Tuesday, July 1, 2025
Homeअवांतरशाब्दिक औपचारिकता आणि नजरेतला ओलावा

शाब्दिक औपचारिकता आणि नजरेतला ओलावा

उमा सुहास काळे

हल्ली मोबाइल आल्यापासून औपचारिकता म्हणजेच आपल्या नेहमीच्या भाषेत ‘फॉर्म्यालिटीज’चे फारच पेव फुटल्याचे दिसते. सकाळी गादीतून बाहेर पडण्यापूर्वी डोळे किलकिले झाल्याबरोबर सराईतासारखा आपला हात मोबाइलला जवळ घेतो आणि डाटा आँन करतो. हे मी “मेजॉरिटी इज दी लॉ” या नियमाने सांगतेय. “मी अजिबात असं नाही करत,” असं उगाच कोणीही म्हणू नये.

अगदी डाटा ऑन केल्याबरोबर लगेच “गुडमॉर्निंग”, “सुप्रभात”चे मेसेजेस फोटो रुपात, शब्द रुपात नाही तर व्हिडीओ रुपात टपटप प्राजक्ताच्या फुलांसारखे व्हॉट्सएपच्या अंगणात येऊन पडतात. आत्ता इतके सारे गुडमॉर्निंग जर लॉटमध्ये आपल्याकडे आले तर, काय बिशाद त्या मॉर्निंगची ‘गुड’ न होण्याची. तिला ‘गुडमॉर्निंग’ म्हणजेच, ‘सुप्रभात’ होणं क्रमप्राप्त आहेच. अशा तऱ्हेने एकदाची त्या गुडमॉर्निंगला सुरवात होते.

आता या ‘गुडमॉर्निंग’ मधेही वेगवेगळे प्रकार असतात, काही सुप्रभात आपल्याला चांगले चांगले सुविचार शिकवितात, काही सुप्रभात मस्त निरनिराळ्या रंगीबेरंगी डोलणाऱ्या ताज्या टपोऱ्या फुलांबरोबर होतात, तर काही निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वृक्षवल्लरीं, खळखळून वहाणारे स्फटिकासम पाण्याचे प्रवाह आणि तुषार यांच्यासमवेत होतात. काही सकाळी सकाळी आपापल्या आराध्य देवतांच्या फोटोने सुप्रभात करतात तर, काही सुमधुर अभंगाने आपल्याला आधी तल्लीन करून मग एकदम कामाचे भान आणून घाईने खडबडून जागे करतात.

हेही वाचा – हीच खरी जगण्याची श्रीमंती

आता हे सगळे गुडमॉर्निंग, सुप्रभात असतात मात्र सगळ्यांनी मनापासून दिलेले. पण त्यातही प्रकार वेगवेगळे. याची सुरुवात अगदी मनाच्या, भावनेच्या, नात्याच्या आपल्या जवळच्या व्यक्तींपासून केली जाते. मग आपल्या नोकरीच्या, कार्यक्षेत्रात असणाऱ्या आपल्याला आदरणीय मानाने, पदाने थोर असणाऱ्या व्यक्तींना, आपल्या सहकाऱ्यांना सकाळच्या शुभेच्छा दिल्या जातात. नंतर मग कुठे नंबर लागतो आपल्या मित्रमैत्रीणींचा. कारण, ते आपल्याला मेसेजेसमध्ये जरा पुढेमागे झालं तरी, पूर्ण समजून घेतात.

हा सुप्रभातचा ओघ चांगला सूर्य वर आल्यानंतर चांगलं लख्ख ऊन पडेपर्यंत चालतो. मग एकदा का ब्रेकफास्ट वा न्याहारी झाल्यानंतर परत जोर येऊन सगळीकडून फॉरवर्डेड पोस्टचा मारा सुरू होतो. या फॉरवर्डेड पोस्ट सुद्धा या भुलभुलैच्या वावटळीत जोमाने सैरावैरा इकडेतिकडे वेगाने पळतात वा पसरतात.

मागे एकदा ‘मोकळे आकाश’ या सदरातील डॉ. संजय ओक यांचा ‘टेक केअर’ हा लेख वाचून एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आली की, या शब्दाचंही हल्ली खूप कामं पडायला लागलं आहे. मोबाइल मेसेजमध्ये या शब्दाचाही खूप वापर व्हायला लागला आहे. मागे येऊन गेलेल्या कोरोनाच्या लाटेनंतर तर जणू, इंग्रजी टी टायपून झालं की, लगेच आँटोकरेक्ट ‘टेक केअर’ हा शब्द मोबाइल स्क्रीन वर समोर आणतो. खरोखरच, या काळात तर डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सगळा कामकरी वर्ग, पोलीस खातं, बँक तसेच अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या सगळ्या तमाम मंडळींसाठी हा शब्द जणू परवलीचा शब्द म्हणून वहिवटीत आला होता. अर्थात, हा मेसेज पाठविण्यामागे प्रत्येकाची मनापासून असलेली काळजी, तळमळ सुद्धा आपल्याला जाणवतेच.

हेही वाचा – सदाफुली… आयुष्यातील सुख

फरक इतकाच, आता मोबाइलमध्ये मेसेजेस रुपात जाणवणारी काळजी, पूर्वी जरी मोबाइल नव्हते तरी, आपल्या जवळच्या व्यक्तींच्या नजरेत आपल्याला ती स्पष्टपणे जाणवायची. जे काम आता शब्दांनी होतं, किंबहुना त्याहूनही जास्त भावनिक काम नुसती नजर करून जायची, हेही खरं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!