा गांधी यांचे शिक्षण एकत्र झाले असले तरी गांधी यांच्या टीकाकार म्हणून गायत्री देवी ओळखल्या जायच्या. आणीबाणीच्या काळात अघोषित मालमत्तेच्या आरोपाखाली 1975 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. जवळपास 5 महिने त्या तिहार जेलमध्ये कैद होत्या. तुरुंगातून सुटल्यानंतर वर्षभरानंतर राजकारणातून त्या निवृत्त झाल्या. ‘अ प्रिन्सेस रिमेंबर्स’ या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. वयाच्या 90व्या वर्षी 29 जुलै 2009 ला त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रभाव दोन्ही वाढतील. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्या जातकांची प्रतिमा अधिक मजबूत होईल. तापट स्वभावामुळे लहानसहान गोष्टीही अधिक गंभीर बनू शकतात. त्यामुळे संयम बाळगा. कामाच्या ठिकाणी असणाऱ्या राजकारणापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल.
वृषभ – अनेक कामांमुळे तुम्ही अधिक व्यग्र रहाल. मालमत्ता खरेदी-विक्री बाबतचे तुमचे स्वप्न साकार होऊ शकते. व्यवसायात झालेला चांगला नफा आनंद देऊन जाईल. बाहेरच्यांच्या सल्ल्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कायदेशीर बाबींमधील थोडासा निष्काळजीपणा देखील अधिक समस्यांना कारणीभूत ठरू शकतो.
मिथुन – समाजसेवा आणि चांगल्या कार्यांमुळे तुमचे नाव प्रसिद्ध होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांनी आपल्या कठोर परिश्रमात ढिलाई करू नये. व्यवसायात कल्पकतेने नवनव्या योजना तयार केल्यास चांगले यश मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो; पण नेटाने काम करा, सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
कर्क – आजचा दिवस सकारात्मक असेल, पण एखाद्या गोष्टीमुळे तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. भावंडांसोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्यावर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करू शकते, त्यामुळे विचारपूर्वक बोला. संततीच्या यशामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. जंक फूड खाण्याचे टाळा, तब्येतीची काळजी घ्या.
सिंह – आजूबाजूला सुरू असणाऱ्या वादांपासून दूर राहा. नोकरी तथा व्यवसायाच्या ठिकाणी कामाची जबाबदारी स्वतः उचला आणि इतरांवर जास्त अवलंबून राहणे टाळा. जुने आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतात. संततीसोबत प्रवास करण्याची संधी मिळेल. एखाद्या जुन्या मित्रासोबतची अनपेक्षित भेट तुमचा दिवस खास बनवू शकते.
कन्या – आज, यश आणि प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली शासकीय कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगा. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. जीवनशैली सुधारण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.
तुळ – भविष्य सुरक्षित करण्यासाठी नवीन गुंतवणुकीच्या योजना आखू शकता. कायदेशीर बाबींमधील निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. एखाद्या सहकाऱ्याच्या वक्तव्यामुळे दुखावले जाऊ शकता. कुटुंबातील एखाद्या सदस्याला कामानिमित्त दूर जावे लागू शकते, ज्यामुळे भावनिक वातावरण निर्माण होऊ शकते.
वृश्चिक – व्यवसायातील नवीन कामात नफा मिळू शकतो. उत्पन्नातील वाढ आनंद घेऊन येईल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. जोडीदाराच्या करिअरमध्येही एक नवीन संधी निर्माण होऊ शकते. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वडिलांचा सल्ला अत्यंत फायदेशीर ठरेल.
हेही वाचा – पालक शाळा…. एक स्तुत्य आणि आवश्यक उपक्रम
धनु – आज आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. तुमची निर्णयक्षमता मजबूत असल्याने इतरांच्या प्रभावाखाली येणे टाळा. कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो, सतर्क रहा. धार्मिक कार्यक्रमांमुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. विद्यार्थ्यांना यशासाठी थोडा आणखी जोर लावावा लागेल.
मकर – प्रवासात किंवा पर्यटनस्थळी काही नव्याने ओळखी होतील, त्यांचा भविष्यात फायदा होऊ शकतो. राजकारणात असलेल्या व्यक्तींना उच्च पद किंवा सन्मान मिळू शकतो. नवीन वाहन खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. पूर्वीच्या व्यवहारांशी संबंधित समस्यांमुळे थोडी चिंता वाटू शकते. संततीकडून आलेली आनंदाची बातमी तुमचा दिवस खास बनवेल.
कुंभ – नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे चीज होईल, वरिष्ठांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. संततीसोबत वेळ घालवल्याने तुमचा सर्व तणाव दूर होईल. वडिलांकडून एखादी सुखद चकित करणारी भेटवस्तू मिळू शकते. प्रवास करताना तुमच्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. मात्र, तब्येतीचीही काळजी घ्या, पथ्यपाणी सांभाळा.
मीन – कामातील हलगर्जीपणामुळे भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणून सर्व जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करा. तसेच, यासाठी कोणावर अवलंबून राहू नका, अन्यथा अडचणी वाढतील. एकूणच कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. इतरांच्या बाबतीत अनावश्यक सल्ला देणे टाळा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.


