नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
आज आपण भेटूया साईराजला. तुम्हाला ते गाणं आठवतं का? आमच्या पप्पांनी गणपती आणला… शंकर अणि पार्वती… मांडीवर बसलाय गणपती… टुकूमुकू बघतोय चांगला…’ तोच साईराज केंद्रे. वय वर्षे तीन. अतिशय चुणचुणीत, अतिशय बोलका चेहरा. गोड आवाज आणि मधाळ वाणी. बीड जिल्ह्यात जन्माला आलेलं गोडुलं बाळ! आठवला ना? तोच तो. मला भेटला बेळगावमध्ये… मी शूट करत होते, कोठारे व्हिजनची सीरियल ‘सावळ्याची जणू सावली’! बेळगावला राहणारी कावेरी अम्मा. तिच्या घरात वाढणारा छोटासा अबीर. आईचा जीव आणि अम्मा आजीच्या काळजाचा तुकडा… अबीर! आता हा रोल कोण करणार? कुणीतरी सहा वर्षांचा लहान मुलगा आलाय बीडवरून. अगं बाई, बीडचा मुलगा का? बेळगावी हेल जमेल का त्या एवढ्याशा लेकराला? मनात प्रश्न घेऊन मी सेटवर गेले. तयार झाले आणि बघते तर काय एनर्जीच अख्खं भंडार माझ्यापुढे उभं होतं!
“अम्मा आजी मी साईराज…” आमची ओळख झाली. पण मला वेगळीच काळजी की, एवढं लहान लेकरू कानडी हेल लावून वाक्य बोलेल नं? टिकेल ना? पण या मुलाने बॉम्बच फोडला. डायरेक्टर सर म्हणाले, “साईराज, अम्मा आजी बोलते ना तशा स्टाईलने बोलायचं.”
हेही वाचा – गुरू अन् शिष्याची घट्ट ‘वीण’
“बोलतो की वो!” मॉनिटरवर बसून त्याने माझा एखाददुसरा सीन शूट होताना पाहिला… झालं! तोच त्याचा अभ्यास होता. इतका तंतोतंत हेल पकडला नं त्याने की, सगळे अवाक् झाले.
मध्यंतरी मी एक सिनेमा पाहिला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’. मराठी माध्यमाच्या शाळा बंद होऊ नयेत, असा छान विषय होता. तर, सिनेमा बघत असताना हे पिल्लू समोर आलं. आगरी भाषेतले डायलॉग सहज तोंडावर मारत होता. जाणीव झाली, पोरगं असामान्य आहे. स्वतःच करिअर बाजूला सारून मुलाच्या प्रगतीला प्राधान्य देणारे आई-बाबा त्याला लाभलेत आणि अशा मेहनती आई-बाबांना एवढा टॅलेंटेड मुलगा. मस्त जोडी… नाही म्हणायला तो आजचा स्टार बालकलाकार आहे. पण हे वय खूपच लहान आहे.
हेही वाचा – मोठा मम्मी… आमची दोस्ती आजही पक्की!
सेटवर तो अभ्यास करतो, मस्ती करतो, खेळतो. कोणी दमला, थकला तर हा त्याला उत्साह देतो. हट्ट नाही करत आणि कमाल म्हणजे इतर मुलांसारखं पिझ्झा, बर्गर बच्चा नाहीये, बरं का तो! ब्रेकफास्ट, जेवण काहीही असो, त्याला अगदी भाजी, भाकरी खायला हवी. ताटामधलं अन्न टाकायचं नाही, हे तो मोठ्यांना सांगतो. बाबांचं ऐकण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल करतो, पण तेही कसं तर, ‘एक वाटी दही जास्तीच दिलं तर तुमचं ऐकेन’! नाहीतर तुमची-आमची मुलं किमान आइसक्रीम तरी मागतीलच…
लाडुल्या गोडुल्या साईराज खूप मोठा हो… आई-वडिलांचं पांग फेड… तुझ्या पुढच्या वाटचालीला या अम्मा आजीच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


