Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeललितरिसेप्शन... आयुष्यातील 'गोल्ड स्पॉट'

रिसेप्शन… आयुष्यातील ‘गोल्ड स्पॉट’

यश:श्री

यंदा एप्रिल-मे महिन्यांत लग्नकार्य अन् रिसेप्शन यांचा धडाकाच होता. ऑफिसमध्येच एका पाठोपाठ सलग चार लग्नं होती. सर्व सहकारी आपलेच… तसं पाहिलं तर, संपूर्ण जगच आपलं म्हटल्यावर डिपार्टमेन्टच्या भिंती राहात नाहीत… प्रत्येकाच्या लग्नाला जायचंच, असं ठरवलं होतं. यापैकी दोन विवाह सोहळे असे होते की, सर्व मंगलविधी हॉलवर झाली आणि त्यानंतर रिसेप्शन! तर, उर्वरित दोनपैकी एक लग्न रजिस्टर आणि दुसरं गावी झालं होतं, पण रिसेप्शन मुंबई अन् ठाण्यात होतं.

आजकाल रिसेप्शन हा प्रकार मंगलविधींच्या धावपळीत लपून जातो. त्याला ना मुलाकडची मंडळी काही करू शकत ना मुलीकडची… सध्या सर्व गोष्टींचे व्यावसायिकीकरण झालंय तर, मंगलकार्यालय भाड्याने देणारे कसे मागे राहणार? सकाळी 5-6 वाजता या, पण दुपारी 4 वाजता मात्र हॉल रिकामा करायचाच! भलेही दुपारी चार वाजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो बंद राहिला तरी हरकत नाही. पण चार म्हणजे चारच!! त्यामुळे उशिरात उशिरा 12-12.15 वाजताचा मुहूर्त पाहायचा. एकमेकांना वरमाला घालून झाल्यावर उरलेले मंगलविधी उरकायचे आणि लगेच रिसेप्शनची तयारी सुरू…

वधू आणि वर आपापल्या खोलीत जातात. तोवर जेवणावर ताव मारून झालेली बहुतांश मंडळी स्टेजसमोर भली मोठी रांग लावून उभी असतात. त्यानंतर तयार होऊन नववधू-वर थेट स्टेजवर येत नाहीत, तर त्यांच्यासाठी स्टेजपर्यंत येण्यासाठी वेगळी तयारी केलेली असते. दोन्ही बाजूला दिवाळीत असतो तसा पाऊस (अनार), सिनेमात दाखवतात तसा ‘फॉग’ सोडला जातो… यावेळी समोर फक्त फोटोग्राफर आणि व्हिडीओ कॅमरामॅन… आजबाजूला प्रत्येकाचे मोबाइल सरसावलेले असतात… स्टेजवर पोहोचल्यानंतर लहानसे फोटोसेशन होते. तोपर्यंत रांगेतल्या अनेकांची चुळबूळ वाढलेली असते. रविवार असेल तर, ठीक… नाहीतर इतर दिवशी हातातल्या घड्याळाकडे पाहणारे जास्त दिसतात!

हेही वाचा – मन ‘वडा’य ‘वडा’य…

ज्यांनी फक्त रिसेप्शनचा बेत ठेवलेला असतो, त्यांच्याबाबतीतही असंच काहीसं घडतं. मंगलविधी आधीच उरकलेले असले तरी, नववधू आणि वराच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागते. रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिकेवर छापलेली वेळ ही केवळ हॉलचालकाने दिलेली आहे, म्हणून दिली जाते. अन्यथा, त्याचा वधू-वराच्या तिथे येण्याशी काहीही संबंध नसतो. तिथेही वधू-वराचे स्टेजपर्यंत जाणे… मागेपुढे कॅमेरामनचं फिरणं… तसंच असतं. लग्नविधीला बोलावले नसल्याने अशा रिसेप्शनमध्ये मिष्टान्न भोजनाचा बेत असतो. अशा ठिकाणी मात्र उलटा प्रकार पाहायला मिळतो. नवदाम्पत्य स्टेजवर येताच त्यांना भेटण्यासाठी पटकन रांग लागते. भेट घेतल्यानंतर तडक जेवणावळीचं टेबल गाठलं जातं. तिथं बासुंदी, गुलाबजाम वगैरेंवर ताव मारला जातो… ते झाल्यावर थेट घरचा रस्ता…

आजकाल सर्वत्र हाच ट्रेण्ड झाला आहे. विवाह समारंभ न राहता, तो विवाह सोहळा झाला आहे. पूर्वी व्यावसायिकीकरण न झाल्याने अनेकदा दोन-तीन दिवस मंगलकार्यालय (हॉल) भाड्याने घेतले जात असे. लग्नाला बोलावण्यासाठी निमंत्रितांचे सरळ दोन भाग केले जात होते. अगदी जवळचे, कुटुंबीय लग्नविधीला निमंत्रित करायचे, तेव्हा लग्नाच्या पंगती (बुफे नव्हे) बसायच्या. तर, संध्याकाळी ‘पान-सुपारी’चे निमंत्रित. मग ते मित्र-परिवार, परिसरातील परिचित तसेच ऑफिसमधील सहकारी आणि घरातील जवळची मंडळी (काका, मामा, मावशी, आत्या वगैरे) असायचे. त्यांच्यासाठी जेवणावळ नसायची. प्रवेशद्वारावर गुलाबाचं फूल आणि गुलाबी कागदात चॉकलेटप्रमाणे गुंडाळलेला बत्तासा दिला जायचा. तर, पाहुण्यांसाठी कोल्ड्रिंग किंवा आइस्क्रीम असायचं. कोल्ड्रिंगही दोनच प्रकारची – गोल्ड स्पॉट किंवा लिम्का. त्यातही लोकं गोल्ड स्पॉटला पसंती द्यायची. त्यावेळी लिम्का म्हणजे, एका घोटात नाकामध्ये झिणझिण्या आणणारं… अशी त्याची ओळख होती. आइस्क्रीमचेही दोनच रंग – पांढरा किंवा गुलाबी (कधी तरी पिस्ता कलर). पांढऱ्या शुभ्र काचेच्या प्लेटमध्ये आइस्क्रीमची स्लाइस आणि एक स्टिलचा चमचा (पुढे चौकोनी आकार असलेला) दिला जायचा. लहानपणी कोल्ड्रिंग असो वा आइस्क्रीम या दोन्हीचं अप्रूप असल्याने कोणी पाहुणे मंडळी हॉलमध्ये आली की, त्यांच्या शेजारी जाऊन बसायचं… म्हणजे आईस्क्रीम किंवा कोल्डड्रिंक पुन्हा मिळायचं. काही मंगलकार्यालयांमध्ये यासाठी एक स्वतंत्र रूम असायची, त्याच्या दरवाजाजवळच्या खुर्च्यांवर आम्ही मुलं-मुली बसायचो. ट्रेमधून कोल्ड्रिंग किंवा आइस्क्रीम घेऊन सर्व्ह करणारा बाहेर आला की, लगेच आम्ही हात पुढे करत असू…

आता त्या भूतकाळातील रिसेप्शनचं आइस्क्रीम वितळून गेलं असलं तरी, मेंदूच्या फ्रीजमध्ये आठवणींच्या रूपानं ते अद्याप शाबूत आहे!

हेही वाचा – …कनेक्टिंग दी पीपल!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!