सकाळची वेळ. आल्हाददायक वातावरण असतं. तो आणि ती बाइकवरून जात असतात. बाइकचा वेग फार नसतो. सकाळ असली तरी, रस्त्यावर देखील फारशी गर्दी नसते. तिची ओढणी खांद्यावरून घसरून खाली आलेली… काही समजण्याच्या आत अचानक ती ओढणी बाइकच्या चाकात अडकते… बाइकस्वाराचा ताबा सुटतो अन् बाइक वेडीवाकडी होत खाली पडते… पण त्या अगोदरच ती खाली पडून ओढणीमुळे बाइकच्या मागे फरफटत जाते… थोडा पुढे जाऊन तोही पडतो…
गाडी वेगात नसल्याने दोघांना खूप लागत नाही, थोडंफार खरचटतं आणि मुका मार लागतो. पण… फरफटत गेल्याने तिचे कपडे फाटतात… मांडीवर… छातीजवळ… ती तोल सांभाळत उठते. काहीशी बधिर झालेली असते… पण परिस्थिती लक्षात येताच फाटलेल्या ठिकाणी हात ठेवून लज्जारक्षणाचा प्रयत्न करते…
हेही वाचा – आसपासच्या हृदयद्रावक घटना अन् मातेची तगमग
एव्हाना गर्दी जमा झालेली. बुभुक्षित नजरा तिच्या देहावर फिरू लागतात… काही समंजस लोक तिच्या नवऱ्याला उठवतात… ती काही न कळल्यासारखी उभी असते… तेवढ्यात एक रिक्षावाला गर्दीला चिरत तिच्या अगदी जवळ रिक्षा नेतो… मागील सीटवर प्रवाशांना आरामदायी बसता यावे म्हणून अंथरलेली जाड चादर क्षणार्धात खेचून काढतो आणि तिच्या अंगाभोवती गुंडाळून टाकतो…
हेही वाचा – वाचनसंस्कृती वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तात्या अन् माधवची गोष्ट
आधार देत तो तिला रिक्षात बसवतो… धावत जाऊन तिच्या नवऱ्याची बाइक रस्त्याच्या साइडला उभी करून ठेवतो. त्यालाही आधार देत रिक्षात बसवतो… ड्रायव्हिंग सीटवर बसत मागे वळून तिला विचारतो,
“ताई… तुम्हाला अगोदर घरी सोडतो. कुठे घेऊ?”
तिचा नवरा त्याला पत्ता सांगतो.
तिची नजर मात्र रिक्षातल्या काचेवर लावलेल्या कृष्णाच्या सुंदर फोटोवर खिळलेली असते. ती मनात म्हणते…
“कृष्ण होणे एवढेही कठीण नाही…”
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


