भाग – 24
समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू होतं आणि आराध्या ते लक्षपूर्वक ऐकत होती… कृत्तिकाने तिला काही मुद्दे लिहून घ्यायला सांगितले, तेवढ्यातच दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. दरवाज्यातून माधव आत आला… माधव तिच्याकडे पाहतो… पण चेहऱ्यावर ओळखीचा कोणताही भाव नाही. तो अगदी व्यावसायिक थाटात, शांतपणे बोलतो,
“या टीमसोबत मी काम करणार आहे. मी नवीन COO – माधव राजाध्यक्ष!”
आराध्याचं मन क्षणभर सुन्न होतं… पण तिने संयम राखत सहजपणे ‘नमस्कार’ केलं. माधवने फक्त मान हलवली.
तिच्या मनात प्रश्न गडद होतो – हा इथे का आहे? आणि त्याचं उद्दिष्ट नक्की काय आहे?
तिचा चेहरा तसा शांत… पण डोळ्यांमध्ये एक गूढ अस्वस्थता होती.
कॉन्फरन्स संपल्यानंतर सगळे उठून गेले. आराध्याही आपली फाइल आणि वही उचलत होती, तेवढ्यात मागून एक गंभीर, पण सौम्य आवाज आला —
“आराध्या… क्षणभर थांबशील का?”
ती वळली. माधव समोर उभा होता. आता चेहऱ्यावर किंचित हसू ठेवून तो बोलू लागला…
“खूप बदल झालाय तुझ्यात. त्या दिवशी पहिल्यांदा पाहिलं होतं… आणि आज इथे, एका कॉर्पोरेट टीमचा भाग बनून उभी आहेस.”
आराध्या चक्रावली. पण तिनं शांतपणे उत्तर दिलं —
“आयुष्य जेव्हा संधी देतं, तेव्हा त्याचं स्वागत करायला हवं. खरं ना?”
माधव हसला. पण त्याच्या नजरेत अजूनही काही अनोळखी छटा होत्या. तो पुढे सरकला आणि हळूवार स्वरात म्हणाला —
“इथल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागतं मला… जेवढं काम, तेवढाच माणसांचा अंदाज. विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे.”
आराध्या काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली—
“विश्वास मिळवावा लागतो… तो असाच दिला जात नाही.”
त्या क्षणी त्यांची नजर भिडली — न बोलताच बरंच काही दोघांच्या डोळ्यांतून वाहू लागलं… माधव पुढे काहीच बोलला नाही. फक्त मान हलवून तो बाहेर निघून गेला. आराध्या मात्र ताठ उभी राहिली… पण तिच्या मनात एकच विचार आला…
हेही वाचा – फाइलवरची सही बघून आराध्या चक्रावते…
“हा इथे नेमका काय शोधतो आहे? …आणि माझा त्याच्याशी खरा सामना होणं आता टळणार नाही.”
कॉन्फरन्स हॉलमधून बाहेर पडताना आराध्याचं मन गोंधळलेलं होतं. शर्वायच्या ऑफिसमध्ये माधव दिसेल, याची तिला कल्पना नव्हती. पण त्याने आज ज्या नजरेनं तिच्याकडे पाहिलं, त्या नजरेत ओळखीची झाक होती, पण त्यात एक विचित्र छाया होती — जणू काही त्याच्या मनात काही वेगळंच सुरू होतं.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तिचं ट्रेनिंग सुरू होतं. शर्वायने स्वतः तिचा रिपोर्टिंग हेड म्हणून एक सीनियर महिला — वैशाली मॅडम — नेमल्या होत्या. त्या खूप प्रोफेशनल, पण समजूतदार होत्या.
आराध्या शांतपणे सर्व शिकत होती. पण ऑफिसमध्ये काहींच्या नजरा तिच्याभोवती सतत फिरत होत्या. तिच्या साधेपणातली ती गोडी — एखादं रहस्य पिळवटून लपवलेलं असावं, असं वाटावं अशी — कुणाला तरी खटकत होती, कुणाला भुरळ घालत होती.
कॉफी मशीनजवळ दोन कर्मचाऱ्यांची कुजबूज ऐकू आली—
“तीच ना, नवीन आलीय… शर्वाय सरांनी स्वतः सिलेक्ट केली म्हणे?”
“हो, पण म्हणे इंटरव्ह्यू फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झाला… विचित्रच वाटतं.”
“काहीतरी आहे तिच्या मागे… ती सरांच्या फार जवळची वाटते.”
आराध्याने हे ऐकलं नाही, पण वैशाली मॅडमच्या लक्षात आलं. त्यांनी फाइलच्या आडून कटाक्ष टाकून त्या दोघांना शांत केलं.
तितक्यात एक मेल आला… “मीटिंग विथ मिस्टर माधव ॲट 3 PM – प्रोजेक्ट रिव्ही रिव्ह्यू…”
आराध्याच्या मनात पुन्हा हलकीशी थरथर झाली… ती सावध झाली. शर्वायचा विश्वास आणि स्वतःचा आत्मसन्मान — या दोहोंमधल्या तारेवरची कसरत सुरू झाली होती.
दुपारी तीन वाजता कॉन्फरन्स रूमचा दरवाजा आराध्याने हळूच ढकलला. तिच्या हातात प्रेझेंटेशन फाइल्स होत्या, पण मनात गोंधळाचा गडद थर दाटून आला होता. आत शिरली आणि समोर बसलेल्या व्यक्तीशी नजरानजर झाली — माधव.
नेहमीप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर एक हसरा मुखवटा होता, पण डोळ्यातली धार थेट तिच्यावर रोखलेली होती…
“या आराध्या, या… बसा.” त्याने खुर्ची समोर ओढली.
आराध्या शांतपणे बसली. फाइल्स उघडल्या. पण माधवचं लक्ष प्रेझेंटेशनकडे नव्हतं, तो तिच्या हालचाली टिपत होता.
“शर्वायने तुला फार विश्वासानं या प्रोजेक्टवर घेतलं आहे,” तो म्हणाला.
“हो, मीही माझं सगळं देईन, त्याच्या अपेक्षा पूर्ण करायला…” आराध्याचं उत्तर ठाम होतं.
माधव काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला—
“तुझा इंटरव्ह्यू फार वेगळ्या जागी झाला म्हणे…”
आराध्या एकदम सावध झाली. “हो, तसं काही ठरवलेलं नव्हतं… अनपेक्षित होतं.”
“मला मात्र फार काही ‘अनपेक्षित’ वाटत नाही. काही गोष्टी योगायोग नसतात आराध्या,” असं म्हणत तो पुढे सरकला… आणि म्हणाला, “तुला हे सगळं सहज मिळालेलं नाही, माहिती आहे मला आणि जे सहज मिळत नाही, ते टिकवण्यासाठी खूप काही गमवावं लागतं…”
आराध्याने नजर न हटवता उत्तर दिलं — “जे खरे असतं, ते गमावलं जात नाही, माधव सर. ते स्वतःला सिद्ध करतं.”
त्याचा चेहरा एक क्षणासाठी निर्विकार झाला… पण लगेच पुन्हा हसरा झाला.
“सिद्धी हवी असेल, तर परीक्षा द्यावी लागते आणि तुझी परीक्षा अजून सुरू आहे.”
आराध्या उठली. फाइल पुन्हा उचलली, म्हणाली, “मी तयार आहे.”
माधवने तिच्याकडे बघत एक शेवटची ओळ टाकली —
“शर्वायला सावध ठेव. काही वेळा, आपले आपलेच नसतात.”
ती क्षणभर थबकली, पण काहीही न बोलता दार उघडून बाहेर पडली.
कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकाला आराध्या पाय ठेवते न ठेवते तोच समोरून शर्वाय येताना दिसला. त्याच्या चालण्यात नेहमीप्रमाणे आत्मविश्वास होता — पण आज त्याचे डोळे थेट तिच्यावर स्थिरावलेले होते…
आराध्या थोडीशी थांबली. तिच्या डोळ्यांत अजूनही कॉन्फरन्स रूममधला तणाव होता. शर्वाय तिच्याजवळ आला, एक नजर तिच्या हातातल्या फाइलवर… आणि मग तिच्या डोळ्यांत.
“माधव काका भेटला?” त्याचा आवाज संयत, पण नेमका होता.
आराध्या क्षणभर गोंधळली, पण मग हळूच मान हलवत म्हटलं, “हो… भेटलो. चर्चा झाली.”
शर्वाय काही क्षण शांत राहिला. मग एक श्वास सोडत विचारलं…
“त्याने काही विचारलं का… त्या दिवशीच्या घटनेबद्दल?”
आराध्याने त्याच्याकडे बघत थेट विचारले, “त्यानां सगळं माहीत आहे, नाही का?”
शर्वाय थोडा वेळ तिच्याकडे पाहतो… मग म्हणतो —
“मी जे केलं, ते तुझं संरक्षण करण्यासाठी.. .हीरो ठरण्यासाठी नव्हे!”
“आधार कधी कधी हीरोपेक्षा मोठा असतो…” आराध्याचं उत्तर त्याला थोडंसं अचंबित करतं.
दोघं काही क्षण शांत होते. मग शर्वाय तिच्या हातातली फाइल घेतो, एक नजर टाकतो….
“खूप सुंदर मांडणी आहे. तू या प्रोजेक्टसाठी परफेक्ट आहेस.”
आराध्या गहिवरते, पण तोंडावर शांत भाव आणत म्हणते… “माझं काम माझी ओळख ठरावी, हीच इच्छा आहे.”
“होईल… आणि लवकरच…” शर्वाय म्हणतो.
तेवढ्यात त्यांच्या मागून वैशाली मॅडम येतात…
“शर्वाय सर, क्लायंट मीटिंग सुरू व्हायला आलीय.”
शर्वाय मान डोलावतो…
“आराध्या, संध्याकाळी एक इनफॉर्मल मीटिंग आहे, क्लोज टीमसोबत. तू येणार आहेस. ठीक?”
आराध्या थोडीशी गोंधळते.
“मी… हो… मी प्रयत्न करेन.”
“प्रयत्न नाही.. तू येशील. माझा विश्वास आहे.” शर्वाय एक हलकं स्मित देतो आणि चालत निघून जातो.
आराध्या मागे वळून त्याला पाहते. तिच्या डोळ्यात एक नवं काहीतरी उमलायला लागलेलं असतं… विश्वास. कुतूहल… आणि एक गूढ ओढ….
कॉरिडॉरच्या एका टोकाला वैशाली मॅडम उभ्या होत्या.
त्यांनी आराध्याला एका नजरेने विचारलं — “सर्व ठीक?”
आराध्याने फक्त निश्चयीपणे मान हलवली.
संध्याकाळचे साडेसात वाजले होते. ऑफिसमधल्या इनफॉर्मल मीटिंगसाठी ठरवलेली जागा म्हणजे शहराच्या एका नामांकित स्काय लाऊंजचा टॉप फ्लोअर. मोठ्या काचांमधून वेगवेगळ्या दिव्यांच्या प्रकाशाने न्हालेला मुंबईचा नजारा दिसत होता. हलकासा संगीताचा स्वर, टेबलांवर टप्प्याटप्प्याने मांडलेले स्नॅक्स, आणि हलकीशी उत्साही कुजबूज वातावरणात भर घालत होती.
हेही वाचा – कॉन्फरन्स रूममध्ये ‘ती’ व्यक्ती पाहून आराध्याचा श्वासच अडखळला
आराध्या थोड्या संकोचानेच तिथे पोहोचली. आज तिच्या पोशाखातही थोडासा बदल होता – एक सॉफ्ट पिच कलरचा कुर्ता, खाली स्ट्रेट फिट पँट आणि हलकीशी लिपस्टिक आणि झुमके – साधं, पण उठावदार. शर्वाय तिला लांबून पाहतो आणि थोडसं आश्चर्य वाटल्यासारखा तिच्याकडे येतो.
“तू आलीस… छान वाटलं,” तो म्हणाला.
“सांगितलंच होतं तुम्ही की ये… तर आले.” आराध्या उत्तर देते, पण तिच्या आवाजातही आता एक नवा आत्मविश्वास जाणवत होता.
तेवढ्यात माधव आणि निशा लांबूनच त्यांच्याकडे नजर ठेवून असतात. निशाच्या डोळ्यांत स्पष्ट असूया आणि चिडचिड मिसळलेली असते… ती माधवकडे वळून म्हणते, “हे पाहिलंत? आता हिला आपल्या वाटेतून दूर करायची वेळ आलीय. हिच्या भोळेपणावर विसंबून राहून उपयोग नाही. आता प्लॅन ‘बी’ लागेल.”
“निशा, शांत राहा. माझं लक्ष आहे तिच्यावर. शर्वायचं हे प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे. पण आपला खेळ अजून पूर्ण व्हायचा आहे.” माधवचा आवाज गंभीर होता…


