नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! आयुष्यात कितीतरी घटना घडतात, आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे गुरू भेटतात. एक खूप जुन्या अभिनेत्री माझ्या आयुष्यात आल्या. उत्तम कलावंत असण्याबरोबरच उत्तम स्वयंपाक बनवणे, खाणे अन् खाऊ घालणे याची त्यांना खूप आवड होती. आणखी एका कलेत त्यांची मास्टरी होती, ते म्हणजे वीणकाम! त्यांचं नाव सुहासिनी आडारकर. मी त्यांना ‘ललू मावशी’ म्हणायची.
तुम्हाला ती सीरियल आठवते का? ‘मालगुडी डेज’!… ‘ता ना ना ता ना ना ना…’ हा म्युझिक ट्रॅक त्यावेळी सर्वांच्याच मुखी होता. तुम्ही सुद्धा या तालावर गायलात ना? त्या सीरियलमधला गोड, छोटासा स्वामी आठवतो? आणि त्याला ‘छ्वामी’ म्हणणारी ती गोड आजी… म्हणजे माझ्या ‘ललू मावशी’!
हेही वाचा – दोन वेण्या अन् रीमा दिदी…
तसे मला बेसिक वीणकाम शाळेत शिकवलं होतं. पण ललू मावशींनी मला पॉलिश केलं. खूप काही विणायला शिकवलं. आधी वीण खूप घट्ट यायची, मग अगदीच सैल व्हायला लागली. त्यांनी अजिबात कंटाळा न करता मला वीणकाम शिकवलं… हातचं काहीही राखून न ठेवता! जशी माझी वीण छान यायला लागली, त्यांच्याकडे येणाऱ्या छोट्या-छोट्या ऑर्डर त्यांनी मला देण्यास सुरुवात केली. त्यांच्या मते, दोन सुयांच्या वीणकामात मी एक्सपर्ट झाले होते. पण एका सुईचं वीणकाम काही मला जमलं नाही. पण माझी धाकटी बहीण मात्र या कलेत पारंगत आहे. एखादं डिझाइन किंवा पॅटर्न नुसतं बघितलं तरी ती सहज विणते. आमची शिकायची तयारी होती, शिवाय ललू मावशींचा आशीर्वाद! दुसरं काय? आज ही कला माझ्या अन् माझ्या बहिणीच्या हातात आहे, ती फक्त आणि फक्त ललू मावशींमुळेच. किचन टिप्स, रेसिपीज् सहज बोलता बोलता त्या सांगून जायच्या.
धन्य ते गुरू, जे चिकाटीने शिष्यांना सहज शिकवायचे. गुरु पौर्णिमा जवळ येतेय, त्यानिमित्ताने आयुष्यात भेटलेल्या एका गुरुंना आदरांजली!
हेही वाचा – मानो या ना मानो…