भाग – 23
काहीतरी चुकल्याचे आराध्याला जाणवले… एक लहर गेली — निशा काकी नसावी तेव्हाच का मी घरात आले? चेहऱ्यावरील भाव जरी स्थिर असले तरी तिच्या मनात विचारांची साखळी सुरू होती… निशा खरोखर काकाकडेच गेली आहे की…? आणि का? तिला आता जाणवत होतं – निशा एकटी नाही आणि खेळ अजून गडद होत चालला आहे.
रात्रीचे नऊ वाजून गेले होते. घरात शांतता होती, पण आराध्याच्या मनात वादळ होतं… ती आपल्या खोलीत असली तरी, तिचं लक्ष सतत दाराकडे लागलं होतं… निशा अजून आली नव्हती… आई प्राजक्ता, शांताबाई, सुशांत — सगळ्यांनी तिच्या जॉबबद्दल आनंद व्यक्त केला होता, थोडा वेळ गप्पाही झाल्या होत्या, पण आता वातावरण पुन्हा थोडं गूढ आणि तणावग्रस्त झालं होतं…
अचानक दार उघडल्याचा आवाज झाला… सगळे बघत राहिले — निशा आली होती.
ती घरात आली… चेहरा थोडा थकलेला, पण हसरा दाखवत ती आत शिरली…
“सॉरी, उशीर झाला, ट्रॅफिक खूप होता आणि… यांना काही कागदपत्रं कुरिअर करायची होती.”
आराध्या तिला निरखून पाहात होती. निशा नेहमीसारखी वागण्याचा अभिनय करत होती, पण तिचे डोळे काहीतरी वेगळंच सांगत होते. ती थोडा वेळ थांबली, आणि मग थेट आराध्याकडे पाहून म्हणाली —
“काय ग, आजचा दिवस भारीच गेला ना तुझा? इंटरव्ह्यू… आणि लगेचच जॉब!”
आराध्याने हलकं हसून मान हलवली, “हो गं… खूप काही नवीन शिकायला मिळेल.”
त्या क्षणी दोघींच्या नजरा एकमेकांना भिडल्या — शांत, पण सावध. दोन भिन्न ध्येय असलेल्या प्रवाशांची गाठभेट होती ती.
त्या रात्री… निशा तिच्या खोलीत फोनवर होती. दार हलकंस बंद होतं, पण आराध्या बाहेरून सावध राहून ऐकत होती.
“माधव सर… ती आता एकटी नाही राहिलेली. तिच्यावर लक्ष ठेवणं जरा कठीण होतंय,” निशा म्हणत होती.
“….”
“माझं काम होतं तिच्या जवळ जाणं, ते झालं. आता पुढची पावलं तुम्हीच सांगा…”
आराध्याच्या श्वासाचा वेग वाढला. तिने ऐकून घेतलं. आता ती पूर्णपणे सावध झाली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी…. तिचा फोन वाजला. अपरिचित नंबर होता. उचलल्यावर शांत आणि ठाम आवाज आला,
“गुड मॉर्निंग, आराध्या. मी शर्वाय बोलतोय. आजपासून तुझं ट्रेनिंग सुरू. गाडी दहा वाजता येईल. तयार राहा…”
ती अवाक् झाली. पण शर्वायचा आवाजच पुरेसा होता, तिला आत्मविश्वास द्यायला!
तिने फोन ठेवला… आणि स्वतःशीच हळूच म्हणाली, “मी आता एकटी नाही… आणि यावेळी, मी झुकणार नाही.”
हेही वाचा – तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…
सकाळचा उजेड विखुरलेला होता, पण आराध्याच्या मनातला गडद सावट काही केल्या हलत नव्हतं. ती दहा वाजता येणाऱ्या गाडीची वाट पाहाणार होती… ऑफिसला जाण्यासाठी आराध्याने अतिशय साधेपणानं, पण सौंदर्यदृष्ट्या उठावदार असा पोशाख परिधान केला होता — एक पांढरट नाजूक कुर्ता, त्यावर हलकासा फुलांच्या नक्षीचा पेस्टल ब्लू दुपट्टा आणि खालून ग्रे लेगिन्ग्ज… केस तिने नेहमीप्रमाणे अर्धे मोकळे ठेवले होते, आणि चेहऱ्यावर कोणतीही मेकअपची चकाकी नव्हती — पण डोळ्यांत एक वेगळी चमक होती… अनुभवाची आणि आत्मविश्वासाची.
पायात साधे बॅले शूज होते आणि हातात तिची लहानशी ऑफिस बॅग. कोणीही पाहिलं असतं, तर म्हटलं असतं — “साधेपणातली तेजस्विता”.
साडेदहा वाजता, गाडी आली…. काळसर टिंट असलेली एक नीटनेटकी, प्रीमियम गाडी गेटसमोर थांबली. गाडीतून एक सभ्य, युनिफॉर्म घातलेला ड्रायव्हर उतरला.
“आराध्या मॅडम?”
“हो.”
“सरांनी पाठवलंय — आपली पहिली ऑफिस भेट.”
ती सावधपणे बसली. गाडी शहराच्या मध्यवर्ती भागात आली…
0000
दुसरीकडे माधवच्या अंधाऱ्या ऑफिसमध्ये…
“तिनं बचाव घेतलाय, शर्वायने तिची बाजू घेतलीय… म्हणजे आता आपण अजून सावध राहायला हवं,” माधव दात खात म्हणाला. निशा समोर शांत बसलेली.
“तिच्याजवळ काहीतरी आहे आणि ते मिळवायचंच.”
“आरामात नाही मिळणार आता,” निशा म्हणाली.
“म्हणूनच प्लॅन बदलतो. तिच्या ऑफिसमधूनच माहिती बाहेर येईल.”
माधवने टेबलवरचा एक फोल्डर पुढे केला.
“हाच आपला पुढचा मोहरा — तिच्या ऑफिसात आधीच पोचवलेला.”
0000
आराध्याची गाडी एका भव्य कॉर्पोरेट टॉवरसमोर थांबली…
दिमाखदार लॉबी, सुरक्षेची कडक व्यवस्था आणि आर्किटेक्चरल डिझाइन पाहून ती अचंबित झाली. तिची वाट पाहत शर्वाय स्वतः उभा होता.
“स्वागत आहे, आराध्या,” तो हसत म्हणाला.
“हे तुझं ऑफिस… इथूनच सुरू होणार आहे सगळं.”
आराध्याने डोळ्यांतून विश्वास दाखवला… पण त्याचवेळी तिच्या नकळत ती शत्रूच्या रडारवर होती.
शर्वायच्या कंपनीच्या याच इमारतीत, कुणीतरी तिच्या मागावर होतं… एक ‘आपलं’ दिसणारं, पण ‘त्यांचं’ असणारं! कॅमेऱ्यातून पाहणारे डोळे, कुजबुजते वायरलेस कानात आणि स्क्रीनवर झूम होणारी आराध्याची प्रतिमा…
शर्वायने तिचं नाव रिसेप्शनला सांगितल्यावर आराध्याला ऑफिसच्या टॉप फ्लोअरवर नेण्यात आलं… तिच्या हातात ID कार्ड दिलं गेलं — “आराध्या राजे, ट्रेनी – CEO ऑफिस”!
ती ऑफिसमध्ये पाऊल टाकताच काही क्षण सगळं थांबलं होतं… कॉन्फरन्स हॉलमधून बाहेर येणारे, डेस्कवर काम करणारे काहीजण तिच्याकडे पाहात थबकले…
“हीच ती?”
“शर्वाय सरांनी स्वतः आणलीय म्हणे.”
“अगं, एका इंटरव्ह्यूशिवाय सरळ टॉप फ्लोअरवर! काय कनेक्शन असेल?”
त्यांच्या नजरा अन् ही कुजबूज आराध्याच्या कानावर येत होती, पण शर्वायने दिलेल्या आत्मविश्वासामुळे ती थोडी स्थिर राहिली.
“आराध्या, तुला पहिल्या दोन आठवड्यांचं ट्रेनिंग माझी टीम देईल,” शर्वायने सांगितलं,
“सुरुवात HR, कंपनी स्ट्रक्चर आणि बेसिक कोड ऑफ कंडक्टपासून कर. पण कुठे अडकलीस, तर डायरेक्ट माझ्याशी संपर्क ठेव.”
ती थोडी ओशाळली, पण मान हलवून पुढे निघाली.
ट्रेनिंग रूममध्ये पोहचताच… एक तरुण मुलगी पुढे आली. नाव बॅचवर ‘कृत्तिका’…
“हाय, मी कृत्तिका. इथली टीम लीडर आहे. तू आराध्या ना?”
“हो…”
“चला, बघू या कुठून सुरुवात करायची.”
आराध्या हसली खरी, पण तिला जाणवलं…. काहीतरी अघटित आपल्याभोवती घुटमळतंय…
आता ती जॉब करता आली आहे, पण कोणत्या तरी मोठ्या खेळात एक प्यादं बनली आहे, हे तिला जाणवायला वेळ लागणार नव्हता…
आराध्याचं ट्रेनिंग सुरू झालं, आणि कृत्तिकाच्या मार्गदर्शनाखाली ती दररोज नवीन गोष्टी शिकत होती.
कंपनीच्या अंतर्गत प्रणाली, डेटा सिक्युरिटी, कम्युनिकेशन पॉलिसीज… हे सर्व तिला समजत होतं.
शर्वायनं दिलेलं तिचं वर्कस्पेस टॉप फ्लोअरवर असल्यानं सगळ्यांच्या नजरा अजूनच तिच्यावर खिळल्या होत्या.
“ती फक्त ट्रेनी आहे का खरंच? का शर्वाय सरांचा खास प्रोजेक्ट?” — हळूहळू ही कुजबुज सावध संशयात बदलत होती.
एक दिवस, ट्रेनिंगमध्ये सिक्युरिटी प्रोटोकॉल्स शिकवले जात होते. कृत्तिकाने सिस्टीमवर एक टेस्ट रन दाखवताना, एक अजब लॉगिन पॅटर्न दाखवला — मध्यरात्री लॉगिन झालेलं, एका अप्रस्तुत यूजर आयडीने!
“हे बघ, असं लॉगिन खरंतर होऊच नये, पण अधेमधे ‘बग’ दाखवतो. Ignore करत जाऊया.”
आराध्याच्या डोक्यात मात्र घंटा वाजली. ती लॉगिन आयडी काहीसं ओळखीचं वाटत होतं — हेच नाव तिला त्या फाइलमध्ये दिसलं होतं — जी शर्वायच्या रूममध्ये तिला वाचायला मिळाली होती.
ती शांतपणे सगळं टिपून घेत होती… त्या रात्री तिने पुन्हा फाइलची नोंद पाहिली… आणि तिला लक्षात आलं — हे लॉगिन्स एका विशिष्ट दिवशीच होतात! तोच दिवस, जेव्हा तिला हॉटेलमध्ये फसवलं गेलं होतं.
ती कंपनीत आहे — पण कोणत्या गूढ धाग्यांमध्ये गुंतली आहे हे उलगडू लागलं होतं!
पण याचवेळी माधवही सावधपणे तिच्यावर लक्ष ठेवून होता. शर्वायच्या ऑफिसमध्ये काम करणारी ती — आराध्या — आता त्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरणार होती. कॉन्फरन्स रूममध्ये ती कृत्तिकासोबत एका प्रोजेक्टची माहिती घेत होती. समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू होतं आणि आराध्या ते लक्षपूर्वक ऐकत होती… कृत्तिकाने तिला काही मुद्दे लिहून घ्यायला सांगितले, तेवढ्यातच दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. दरवाज्यातून माधव आत आला…
हेही वाचा – फाइलवरची सही बघून आराध्या चक्रावते…
ती उठून पाहू लागली आणि क्षणभर तिचा श्वासच अडखळला… तोच तो — ज्याने तिला आजींच्या घरात प्रथम नजरेनेच स्कॅन केलं होतं, ज्याचं लक्ष सतत तिच्यावर राहिलं होतं… माधवही तिच्याकडे पाहतो… पण चेहऱ्यावर ओळखीचा कोणताही भाव नाही. तो अगदी व्यावसायिक थाटात, शांतपणे बोलतो,
“या टीमसोबत मी काम करणार आहे. मी नवीन COO – माधव राजाध्यक्ष!”
आराध्याचं मन क्षणभर सुन्न होतं… पण तिने संयम राखत सहजपणे ‘नमस्कार’ केलं. माधवने फक्त मान हलवली.
तिच्या मनात प्रश्न गडद होतो – हा इथे का आहे? आणि त्याचं उद्दिष्ट नक्की काय आहे?
तिचा चेहरा तसा शांत… पण डोळ्यांमध्ये एक गूढ अस्वस्थता होती.


