Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बेटर हाफ
    ललित

    बेटर हाफ

    अतुला प्रणव मेहेंदळेBy अतुला प्रणव मेहेंदळेJune 22, 2026Updated:June 22, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, पतीची पत्नीला विश्वासाची साथ, आयुष्याचा उत्कृष्ट जोडीदार, निखीलची सरिताला साथ, निखिलकडून सरिता आश्वस्त, गजाननरावांचा सरिताला पाठींबा, शुभदाताईंचा सरिताला पाठिंबा, सरिताचे बँकेत प्रमोशन, सरिताची बंगलोरला बदली,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “अगं ऐकलंस का… झाली की नाही तुझी बासुंदी बनवून? आवर पटापट. आत्ता येईल सरू…” गजाननरावांनी पेपर बाजूला ठेवून स्वयंपाकघरात प्रवेश केला.

    शुभदाताई हसतच म्हणाल्या, “अहो बासुंदी केव्हाच झाली आहे. आता सुनबाईंच्या आवडता ढोकळा करते आहे. काय गं चिनू तुझी आई करते का गं बासुंदी घरी? तिला माहितीही नसेल कशी बनवतात बासुंदी.”

    “आजी मला चांगले मार्क मिळाले ना की, आई मला छानशी पेस्ट्री बनवून देते. तुला येते का पेस्ट्री बनवता?” असं म्हणून आबांची लाडकी नात चिन्मयी आणि आबा एकमेकांच्या हातावर टाळी देतात.

    शुभदाताई लटके रागवत चिनूला म्हणतात, “एक रट्टा देते ये तुला. आजीची नक्कल करतेस होय.”

    निखिल हॉलमध्ये बसून हे सगळे संवाद ऐकत होता आणि हसत होता. निखिल मोने आणि सरिता मोने यांच्या प्रेमविवाहाला आता 12 वर्षं होऊन गेली. शुभदाताई म्हणजेच निखिलच्या आईला सरिता अजिबातच आवडली नव्हती. त्यांच्या मते अतिशिक्षण असलं की, मुली डोक्यावर बसतात. पण निखिल आणि गजाननरावांपुढे त्यांचा नाईलाज झाला… तशा त्या अजिबातच सासुरवास करत नव्हत्या सरिताचा! कारण त्यांनाही हळूहळू सरिता सगळं सांभाळून नोकरी करते, हे जाणवू लागलं होतं… मुळात त्यांचा स्वभाव खूप वाईट नव्हताच. थोडे दुर्गुण प्रत्येकातच असतात… त्याप्रमाणे होत्या त्या.

    निखिल एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून पदभार सांभाळत होता आणि सरिता एका बँकेत असून लवकरच मॅनेजर होणार होती. आजच सरिताचं प्रमोशनचं पत्रक जारी होणार होतं, म्हणून निखिलचे आईवडील आले होते. तसे, पूर्वी सगळे एकत्र रहात होते. पण नंतर चिन्मयी झाल्यावर दोन्ही जोडप्यांनी आनंदाने वेगळं रहाण्याचा निर्णय घेतला. निखिल आणि सरिता दोन गल्ली सोडून रहात होते. म्हटलं तर, जवळ म्हटलं तर लांब! सगळं देवयोगाने छान चालू होतं. आज निखिलने पण सुट्टी टाकली होती, सेलिब्रेशन करायला.

    तेवढ्यात बेल वाजली. निखिल दार उघडत, आतमध्ये सांगितल्यासारखा मोठ्याने ओरडला, “मॅनेजर बाई आल्यात. या रे सगळ्यांनी. चिनू आई आली गं.” सरू आत येते. तसे सगळे तिचं टाळ्या वाजवून अभिनंदन करतात. पण तिचा चेहरा अगदी मख्ख असतो. हे जाणवताच निखिल म्हणतो, “काय गं सरू काय झालं? इतकी आनंदाची बातमी आणि तुझा चेहरा का असा पहिल्याच बॉलवर आऊट झाल्यासारखा पडला आहे.”

    हेही वाचा – अधिक मासाचं अनोखं वाण… जावयाकडून!

    सरिता कसनुसं हसत म्हणते, “कसली आनंदाची बातमी अरे… माझं प्रमोशन नाही झालंय. मी नाकारलं आहे प्रमोशन.” यावर सगळं घर शांत होतं. कुणालाच काय बोलावं कळत नाही. त्या शांततेचा भंग करत शुभदाताई विचारतात, “का? काय झालं प्रमोशन नाकारायला. दाराशी आलेल्या लक्ष्मीला असं कोण नाकारतं. जरा विचित्रच आहे हे…” त्यावर गजाननराव त्यांना गप्प करत म्हणतात, “शुभदा अगं ऐक तरी ती काय म्हणतेय… तुझा तोंडाचा पट्टा कशाला चालवत आहेस?” तोंड वेंगाडत शुभदाताई पण गप्प झाल्या.

    निखिल सरिताकडे पाहून परत डोळ्यांनीच काय झालं विचारतो… “अरे मला नाही जमणार एवढं काम. मॅनेजर म्हणजे जबाबदारी मोठी आहे. एवढ्या मोठ्या अपेक्षेने सगळे माझ्याकडे बघत असणार आणि मी नाही पूर्ण करू शकले तर…! अशा भीतीने मी नाही म्हणून सांगून टाकलं,” असं म्हणून सरिता पर्स घेऊन आत जायला निघाली. तेवढ्यात चिन्मयी तिला येऊन बिलगली. “आई काय गं तू अशी. आता मला बासुंदी नाही मिळणार. तू बॅडच आहेस. जा मी नाही बोलणार तुझ्याशी,” असं म्हणून चिनू रुसून आत गेली… सरिता डोळ्यातलं पाणी थांबवत आपल्या खोलीत निघून गेली.

    त्या दिवशी कुणीच धड जेवलं नाही. शुभदाताईंनी बासुंदी पण फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि थोड्या वेळाने ते निघूनही गेले. पण या सगळ्यात निखिलच्या लक्षात आलं होतं की, काहीतरी वेगळं कारण आहे. तो सरिताशी बोलायची संधी शोधत होता आणि त्याला ती मिळाली. लागूनच महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवार होता, त्यामुळे ते दोघे घरी होते आणि चिनू शनिवार म्हणून शाळेत होती. सगळं जुळून आलेलं बघून निखिल सकाळीच बाहेर जाऊन तिच्या आवडती चाफ्याची फुलं घेऊन येतो. घरी आल्यावर सरिता आपल्याच तंद्रीत कामं करत असते. तो तिचा मूड ठीक करण्यासाठी म्हणतो, “सरू, चल मी चहा बनवतो आपल्याला. तू बाहेर बस जा.” सरिता नको नको म्हणत असतानाही तो तिला स्वयंपाकघरातून बाहेर घालवतो.

    थोड्या वेळाने गरम गरम वाफाळता चहा तिच्या हातात देत म्हणतो, “घ्या बाईसाहेब… चहा घ्या…. आणि त्यासोबत ही तुझी आवडती चाफ्याची फुलं!” चाफ्याचा वास येताच सरिताचं मन जरा प्रसन्न होतं. ते पाहून निखिल हसत म्हणतो, “आता तरी कालपासून हुप्प असलेल्या राणीसरकार बोलणार आहेत का, जे मनात साचलं आहे ते?” आता मात्र सरिताचा बांध फुटतो. ती रडायलाच लागते. त्यावर निखिल तिच्याजवळ बसून तिला जवळ घेतो, “अगं काय गं, काय झालं? तू सांगितल्याशिवाय कसं कळणार मला.”

    सरू सांगायला लागते, “निखिल मी काल खोटं बोलले तुम्हा सर्वांशी. मी बढती नाकारली हे खरं आहे, पण काम वाढेल म्हणून नव्हे. तर मला प्रमोशन एकाच अटीवर मिळणार होतं की, माझी बदली बंगलोरला होणार. ते मी कसं स्वीकारू? आपलं सगळं इथे बस्तान बसलं आहे. चिनूची शाळा पण आहे. आईंना कितीही मी आवडत नसले तरी, त्यांच्या उतारवयात त्यांना आपणच आहोत. हे सगळं सोडून तिकडे कसं बस्तान हलवणार? आणि एकटी मी तिकडे मात्र अजिबातच जाणार नाही. अशक्य आहे ते. म्हणून मी हृदयावर दगड ठेवून नाही म्हणून टाकलं. मला पश्चात्ताप अजिबातच नाही. पण आलेली संधी गेली, त्याचं वाईट वाटतंय रे…” असं म्हणून सरिता हमसून हमसून रडायला लागली.

    निखिल त्यावर काहीच बोलला नाही. त्याने फक्त सरिताला जवळ घेऊन, “बरं बरं… काही हरकत नाही. तू शांत हो. बघू आपण काय ते…” असं म्हटलं आणि विषय तिथेच सोडून दिला. त्याला रात्रभर झोप नव्हती. सकाळी उठला तोच एक विचार मनाशी पक्का करूनच. सकाळीच त्याने आईबाबांना लवकर बोलवून घेतलं. शुभदाताई पण काय झालं असेल या विचारात लगोलग निघून आल्या.

    “अरे, निखिल काय झालं काय? एवढ्या तडकाफडकी का बोलवून घेतलंस आम्हाला?” त्यांना अचानक आलेलं पाहून सरिता पण चकित होते. पण काहीच बोलत नाही. “काही नाही गं आई, आपली परवा केलेली बासुंदी तशीच फ्रीजमध्ये राहून गेली आहे. मी म्हटलं आज संपवून टाकू नाहीतर खराब होईल आणि बासुंदी खाण्यासाठी तशी बातमी पण आहे आपल्याकडे. सरिताने प्रमोशन स्वीकारायचं ठरवलं आहे…”

    आता मात्र सरितासकट सगळेच चक्रावले. गजाननराव म्हणाले, “नाही, बातमी उत्तम आहे. पण अरे काय चाललंय काय? परवा ‘नाही’ म्हणाली आज ‘हो’ म्हणतेय. एक काहीतरी ठरवा.” त्यावर सरिता कानकोंडं होत म्हणाली, “अरे निखिल, तू काहीही काय सांगतो आहेस. मी कुठे म्हणाले असं? उगीच काहीही सांगू नकोस.” तिला गप्प करत निखिल म्हणाला, “तू नाही म्हणालीस, हे मीच म्हणतोय. आई, बाबा सरिताला कामाचा वगैरे काहीच ताण नाहीये. ती खूप हुशार आणि कामात तरबेज आहे, हे मला चांगलंच ठाऊक आहे. तिला प्रमोशनवर बंगलोरला बदली घेण्याची आवश्यकता आहे म्हणून तिने नाही सांगितलं…”

    हेही वाचा – आईचं वाण…

    शुभदाताई म्हणाल्या, “अरे बापरे हो का? मग ठीकच केलं की. बाई एकटी कशी राहणार परक्या शहरात? आणि सगळं बस्तान हलवणं तर अजिबातच शक्य नाही. निदान हे तरी बरं केलंस बाई…” त्यावर थक्क होत निखिल म्हणाला, “आई तू पण काय गं. तू नाही केलीस का शाळेची नोकरी. तुला तर माहीतच आहे बँकेत नोकरी करायची तर, बदलीची रिस्क असतेच…. आणि मी सगळं काल रात्री पूर्ण विचार करून ठरवलं आहे की, आम्ही बंगलोरला शिफ्ट होऊच शकतो. अगं, सरू तू विसरलीस का माझी पण कंपनीची ब्रँच तिकडे आहेच. बंगलोर मोठं शहर आहे. बंगलोरला शाळा पण चांगल्या असतीलच की! आईबाबा तुम्हाला काय वाटतं?  तुम्हाला यायचं असेल तर, माझी ना नाही. मी हसत हसत तिकडे न्यायला तयार आहे. उलट, मी तर म्हणतो तुम्ही चलाच तिकडे. आता तुम्हाला हळूहळू होईनासं झालं की, मदत हवीच. आई-बाबा… सरिता जर आपल्या सगळ्यांचा विचार करू शकते, तर आपण का नाही? आणि फक्त एक विचार करा की, जर ही परिस्थिती उलट असती तर सरिता एका पायावर तयार झाली असती. तिने लगेच बदली करून घेतली असती. अगदी डिमोशन झालं असतं तरी! मग आत्ता मला तिची साथ – एक सोबती म्हणून, मित्र म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेटर हाफ म्हणून द्यायलाच हवी… आणि ती मी देणार. यात कुठलाही बदल होणार नाही!”

    शुभदाताईंनी पण थोडा विचार केला आणि त्या सरिताजवळ गेल्या. आता सासूबाई काय बोलणार? काहीतरी टोचेल असं बोलणार, हे सरिता समजून चुकली होती. पण शुभदाताई तर तिचे खांदे पकडून तिला म्हणाल्या, “अभिनंदन सरिता.. तुझ्या प्रमोशनसाठी आणि एक स्त्री आपल्या घरासाठी काहीही करू शकते, हे दाखवून दिल्याबद्दल! तू नेहमीच आमचा विचार केलास, पण मी मात्र तुला जवळ केलं नाही. यावेळी तर तू कमालच केलीस. तुमचा संसार असूनही तू आमचा विचार केलास. धन्य आहेस तू… आणि चिरंजीव तुमचं तर खास अभिनंदन! असा धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या माझ्या मुलाचा मला अभिमान वाटतो. तू आज हे सिद्ध केलंस की, तुझ्यापेक्षा बेटर सरिताला मिळूच शकत नाही! …आणि आमचं म्हणाल तर आम्हाला तुमच्याशिवाय, चिनूशिवाय आहेच कोण? तुम्ही जिथे आम्ही तिथे. आधी तुम्ही जाऊन स्थिरस्थावर व्हा. मग आम्हाला असंच आजूबाजूला घर बघा. म्हणजे तुमच्याच भाषेत सांगायचं तर आपण सगळेच एकमेकांची स्पेस जपूया आत्तासारखीच…”

    यावर गजाननराव लगेचच टाळ्या वाजवत म्हणाले, “अरे वा… चला चला आता तरी ती बासुंदी मिळणार आहे का? परवापासून माझं पोट बासुंदीसाठी साद घालत आहे…” यावर एकच हशा पिकला. चिनू पण दुसऱ्या शहरात जायला मिळणार म्हणून आनंदाने आईला जाऊन बिलगते. नंतर लगेचच चिनू आणि आजी – आबा आत जातात. सरिताच्या डोळ्यातले आनंदाश्रू पाहून निखिल मात्र डोळ्यांनीच तिला “मी आहे नेहमीच…” असं इशाऱ्याने सांगतो.

    Avatar photo
    अतुला प्रणव मेहेंदळे

    अतुला प्रणव मेहेंदळे, वय 38. राहणार ठाणे येथे. प्रॅक्टिसिंग सी. एस. आणि एल. एल. बी.चं शिक्षण घेतलं आहे. गेली 14 वर्षं कंपनी सेक्रेटरी म्हणून स्वतःची प्रॅक्टिस करत आहे. पुस्तक वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरण्याचा छंद आहे. तसं आधीही लिहावं असं खूप वाटायचं, पण खरी सुरुवात कोरोना काळात स्वामींच्या आशीर्वादाने म्हणा किंवा प्रसादाने म्हणा स्वामींच्या प्रकट दिनी त्यांच्यावरच्याच लेखाने झाली. मी लिहिलेल्या बऱ्याच कथांच्या अभिवाचनासह दिवाळी अंक, छोट्या छोट्या वर्तमानपत्रात विविध कथा छापून येत राहिल्या. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला. वय आणि अनुभव छोटा असला तरी आता बऱ्याच कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या. व्यावसायिक दृष्टिकोनातून कधीच लिखाण केलं नाही. लोकांना आवडतील, रुचतील, कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा लघुकथा लिहिण्याचा प्रयत्न करते. शेवटी मायबाप रसिक, आईवडील, सर्व वडीलधारे नातलग आणि देवाच्या कृपाशीर्वादाने असं लिखाण आजन्म घडो, ही दत्तगुरूचरणी प्रार्थना.

    Related Posts

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026 ललित

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026 ललित

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    June 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    By Team AvaantarJune 22, 2026

    हिमाली मुदखेडकर भाग – 3 याचिका दाखल होऊन आता जवळपास तीन महिने उलटले होते. या…

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    June 21, 2026

    Bookshelf : ‘मेधावी’… कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक

    June 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026

    Dnyaneshwari : कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी

    June 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जून 2026

    June 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 336
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 463
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 22
    • ललित 725
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026
    Most Popular

    बेटर हाफ

    June 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.