स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये पालकाची पेस्ट, उकडलेल्या बटाट्याची भाजी, लहान वांग्याचे स्मोकी भरीत बनविण्याच्या टिप्स पाहूयात.
- ‘पालक’ ही भाजी एक-दोन दिवसांनी तरी आहारात असावी, त्यासाठी दर दोन दिवसांनी पालक आणणे, निवडणे, धुणे आणि नंतर त्यापासून पदार्थ बनविणे… हा वेळ वाचविण्यासाठी एकदम पालकाच्या तीन-चार जुड्या आणून, निवडून धुऊन स्वच्छ कराव्यात. त्यामध्ये प्रमाणात आले, लसूण आणि किंचित पाणी घालून, उकडून, मिक्सरमधून वाटून ठेवावे. पालकाचा रंग हिरवा राहतो. ही पेस्ट फ्रीजमध्ये ठेवावी. पाहिजे त्या वेळी थोडी थोडी घेऊन आलटून-पालटून वेगवेगळे प्रकार करावेत. उदाहरणार्थ पालक-पुरी, पालक-पनीर, पालक-मटार वगैरे. वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होते.
- कोबी चिरायला थोडा त्रासदायक. आयत्या वेळी घाईगर्दीत कोबी चिरताना, मोठ्या छिद्राच्या बटाट्याच्या किसणीने किसल्यास एकसारखा चिरल्याप्रमाणे दिसतो. याच पद्धतीने जास्त प्रमाणात काकडी चोचायची असल्यास सुरेख किसता येते. फक्त किसणीची दिशा उलटी धरून काकडी किसावी म्हणजे चोचल्यासारखी दिसते.
हेही वाचा – Kitchen Tips : कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर अन् टोमॅटोचे सूप तयार करताना…
- उकडलेल्या बटाट्याची भाजी करताना, बटाटे जास्त वाफेने फुटू नयेत म्हणून त्यात थोडेसे मीठ घालून ते उकडावेत. म्हणजे बटाटे फुटत नाहीत आणि चवीपुरतेच मीठ बटाट्यात उतरते. हीच कृती छोले, वाटाणे, डबल-बी इत्यादींसाठी केल्यास असेच फायदे होतात.
- लहान वांगी असल्यास भाजून भरीत करणे शक्य नसते. अशा वेळी वांग्यांना तेलाचा हात लावून ती उकडून घ्यावीत. गार झाल्यावर सोलावीत. भाजण्याचा परिणाम साधण्यासाठी एका लहान कोळशावर अर्धा चमचा तूप टाकून तो पेटवावा. पूर्ण पेटल्यावर फुंकर घालून तो विझवावा, धूर निघू लागेल. एका लहान भांड्यातून लगेचच तो वांग्यांच्या गरात सोडावा. पाच मिनिटांनी काढावा. त्याचा सुरेख जळका वास येतो. याचप्रमाणे काही पंजाबी भाज्यांत आणि चिकन- मटण वगैरे मांसाहारी प्रकारांत असा कोळसा 5 ते 10 मिनिटे बुडवून ठेवावा. सुरेख वास लागतो. पदार्थांची चवही वाढते.
हेही वाचा – Kitchen Tips : वांग्याचे भरीत अन् कढी गोळे बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा…
- ओल्या कांद्याची कोवळी पात कांद्याच्या गड्डीबरोबर येते. कांदे बाजूला काढून पात धुऊन स्वच्छ पुसून घ्यावी आणि बारीक चिरून तिला चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट लावून वरून थोडेसे गोडेतेल टाकून त्यावर लिंबू पिळावे. ही पात तशीच हिरवी जेवणाबरोबर तोंडी लावण्यास फारच चवदार लागते. कांद्याच्या पातीप्रमाणे मेथीचेही करता येते. मेथी निवडून धुऊन झाल्यावर स्वच्छ फडक्याने कोरडी करावी. नंतर ती बारीक चिरून तिलाही तेल आणि तिखट, मीठ आणि वरून लिंबू पिळल्यावर या हिरव्या भाजीची चव काही आगळीच लागते.


