दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 25 एप्रिल 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 05 चैत्र शके 1948; तिथि : नवमी 18:27; नक्षत्र : आश्लेषा 20:04;
- योग : गंड 23:42; करण : बालव 06:50, तैतिल 30:13;
- सूर्य : मेष; चंद्र : कर्क 20:04; सूर्योदय : 06:15; सूर्यास्त : 18:58;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
सीता नवमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक
टीम अवांतर
ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म 25 एप्रिल 1918 रोजी अहमदनगर येथे झाला. ख्रिश्चन मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या 13 वर्षी त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका पहिल्यांदा साकारली आणि वयाच्या पन्नाशीतही त्यांना पुन्हा तीच संधी मिळाली. शाहू मोडक यांनी सिनेविश्वाचा असा काळ गाजवला जेव्हा सिनेमांमध्ये देवांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाच प्रत्यक्ष देव समजून त्यांची पूजा करण्याची मानसिकता प्रेक्षकांमध्ये होती.
सरस्वती सिनेटोन स्टुडियोचा भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘श्यामसुंदर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. भारतीय चित्रपटसृष्टीत रौप्यमहोत्सवी चित्रपटाचा मान या चित्रपटाला मिळाला. यात त्यांनी आठ गाणी गायली. विष्णू पुराणातल्या श्लोकांचे पठणही केले. अयोध्येचा राजा (हिंदीतील आवारा शहजादा) हा त्यांचा दुसरा चित्रपट. या चित्रपटात त्यांनी एका राजपुत्राची आणि एका कफल्लक माणसाची, अशी दुहेरी भूमिका साकारली होती. भारतीय बोलपटात दुहेरी भूमिका साकारणारे ते पहिले कलाकार ठरले.
हेही वाचा – फाइलवरची सही बघून आराध्या चक्रावते…
1936 साली प्रभातच्या चित्रपटात शाहूंनी संत तुकाराम साकारले. या भूमिकेला एवढी लोकप्रियता मिळाली की, प्रभातने त्यांना 1940 साली संत ज्ञानेश्वर म्हणून प्रेक्षकांसमोर आणले. संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबईत 36 आठवडे चालला. अमेरिकेतही प्रदर्शित झाला. शाहू हेच खरे ज्ञानेश्वर आहेत, अशी भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. त्यांच्या छायाचित्रांची लोक पूजा करू लागले.
याशिवाय 1965 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी संत तुकाराम सिनेमात त्यांनी तुकाराम महाराज साकारले. 1957 मधील देवेंद्र गोयल यांच्या नरसी भगत सिनेमात नरसीची भूमिका, 1972 साली संत तुलसीदासमध्ये तुलसीदासांची भूमिका शाहू मोडक यांनी साकारली.
1939 साली आलेला व्ही. शांताराम यांचा माणूस हा सिनेमा समांतर सिनेमांमधला मैलाचा दगड समजला जातो. यात मोडक यांनी गणपत हवालदार क्रमांक 255 ची भूमिका साकारली होती. आपल्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत त्यांनी साधारण 100 चित्रपट केले, त्यापैकी तब्बल 29 चित्रपटांमध्ये त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती.
सामाजिक संदर्भ असलेल्या दुल्हन, तलाश, बुलबुल-ए-पंजाब या चित्रपटांतील, तसेच रझिया सुलतान या ऐतिहासिक चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचेही कौतुक झाले. चक्रधारी, मी तुळस तुझ्या अंगणीची, सुदाम्याचे पोहे, झाला महार पंढरीनाथ, हरी दर्शन, माया बाजार, उतावळा नारद, संत तुकाराम, गोस्वामी तुलसीदास आणि रंगल्या रात्री अशा हे त्यांच्या संस्मरणीय भूमिका असलेले काही चित्रपट होते.
मोडक यांना चित्रकला आणि ज्योतिषशास्त्रातही अतिशय रस होता. याशिवाय स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीवर आधारित व्याख्याने देखील ते देत असत. अशा या महान अभिनेत्याचे 11 मे 1993 रोजी देहावसान झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – आज बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कामाचा भार कमी होईल मात्र त्याचा परिणाम तुमच्या उत्पन्नावर होईल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जुने शत्रू तुमच्या विरोधात कट रचू शकतात. आज प्रवास करणे टाळा. काळजीपूर्वक वाहन चालवा. घरी एखादा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
वृषभ – व्यवसायासाठी आजचा दिवस अनुकूल राहील, व्यवसायात भरभराट होईल. मित्रासोबत भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्याबाबत चर्चा करू शकता. त्यासाठी जोडीदाराकडूनही पाठिंबा मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. नोकदारांना पदोन्नती मिळू शकते. घराबाहेर पडण्यापूर्वी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या.
मिथुन – व्यावसायिकांना नवीन संधी उपलब्ध होतील. संततीकडून काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. घरी पाहुण्यांची ये-जा सुरू राहील. व्यवसायाच्या दृष्टीने एखादा मोठा करार मिळू शकतो, ज्यामुळे नफा होऊ शकतो. मात्र आज बोलण्यात संयम बाळगण्याची गरज आहे.
कर्क – कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे दिवसभर थकवा जाणवेल. मन चिंताग्रस्त असेल. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कामे पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो, ज्यामुळे मन अस्वस्थ राहील. आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे. अन्य काही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते..
सिंह – प्रत्येक कामाला पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जाल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. घरात आनंदी वातावरण राहील. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. आज मन अध्यात्मिक वाचनाकडे वळू शकते.
कन्या – व्यावसायिकांना आज मोठा नफा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठीही आजचा दिवस चांगला असेल. वरिष्ठ कामाची प्रशंसा करतील. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना कामासाठी प्रवास करावा लागेल, जो खूप फायदेशीर ठरेल. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल.
तुळ – प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार कराल. काही शुभ संकेत मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. तथापि, खर्चाचे प्रमाण वाढेल, बजेटवर परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. त्यामुळे बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक – आजचा दिवस खर्चाचा असेल, अनावश्यक खर्च टाळा. काही कारणांनी मन अस्वस्थ असेल. एखादा जवळचा मित्र दुखावण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी ध्यानधारणा करून पाहा. जोडीदाराकडून तुम्हाला काहीतरी भेटवस्तू मिळू शकते. याव्यतिरिक्त, तुमच्या खांद्यावरील जबाबदाऱ्यांचे ओझे वाढू शकते.
हेही वाचा – पसारा आवरेना आठवणींचा!
धनु – रागावर नियंत्रण ठेवा; तुमच्या बोलण्यामुळे जवळची व्यक्ती विरोधात जाऊ शकते. शिवाय, कामाचा ताण जास्त असल्याने दिवसभर थकवा जाणवू शकतो. व्यावसायिकांना आज आर्थिक नुकसान होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला नाही. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकर करून व्यवसायवृद्धीचा विचार करा.
मकर – हाती घेतलेली सगळी कामे पूर्ण कराल. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. घरातील वातावरण शांत राहील. संततीच्या प्रगतीबाबत समाधानी असाल. कुटुंबासोबत धार्मिक यात्रेला जाण्याचे बेत आखू शकता. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा. बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळा.
कुंभ – तुमच्या वागण्यामुळे घरातील आणि कामाच्या ठिकाणचे सर्वजण खूश असतील. कुटुंबात शांततापूर्ण वातावरण राहील. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. धनप्राप्तीची चांगली शक्यता आहे. जुन्या सवंगड्याशी बोलू शकता. काही मित्र व्यवसायाच्या संदर्भात मदत करू शकतात.
मीन – सर्व प्रलंबित कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. जे काही काम हाती घ्याल, ते वेळेत पूर्ण होईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. एखाद्या मोठ्या सौद्याबद्दल आतापर्यंत जी चर्चा सुरू होती, तो आज पूर्ण होऊ शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या. तब्येतीच्या बाबतीत चालढकल करू नका.


