साल 1735… लंडनमधले संध्याकाळचे पाच वाजले होते. सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या दगडी भिंती थंडीनं जणू गोठल्या होत्या, पण बालविभागात सुरू असलेला आरडाओरडा मात्र थांबण्याचं नावच घेत नव्हता…
“मला मरायचं नाही… आई, मला वाचवऽऽऽ” अकरा वर्षांचा कोवळा विल्यम ब्लॅकमन बेडवर वेदनेनं अक्षरश: तडफडत होता… त्याचा चेहरा जणू आगीच्या भट्टीतून आल्यासारखा लालबुंद झाला होता, डोळे पांढरेफटक पडले होते आणि पोटात बेंबीच्या खाली उजव्या बाजूला भयंकर वेदना होत होत्या… पोट कडक झालं होतं. जिथं दुखत होतं तिथं एक कडक गठ्ठा तयार झाला होता, हात लावायचा उशीर बंदुकीतून गोळ्या निघाव्या तशा उलट्या सुरू…
एव्हाना तापही 104वर पोहोचला होता, प्रत्येक श्वास घेताना त्याच्या तोंडून नुसता आक्रोश बाहेर पडत होता..
बाहेर व्हरांड्यात उभ्या असलेल्या शल्यचिकित्सकांनी मान नकारात्मकपणे हलवली आणि मान खाली घातली… “हर्निया बर्स्ट झालाय! वेदनेचा शेवटचा टप्पा… हा थोड्याच वेळचा पाहुणाय!”
तेवढ्यात गर्दीतून एक माणूस पुढं आला. लांब काळा कोट, काळी हॅट, डोळ्यात चमक असलेला क्लॉडियस एमॅंड. राजाचा वैयक्तिक शल्यचिकित्सक, युद्धभूमीवर शेकडो गोळ्या काढणारा, हातं कापणारा पण कधीही मागं न हटणारा… एखाद्या योद्ध्यासारखा!
हेही वाचा – दिग्या नव्हे, ‘दिगास’… फ्रेंच अवलिया!
तो फक्त एक वाक्य बोलला, “त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये न्या… मी बघतो.”
सर्व एकमेकांकडं बघू लागले… “पण सर, ही केस हाताबाहेर गेलीय… आतडं फिरलंय… कुणीही हात लावत नाहीये!”
क्लॅाडियसनं डोळे वटारले, “मी म्हणालो ना, मी करतोऽऽ”
ऑपरेशन थिएटरमध्ये फक्त तेव्हाच्या मंद दिव्यांचा पिवळा प्रकाश पसरला होता… विल्यमला लाकडी टेबलावर बांधलं गेलं… त्याचे हात-पाय घट्ट दोरीने बांधले आणि तोंडात कापडाचा बोळा ठासून दिला म्हणजे ओरडताना जीभ चावणार नाही आणि ओरडण्याचा आवाजही येणार नाही… आणि भूल? तेव्हा भूलशास्त्र विकसित झालं नव्हतं, फक्त एक मोठा ग्लास अफूचं पाणी पाजलेलं होतं आणि नातलगांनी देवापुढं हात जोडले होते…
क्लॅाडियसन् चाकू हातात घेतला. त्याचे सहाय्यक जाम घाबरले होते, भर थंडीत त्यांना घाम फुटला होता… “पण… सर, जर आतडं फाटलं तर…” कुणीतरी चाचरत पुटपूटलं..
“मग मरू द्या… पण मी हार मानणार नाही.”
पहिला चिरा पडली आणि रक्ताची चिळकांडी उडाली. चाकू खोलवर गेला होता… आत जे काही दिसलं ते बघून सगळे जागीच थिजले…
एक हर्नियाचं पाऊच आणि त्यात अडकलेला अन् सुजून टम्म झालेला काळानिळा ॲपेंडिक्स… आणि फक्त एवढंच नव्हतं… त्यातून चमकली एक चंदेरी पिन… या पठ्ठ्यानं कधीतरी खेळता-खेळता गिळलेली!
पिन थेट ॲपेंडिक्समध्ये घुसली होती आणि तिथं प्रचंड संसर्ग झाला होता… ॲपेंडिक्स फाटून हर्नियात अडकला होता… मृत्यूचं परफेक्ट जाळं तयार झालं होतं…
क्षणभर क्लॅाडियसचाही हात थरथरला… फक्त एक सेकंद तो दात-ओठ खात म्हणाला, “हा भागच कापायचाय… पूर्ण… शेवटपर्यंत…”
चाकू फिरला… ॲपेंडिक्स बाहेर काढलं गेला. त्याच्यातून ग्लासभर पस निघाला त्याची दुर्गंधी पसरली अन् एक सहाय्यक बेशुद्ध होऊन खाली कोसळला. शेवटचा टाका पडला… रक्त थांबलं…. विल्यम अजून श्वास घेत होता… हळूहळू… पण घेत होता!
हेही वाचा – Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!
रात्रभर क्लॅाडियस त्या मुलाच्या बाजूला बसून राहिला…
सकाळचे सात वाजले, तेव्हा विल्यमने डोळे किलकिले केले आणि हळू आवाजात म्हणाला, “मला दुखत नाहीये आता…”
क्लॅाडियसच्या डोळ्यात पाणी तरळलं… त्यानं आवंढा गिळत फक्त मान हलविली.
ती रात्र आणि तो चिरा वैद्यकीय इतिहासात कायमचा कोरला गेला. जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी…
आज आपण जेव्हा ॲपेंडिक्सचं ऑपरेशन म्हणतो, तेव्हा हसतो… पण त्या रात्री लंडनच्या त्या अंधाऱ्या खोलीत खरंच एक युद्ध झालं होतं अन् त्या युद्धात माणूस जिंकला होता… एक अकरा वर्षांच्या कोवळ्या मुलानं आणि एका धाडसी शल्यचिकित्सकानं मृत्यूला चक्क मागं लोटलं होतं…
तो दिवस होता 6 डिसेंबर 1735!


