रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी बनविण्याच्या या टिप्स वापरून पाहा.
- मुगाची डाळ (दाल फ्रायसाठी) शिजवताना जर डाळ जास्त शिजली आहे, असे वाटल्यास त्यात बर्फाचे पाणी किंवा बर्फाचे तुकडे घालावेत म्हणजे गार पाण्याने डाळ लवकर गार होऊन तिला कडकपणा येतो. तुपाची फोडणी दिल्यावर ती रुचकर लागते. मुगाची डाळ शिजवताना त्यात कढीलिंबाची पाने चुरून टाकल्यास डाळीचा वास आणि उग्रपणा कमी होऊन आमटी किंवा दाल फ्राय फारच चविष्ट लागते. तसेच, डाळ शिजविताना त्यात हिरवी मिरची आणि आले घातले, तर स्वाद चांगला येतो.
- व्हेजिटेबल पुलाव करताना एक टेबलस्पून लोण्यावर बासमती तांदूळ, काजू पाकळ्या, चेरी, मनुका चांगले परता. एका स्वच्छ पांढऱ्याशुभ्र कापडात सर्व शाही मसाला (लवंग, जिरे, दालचिनी, तमालपत्र) पुरचुंडी बांधून भाताच्या भांड्यात ठेवा आणि भांडे कुकरमध्ये ठेवा. शिट्टी झाल्यावर कुकर खाली उतरावा. पुलावला घमघमीत शाही मसाल्याचा स्वाद लागतो आणि या मसाल्याच्या पुरचुंडीचा परत एखाद्या चिकन फ्राय, फिश फ्रायसाठी उपयोग करता येतो.
हेही वाचा – Kitchen Tips : दुधीची कोफ्ता करी, मेथी-पालक पुरी अन् खारी गवार करताना…
- आजकाल पुलावासाठी उत्तम दर्जाचा लांब आणि सुवासिक तांदूळ सर्वांनाच परवडेल, अशा किमतीचा राहिलेला नाही. चविष्ट पुलाव करण्याची हौस मात्र खूप जणांना असते. अशा वेळेस लांब दाण्याचा मध्यम प्रतीचा तांदूळ घेऊन त्यात साधारण पाच किलोस 10-12 लवंगा, या प्रमाणात घ्या. लवंगा तांदळात घालून हवाबंद डब्यात ठेवल्यास तांदळाला सुरेख वास येतो. भात शिजविताना लवंगा काढून ठेवाव्यात. तांदळाला कीड, जाळी लागत नाही. शिवाय, तांदूळ संपल्यावर लवंगा मसाल्यात वापरता येतात.
- मेथीदाणे धुऊन, बेताचे पाणी घालून भिजवावेत. (मेथीदाणा फुगल्यावर त्यात पाणी उरू नये) भिजल्यावर फडक्यात बांधून अंकुरित होऊ द्यावे. चांगले मोड आल्यावर सावलीत कोरडा वाळवावा. आमटीच्या डाळीच्या डब्यात मिसळून द्यावा. अनायासे रोज थोडा-थोडा मेथीदाणा खाल्ला जातो. मेथीदाण्याचे वातहारक आणि मधुमेह नियंत्रक गुण सर्वश्रुत आहेत.
हेही वाचा – Kitchen Tips : कोबीची भाजी, मसालेभात, पालक-पनीर बनवताना हे करून पाहा…
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


