Wednesday, March 11, 2026

banner 468x60

Homeमैत्रीणसौंदर्याचा सुवर्णपाश!

सौंदर्याचा सुवर्णपाश!

रेवती निलेश पांडे

पंचवीस-एक वर्षांपूर्वी जवळपास सगळ्यांच्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या नातेवाईकांकडे जायच्या. काका, मामा, मावशी यांच्याकडे आम्ही अगदी महिना-महिनाभर राहायचो किंवा चुलत भावंडं आमच्याकडे यायची. तेव्हा कुठे मोबाइल होते? टीव्हीवरही फक्त ‘दूरदर्शन’च दिसायचं. मग मनोरंजनासाठी काय होतं? तर फक्त गोष्टी!

आत्ताच्या लहान मुलांना कदाचित हे फार कंटाळवाणं वाटेल, पण आम्हाला गोष्ट ऐकताना खूप भारी वाटायचं. गोष्ट सांगणं ही सुद्धा एक कलाच होती आणि तेव्हा ती बऱ्याच लोकांना अवगत होती. आमचे एक मामा आजोबा नेहमीच उलट्या पायाच्या हडळीची गोष्ट सांगायचे; आजी शकुंतलेची, रामाची, कृष्णाची गोष्ट सांगायची. एक ज्योती आत्या होती, ती नेहमी राजकुमार आणि राजकुमारीची गोष्ट सांगायची.

सारख्याच धाटणीच्या वेगवेगळ्या गोष्टी असायच्या. कधी राजकुमार श्रीमंत असायचा, कधी शूर, कधी जखमी तर कधी दुःखी; कधी बंधक तर कधी शापित. पण प्रत्येक गोष्टीत राजकुमारी मात्र सुंदरच असायची!

हेही वाचा – ती अन् तिचं स्वतंत्र अस्तित्व!

नंतर वय वाढलं, गोष्टी ऐकणं बंद झालं आणि गोष्टी वाचणं सुरू झालं. त्याही गोष्टींमध्ये प्रत्येक नायिका सुंदरच असायची. तिच्या सुंदर डोळ्यांच्या, लांब केसांच्या वर्णनांनी पानंच्या पानं भरलेली असायची. आणखी थोडं मोठं झाल्यावर गोष्टी सिनेमाच्या रूपात बघायला लागलो. तिथेही तेच! नायक कसाही असो — गुंड, रागीट, गरीब किंवा चिडका… नायिका मात्र सुंदरच असायची. तिचा गोरा रंग, तुकतुकीत त्वचा, चंचल नजर आणि कमनीय बांधा यावर गोष्टीच काय, गाणीही रचली गेली!

हे तर अगदी सर्वसामान्य स्त्रियांच्या बाबतीत झालं, परंतु अगदी देवीच्या आरतीतही तिच्या सौंदर्याचेच जास्त कौतुक केले गेले. ‘चौदवीं का चाँद’, ‘अजंता की मूरत’, ‘काश्मीर की कली’, ‘अप्सरा’ अशा या सुंदरींनाच कोणीतरी नाव विचारेल, असं मनावर बिंबवण्यात आलं आणि मुलींनी-स्त्रियांनी ते स्वीकारलंही. दागिने घालून, सौंदर्यप्रसाधनं वापरून, वेळप्रसंगी पार्लरमध्ये जाऊन आणि जमलं तर ‘फिल्टर’ लावून — कसेही करून सुंदर दिसणं, ही स्त्रियांसाठी जणू जीवनावश्यक गोष्ट झाली.

त्यामुळे स्त्रियांनी स्वतःला जसं दाखवलं, तसंच जगाने त्यांच्याकडे बघितलं. भरीत भर म्हणजे सौंदर्याचे मापदंड तिच्यावर लादले गेले — गोरा वर्ण, लांब केस, सडपातळ बांधा! इतक्यावरच हे सगळं थांबलं नाही. ‘कयान’ जमातीत लांब मान असणं हे सौंदर्याचं लक्षण मानलं जातं, त्यामुळे तिथे मुली पाच वर्षांच्या असल्यापासून त्यांच्या गळ्यात पितळेची कडी घातली जातात. चीनमध्ये ‘फूट बाइंडिंग’ केलं जायचं. ‘मुर्शी’ जमातीत मोठ्या ओठांसाठी खालच्या ओठात एक चकती बसवली जाते. नैसर्गिक सौंदर्यापेक्षा कृत्रिम मापदंड जास्त महत्त्वाचे होऊन बसतात!

एखादी जन्मजात सुंदर स्त्री जेव्हा वयाने मोठी होते, तिचं वजन वाढतं किंवा बाळंतपणानंतर ती जशी दिसू लागते, या सगळ्याचं तिला खूप दडपण येतं. “सुंदर दिसण्याच्या या शर्यतीत आपण मागे पडू की काय?” या भीतीने ती सुसाट धावत सुटते. खरंतर, या जगात सुंदर नसणारी एकही स्त्री नाही. फक्त सौंदर्याचे मापदंड बदलावे लागतील.

स्त्रीच्या वर्णनात फक्त शारीरिक सौंदर्याचं विश्लेषण न करता तिचे गुण, तिचं निरागस मन, कर्तव्यतत्परता, सेवाभाव, तिचं कर्तृत्व, वक्तृत्व, तिची निर्णयक्षमता, समंजसपणा आणि तिच्यातील विविध कला यांचा विचार व्हायला हवा. हेच गुण तिला बहुआयामी व्यक्तिमत्व प्रदान करतात.

हेही वाचा – ‘आदर्श’ बनण्याच्या ओझ्याखाली दबला आयुष्याचा आनंद!

नसेना शारीरिक सौंदर्य, परंतु आंतरिक सौंदर्य असलेल्या स्त्रीलाही तितकंच प्रेम मिळू शकतं, अशा कथा आणि कविता आता रचल्या गेल्या पाहिजेत.


दिवस आणि रात्र

रात्र म्हणाली दिवसाला

किती आंधळी तुझी प्रीत

विजोड जोडी आपली

सारे काही विपरीत

तू असा तेजस्वी

चैतन्याने ओतप्रोत

मी काळी सावळी निशा

काय बघितलेस माझ्यात

दिवस म्हणाला रात्रीला

‘प्रिये’ तू माझ्या हृदयीचे स्पंदन

निळ्याशार ललाटी तुझ्या

शुभ्र चांदण्याचे गोंदण

तू शांत निवांत

नि:शब्द तुझी वाणी

मंद ओल्या वाऱ्यासवे

दरवळते रातराणी

मी व्यस्त, मग्न, थकलेला

तू विसाव्याची वेळ

स्वप्नांच्या गावी तुझ्या

भास-आभासाचे खेळ

कांती तुझी काळी जरी

तरी माया अंतरी

तप्त माझ्या मनावर

बरसवतेस प्रेमसरी


मोबाइल – 8552893399


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!