नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
‘सावधान इंडिया’ ही जोरदार चाललेली सीरियल. तिथे माझे एक आवडते डायरेक्टर होते सचिन सर. ते जी स्टोरी डायरेक्ट करत त्यात माझ्यासाठी एकतरी रोल असायचाच. त्यांच्या म्हणण्यानुसार, मी कोणतंही कॅरेक्टर फार सहज अंगिकारते. सचिन सर एक नवीन स्टोरी डायरेक्ट करणार होते. मला प्रॉडक्शनमधून कॉल आला. या या तारखांना मोकळ्या आहात का? शूट करायचं आहे. मी ‘हो’ म्हणाले. पण स्टोरी काय आहे? माझा रोल? विचारलं तर, म्हणे, ते सगळं तुम्हाला सचिन सर सांगतील! मी काय सामान कपडे वगैरे घेऊन जायचं तेवढं मला सांगितलं.
शूटिंगचा दिवस उगवला. मी सेटवर पोहोचले. सचिन सर किंवा त्यांच्या डिपार्टमेंटचं कोणीच आलं नाही माझ्याकडे! ‘मेकअप कर के रेडी हो जाईये…’ एवढाच निरोप आला. आता ‘सावधान इंडिया’चा मेकअप म्हणजे फक्त एक हलका हात पावडरचा… बाई सौभाग्यवती असेल तर कुंकू किंवा टिकली… विधवा असेल तर मग काय आनंदी आनंद! पावडर आणि कुंकू लावून अगदी साधीशी साडी नेसले. केसांचा अंबाडा घातला. तेवढ्यात क्रिएटिव्ह हेड मॅडम म्हणाल्या की, यांचे सगळे केस पांढरे करा. मेकअप दादांनी तसं केलं. तेव्हा मला अंदाज आला की, खूप म्हाताऱ्या बाईची भूमिका आहे!
मला सांगितलं की, बेल वाजेल तुम्ही सावकाश चालत येऊन दरवाजा उघडा. पोलीस येतील… ते विचारतील की, तुमचे Husband कुठे आहेत? तुम्ही सांगा, मार्केटमध्ये गेलेत. तुम्ही लोक पाणी पिणार का? ते लोक ‘नाही’ म्हणून निघून जातील… संपला सीन. पण कायम ताठ चालणारी मी, ॲक्शन म्हटल्यावर लगेच खांदे पाडून हलकं कंबरेत वाकून पाय ओढत हळूहळू चालत जाऊन दरवाजा उघडला…
अशा तऱ्हेने माझा एक सीन संपला. आता म्हणे, दुसरा सीन! तो पोलीस स्टेशनमध्ये. पण मला मात्र कोणीच स्टोरी आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायला तयार नव्हतं! सचिन सर टेन्शनमध्ये दिसत होते, त्यामुळे त्यांना विचारणे मला योग्य वाटलं नाही.
हेही वाचा – Flirting… काही असेही अनुभव!
मी सेटवर गेले, मला पोलीस स्टेशनच्या टिपिकल बाकड्यावर बसवलं आणि सांगितलं की, तुम्हाला हा जो सीन सुरू आहे, तो बघत expression द्यायचे आहेत. एक कॅमेरा तुमच्यावर आहे. सीन सुरू झाला. मला डायलॉग ऐकू येणारच नव्हते… फक्त पोलिसांनी माझ्या नवऱ्याचा रोल करणाऱ्या म्हाताऱ्या कलाकाराच्या एक थोबाडीत मारली… अर्थात, ॲक्टिंग होती. पण अनपेक्षित होतं आणि माझा हात पटकन माझ्या गालाकडे गेला. सीन संपला आणि सचिन सर म्हणाले, “कळलं का, मला हर्षा ताईंना का कास्ट करायचं असतं? काहीही आगापीछा न सांगता, पण त्या भूमिकेला न्याय देतात…” खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट होती माझ्यासाठी.
नंतर जेव्हा मला कथा सांगितली तेव्हा मी हादरले. स्वतःच्या मुलांनी दुर्लक्ष केलं म्हणून चरितार्थ चालवण्यासाठी ते म्हातारे आजी-आजोबा एक टीम ठेऊन लहान मुले पळवून विकत असतात… अणि ही खरी दुर्दैवी केस होती! आजी-आजोबा म्हणजे मूर्तिमंत प्रेम… ते जर असे कृत्य करत असतील तर, जगात विश्वास तरी कोणावर ठेवायचा?
हेही वाचा – मानो या ना मानो


