कोकणातील लाल मातीत आयुष्य काढलेला आणि गावाच्या वेशीबाहेरचं जग न बघितलेल्या मला आज मुंबईत आल्यावर खरंच गुदमरल्यासारखं झालं. पायाला आणि आयुष्याला चाकं लावलेली सतत धावपळ करणारी माणसं बघून माझा जीव घाबराघुबरा झाला क्षणभर… आमच्या कोकणातले व्यवहार कसे रमतगमत चालायचे. घड्याळाचा फायदा फक्त वेळ बघण्यासाठी व्हायचा, त्याला आयुष्य जुंपण्यासाठी नाही! कोकणातून मुंबईपर्यंतच्या आमच्या मोटारीच्या प्रवासात मला सगळं आठवलं सिनेमाच्या गोष्टीसारखं…
सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेतून शिशिर आला होता कोकणात. तेव्हाच त्याने घोषणा केली होती, मला त्याच्यासोबत अमेरिकेला जाण्याची. मी खूप विरोध केला, पण तो हटला नाही. त्यावेळी त्याने माझ्या पासपोर्ट आणि व्हिसाचे काम मार्गी लावले होते. अमेरिकेत काहीबाही मोठा साहेब होता तो. त्याच्या हाताखाली शेकड्यांनी माणसं कामाला होती. साहेबाच्या भाषेची आणि माझी जेमतेमच ओळख होती. पण त्याच्या तोंडून त्याच्या रुबाबाच्या गोष्टी ऐकायला खूप बरं वाटायचं…
मी मुलांत मोठा, माझ्या पाठचा शिशिर आणि वसंत आमचं शेंडेफळ. मला अभ्यासात गती नव्हती म्हणून जेमतेम चार यत्ता झाल्यावर नानांनी मला घरच्या किराणा मालाच्या दुकानात हाताखाली मदतीला ठेवला. शिशिर आणि वसंत मात्र शिकून मोठे झाले. नानांना त्यांना परदेशी नोकरी करण्यासाठी जाण्याची परवानगी देण्यासाठी मी कसेबसे तयार केले. माई मात्र नाराज झाली होती, दोन्ही मुलं सातासमुद्रापार जाणार म्हणून… पण नानांच्या मनाची तयारी मी करून घेतली होती. आधी शिशिर तिकडे पोहोचला, काही वर्षांनी व्यवस्थित जम बसवल्यावर त्याने वसंताला देखील तिकडे बोलवून घेतले.
नानांच्या पश्चात किराणा दुकान मी सांभाळू लागलो. पुढे माझी मुलं शिकता शिकता दुकान सांभाळायला लागली आणि तीच संधी घेऊन शिशिरने माझ्या मुलांना हाताशी धरून मला अमेरिकेत त्याच्या घरी न्यायचं ठरवलं.
हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!
“दादा मुंबई विमानतळ आला बरं का!”
शिशिरच्या बोलण्याने मी भानावर आलो. केवढी महाकाय वास्तू होती ती लांबलचक…
“हात सोडू नकोस रे माझा. नाहीतर या गर्दीत हरवून जाईन मी,” माझा कातर स्वर.
सामानासोबत आम्ही काचेच्या दरवाज्यापाशी पोहचलो आणि दरवाजा आपोआप उघडला. शिशिरने आमच्या बॅगा तिथे असलेल्या सरकत्या पट्ट्यावर ठेवल्या आणि बाकीच्या गोष्टी पूर्ण केल्या.
“दादा, आता या सरकत्या जिन्यावरून जायचे आहे आपल्याला…” शिशिरचं बोलणं ऐकून खरंतर पोटात गोळा आला होता माझ्या. मी तिथे पाय ठेवायला घाबरत होतो. मला सारखं पडण्याची भीती वाटत होती.
“दादा, थोडावेळ बाजूला उभं राहून तू बघ सगळे कसे पाय ठेवतात ते. अरे, आपण फक्त पाय ठेवून उभं रहायचं असतं. जिना आपोआप आपल्याला वर घेऊन जातो.”
हेही वाचा – मनीऑर्डर… आण्णांच्या आत्म्यास समाधान देणारी!
हो नाही, हो नाही करता मी ग्रामदेवतेचं स्मरण करून एकदाचा डावा पाय त्या जिन्यावर ठेवला आणि घाबरीघुबरी नजर दोन्ही बाजूला फिरवत शेवटच्या पायरीवर पोहोचलो… तिथे गेल्यावर मात्र हायसं वाटलं. गुबगुबीत गादी असलेल्या बाकावर मी बसलो. शिशिर माझ्या बाजूला बसून एकटक माझ्याकडे बघत होता.
“काय रे, माझी फजिती बघून गंमत वाटली ना तुला?”
“नाही दादा. या जिन्याकडे पाहून चटकन् मनात विचार आला की, तू सुद्धा आमच्या म्हणजे माझ्या आणि वसंताच्या आयुष्यातला सरकता जिना आहेस. गेली कित्येक वर्षे तुझ्या अपरंपार कष्टाच्या आणि त्यागाच्या पायऱ्यांवर उभं करत तू आम्हाला संस्काररूपी शिकवण देत, आमचा तोल न जाण्याची खबरदारी तर घेतलीसच, शिवाय आम्ही बघितलेल्या स्वप्नांच्या जगाच्या पायरीवर व्यवस्थितपणे उभं करून नंतर तिथल्या जमिनीवर घट्टपणे पाय रोवून उभे राहू, याची सदैव काळजी तू घेतलीस. नानांना तू तयार करून परवानगी मिळवलीस. आम्हाला जर त्या सरकत्या जिन्याच्या पहिल्या पायरीवर तू उभं केलं नसतंस तर आज आम्ही काय झालो असतो, हा विचार सुद्धा करवत नाही मला!”
“म्हणूनच मी आणि वसंताने दोन-तीन वर्षांपासूनच ठरवलं होतं की, काही करून तुला अमेरिकेत आमच्या घरी घेऊन यायचे आणि तुझ्या सरकत्या जिन्यावरून आम्ही सुखसमृद्धीच्या जगात कसे पोहचलो, ते तुला प्रत्यक्ष दाखवायचं. आमच्या अमेरिकन मित्र-मैत्रिणींना तुला मुद्दाम भेटायचे आहे. आमच्या आजच्या सुखवस्तूरूपी गंगेच्या उगमस्थानाला भेटायला, ते सर्व उत्सुक आहेत. तुझा मोठा सत्कार होणार आहे अमेरिकेत!!”
शिशिरचे बोलणं ऐकून छाती अभिमानाने फुलून आली. शिशिरचा हात धरून सावकाश पावलं टाकत मी विमानात प्रवेश करायला सज्ज झालो.


