मेष
- या आठवड्यात खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील. नोकरदारांची पगारवाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावरची जबाबदारी देखील वाढेल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकाल. भावंडांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक वर्गाची उलाढाल वाढून नफा वाढेल. कामासाठी मोठी जागा खरेदी करू शकाल. भागीदाराच्या मताला प्राधान्य दिले तर, त्याचा फायदाच होईल. महिलांनी वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी, दुखापत होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी कुसंगतीपासून सावध राहावे. कलाकार आणि खेळाडू यांना उत्तम संधी मिळेल.
वृषभ
- नोकरदारांना केलेल्या कामाचे श्रेय निश्चित मिळेल. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. वरिष्ठ कौतुक करतील. चांगला संवाद साधलात तर, नोकरीची योग्य संधी मिळेल. व्यावसायिक वर्गाने स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवावा. स्वतःची ओळख इतरांना करून द्या आणि त्यांच्यांशी संवाद साधा. कामानिमित्त प्रवास करू शकाल. महिलावर्ग आई-वडील आणि भावंडांबरोबर वेळ घालवतील. विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी. अनोळखी लोकांशी जास्त बोलू नये.
मिथुन
- या आठवड्यात शुभ वर्तमान मिळेल. नोकरदारांना जशी विशेष जबाबदारी स्वीकारावी लागेल, तशीच काही आव्हाने देखील स्वीकारावी लागतील. या आव्हानांकडे एक संधी म्हणून बघा, त्यामुळे भविष्यात त्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यावसायिक वर्गाची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्यांना प्रसिद्धी मिळेल. सहकुटुंब प्रवास करू शकाल. घरातील तरुण-तरुणींचे विवाह ठरतील, त्यामुळे महिलावर्ग आनंदी असेल. शुभ समाचार देखील मिळेल. विद्यार्थी चांगली प्रगती करू शकतील आणि शिक्षकांकडून त्यांचे कौतुक होईल.
कर्क
- नोकरदार आत्मविश्वासाने महत्त्वाची कामे पूर्णत्वास नेतील. त्यांच्या इच्छांची पूर्ती होण्याचीही शक्यता आहे. वाहन खरेदीचा योग आहे. वादग्रस्त कामे तडजोडीच्या मार्गाचा अवलंब करून पूर्ण कराल. व्यावसायिकांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरू शकेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल, घरातील तरुणांचे प्रश्न मार्गी लागतील. महिलांनी इतरांच्या वादापासून लांब रहावे. अशा वेळी स्वत:हून कोणला सल्ला देण्यास जाऊ नये. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करावा आणि कुठलेही काम मेहनतीने पूर्ण करावे.
सिंह
- या आठवड्यात लाभ होईल. नोकरदारांच्या बाबतीत अपेक्षित घटना घडतील, त्यामुळे पुढील नियोजन आत्मविश्वासाने कराल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि पगाराव्यतिरिक्त इतरही फायदे मिळतील. व्यावसायिकांना अनेक मार्गांनी लाभ मिळतील. अनपेक्षित घटना घडल्यामुळे व्यापार वाढेल. कुटुंबात आणि व्यापारात समाधान मिळेल. महिलांनी कुटुंबात समतोल राखून जबाबदारी पूर्ण करावी. जुन्या मित्र-मैत्रिणी भेटतील. विद्यार्थ्यांनी वाहन जपून वापरावे आणि कोणालाही वापरायला देऊ नये.
हेही वाचा – मिथुनेचा शुक्र… सोशल बटरफ्लाय
कन्या
- हा आठवडा खूप धावपळीचा जाणार आहे. नोकरदार जातक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील. मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणाच्या खासगी गोष्टीबाबत जास्त बोलू नका आणि वाद घालू नका. व्यावसायिकांनी महत्त्वाचे काम करताना नियम आणि कायदा यांचे पालन करावे. स्वतःच्या कामाविषयीचे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करा. व्यापारात आर्थिक गरज लागली, तर मित्र मदत करतील. महिलांच्या बाबतीत घरात नातेवाईकांवरून वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांत राहा. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.
तुळ
- या आठवड्यात मोठ्या घडामोडी घडतील. नोकरदारांना भौतिक सुविधा मिळतील आणि जीवनमानात परिवर्तन होईल. रोजचा दिनक्रम बदलण्याची शक्यता आहे. कामात नवीन गोष्टी शिकायला मिळतील. व्यावसायिक वर्ग नवीन संकल्पना वापरून चांगला फायदा मिळवू शकेल, त्यामुळे व्यापार नवीन उंचीवर नेता येईल. महिला सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होऊ शकतील, त्यांना काही शुभ समाचार देखील मिळतील. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळेल, मात्र त्यानंतर मेहनत घ्यावी लागेल.
वृश्चिक
- या आठवड्यात अचानक लाभ होईल. नोकरदारांना नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकेल; राजकारण व गटबाजीपासून लांब राहा. सरकारी नोकरीत असलात तर स्वतःच्या अधिकाराच्या कक्षा ओळखून कामे करा आणि सत्तेचा गैरवापर करू नका. व्यावसायिकांनी रागावर नियंत्रण ठेवावे. काम पूर्ण होण्यासाठी कोणालाही लाच देऊ नका आणि कायदा मोडून काम करू नका. लहान-मोठे निर्णय घेताना भागीदाराशी विचारविनिमय करा. महिलांनी कागदपत्रे जपून ठेवावीत, तसेच प्रवासात पर्स सांभाळा. विद्यार्थ्यांनी इतरांवर अवलंबून न राहता स्वतःची कामे स्वतः करावीत.
धनु
- या आठवड्यात शिस्तबद्ध राहा. नोकरदारांनी घाईगडबडीत निर्णय घेऊ नयेत; आत्मविश्वास ठेवा आणि सकारात्मक विचार करा. कायद्याचे काटेकोर पालन करा. कामाचा ताण जाणवेल. खाण्याचा व्यवसाय, उपाहारगृह, आणि सौंदर्यप्रसाधने यांच्याशी संबंधित व्यावसायिकांसाठी सध्याचा काळ खूप चांगला आहे; भरपूर काम मिळेल आणि त्यातून फायदा होईल. घरातून व्यवसाय करणाऱ्या महिलांना कुटुंबीयांचा पाठिंबा तसेच मदत मिळेल. विद्यार्थी सामाजिक क्षेत्रात स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवू शकतील.
मकर
- या आठवड्यात आर्थिक नियोजन करणे गरजेचे ठरेल. नोकरदारांच्या कामात बदल घडू शकतो. त्यामुळे त्यांना कामाचा ताण जाणवेल. सरकारी नोकरदारांनी लहान-मोठ्या प्रलोभनांपासून लांब राहावे आणि स्वतःच्या कार्यक्षेत्रात राहून काम करावे. व्यावसायिकांची उलाढाल वाढून नफा देखील वाढेल. त्यामुळे कर्जफेड करू शकाल. तसेच भौतिक सुविधांसाठी खर्च कराल. महिलांनी घाईने कुठलाही निर्णय घेऊ नये, घरातील लोकांना विश्वासात घेऊन सगळ्या समस्या सांगाव्यात. विद्यार्थ्यांनी मित्रांना पैसे उसने देऊ नयेत.
कुंभ
- कायद्याच्या चौकटीत राहून व्यवहार न केल्यास अडचणीत याल. नोकरदारांनी नियम आणि अटी पाळूनच कामे पूर्ण करावीत. याशिवाय वरिष्ठांच्या मताला प्राधान्य द्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या. व्यावसायिकांना आर्थिक अडचण जाणवू शकते; मात्र काळजी करू नका, तुम्ही हुशारीने त्यातून नक्की मार्ग काढू शकाल. उत्पन्न ठीक राहील. अपेक्षित उत्पन्न मिळण्यासाठी काही काळ वाट बघावी लागेल. घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे महिलावर्ग आनंदी असेल. विद्यार्थ्यांनी बँक आणि इतर लहानमोठी सरकारी कामे शिकून घ्यावीत, स्वावलंबी राहावे.
हेही वाचा – अपघात टाळण्यासाठी वास्तुशास्त्र
मीन
- या आठवड्यात नवीन संधी मिळतील. नोकरदारांसाठी कामाच्या ठिकाणचे वातावरण चांगले असेल. वरिष्ठांशी बोलताना सावधपणे बोला; क्षमतेपेक्षा जास्त अशी कोणतीही गोष्ट कबूल करू नका. स्वतःची कामे स्वतः करा, इतरांवर विसंबून राहू नका. व्यवसायिकांचे रखडलेले प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. भागीदारीमधील मतभेद दूर होतील; एकमेकांच्या सहकार्याने व्यापार करा. महिला सहकुटुंब पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील. विद्यार्थी स्वतःच्या मौज-मजेसाठी आणि छंदासाठी जास्त खर्च करतील; मात्र खर्च करताना सांभाळून करा.


