स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड बनवतानाच्या काही टीप्स पाहूयात –
- घरात नेहमी पोहे, रवा असेलच असे नाही; परंतु गव्हाची कणीक मात्र नेहमी असतेच. ऐनवेळी कोणी आले तर, खायला काय करायचे, असा मोठा प्रश्न समोर उभा ठाकतो. अशा वेळी घरातील कणीक उपयोगाला येते. चार वाट्या कणीक घेऊन त्यात मीठ, तेलाचे मोहन घालावे आणि थोडेसे ताक घालून सैलसर कणीक भिजवावी. कढईत तेल तापवून हिंग, मोहरी टाकून फोडणी करावी आणि त्यात मोठ-मोठे चिरलेले कांदे घालून चांगले परतून घ्यावेत. एक वाफ आल्यावर भिजवलेली कणीक घालून पीठ मोकळे होईपर्यंत चांगले परतत राहावे. वरून खोबरे आणि कोथिंबीर पेरून खायला द्यावे. मुलांनाही उकडपेंड खूप आवडते आणि पौष्टिकही आहे.
हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसा, छोले भटुरे, सॉफ्ट इडली, खमंग धिरडी…
- बिस्किटांचे शिल्लक तुकडे आणि पावसाळ्यामुळे मऊ झालेली बिस्किटांचे काय करायचे? एक वाटी खाऱ्या बिस्किटांचा (ब्रिटानिया टॉप किंवा मोनॅको) चुरा, पाव वाटीपेक्षा जरा जास्त कणीक, मिठाचे प्रमाण जरा कमी घ्यावे, कारण बिस्किटे खारी असल्यामुळे मीठ कमी लागते. बारीक वाटलेल्या दोन-तीन ओल्या मिरच्या आणि कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा, दोन टीस्पून तेल हे सर्व एकत्र करावे. कढईत तेल तापत ठेवावे. वडे थापून त्यावर थोडे थोडे तीळ पसरा आणि तळून काढा. बिस्किटे बेक्ड असल्यामुळे जास्त तळावेही लागत नाही. बिस्किटांचा चुराही वाया जात नाही.
- चार वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ अशा प्रमाणात वाटून आपण डोसे करतो, डाळ, तांदूळ बारीक वाटताना, त्यात एक मध्यम आकाराचा कांदा वाटून घातल्यास डोसे कुरकुरीत तर होतातच, शिवाय त्याला तकाकी येऊन डोसा न चिकटता, पटकन सुटून गुंडाळी करता येते.
हेही वाचा – Kitchen Tips : दहीवडा, सँडविचची चटणी अन् रगडा पॅटीस बनवताना हे करून पाहा
- कधी कधी केक फार कोरडा होतो. अशा वेळी तो खोलगट बाऊलमध्ये ठेवून त्यावर साखरेचा पाक घालावा. साखरेचा पाक, फळांचे बारीक तुकडे आणि त्यावर आइस्क्रीम वाढल्यास छान लागतो.
- व्हेजिटेबल कटलेट करताना मिश्रणात लिंबू रस घालण्याऐवजी चिमूटभर सायट्रिक ॲसिड घालावे म्हणजे मिश्रण सैल होणार नाही.


