सकाळी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होतो. एवढ्यात सेलफोन वाजला म्हणून पाहिले तर अनोळखी नंबर! फोन रिसिव्ह केला तर कोणीतरी स्त्री बोलत होती…
‘‘मनोहरचा फोन काय रे?’’
‘‘होय, मनोहर बोलतोय, कोण बोलतंय?’’
‘‘मी सविता, सविता चौगुले, कोल्हापुरात एम.ए. वर्गातली…’’
‘‘अरे हो, सविता! किती वर्षांनी? कुठे असतेस? आणि माझा नंबर कोणी दिला?’’
‘‘अरे, मी पुण्यात असते… आणि तुझा चुलत भाऊ आहे ना जगदीश, तो कोल्हापुरात आपल्या कॉलेजला होता, तो मला भेटतो पुण्यात. त्याच्याकडून नंबर घेतला…’’
‘‘अच्छा, तू पुण्यात असतेस का? वर्गातील कोणीच भेटत नाही मला. मी गेली पंचवीस वर्षे दिल्लीत आहे, सरकारी नोकरीत!’’
‘‘हो, जगदीश म्हणाला मला… तू दिल्लीत असतोस म्हणून. बरं, फोन अशाकरिता केला होता, आपले सर फार आजारी आहेत, वैद्य सर! तुझी आठवण काढतात नेहमी म्हणून फोन केला.’’
‘‘वैद्य सर आजारी आहेत? कुठे असतात वैद्य सर?’’
‘‘वैद्य सर पुण्यात राहतात, एकटे. तुला माहिती असेल अरुणा लग्न करून गेली, तेव्हापासून वैद्य सर एकटे पडले. पुण्यात सदाशिव पेठेत राहतात.’’
‘‘बरं, आता सर कुठे आहेत?’’
‘‘सरांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय काल रात्री… स्ट्रोक येण्याची शक्यता होती पण वाचले! पॅरालिसीस अटॅक आलाय, पण फार घाबरलेत, तोंडात तुझे नाव सतत आहे, अरुणाला पण कळविले आहे. ती नागपूरला असते.’’
‘‘मी निघतोच, गेली पंचवीस वर्षे सरांशी संपर्क नाही. पण आता मी सरांना भेटल्याशिवाय राहू शकत नाही. मी दुपारच्या विमानाने निघतो. तू हॉस्पिटलमध्ये आहेस का?’’
‘‘तू लवकर आलास तर, बरं होईल. मी आहे इथे, पण माझे सासरे आजारी असतात. त्यांचे औषधपाणी पाहावे लागते. शिवाय, घरचं जेवण वगैरे…’’
‘‘ठीक आहे, मी पाच वाजेपर्यंत पोहोचतोच.’’
मी सेक्रेटरीला सांगून दुपारच्या पुणे विमानाचे तिकीट बुक केले. ऑफिसमध्ये जाऊन सुहासकडे चार्ज दिला. दोन चार कपडे बॅगेत भरले आणि विमानतळावर पोहोचलो. आता कधी एकदा पुण्याला पोहोचतो आणि सरांना पाहतो, असे झाले. विमानात बसलो आणि आठवले सरांना शेवटचं भेटून पंचवीस वर्षे झाली. सरांना शेवटचे पाहिले तेव्हा सर माझ्यावर फार चिडलेले होते.
हेही वाचा – निपाणीच्या उरुसात हरवलेली गंगी…
‘‘इथून ताबडतोब निघून जा. मला तोंड दाखवू नकोस…’’ खरचं मी गेली पंचवीस वर्षे सरांना तोंड दाखविलं नाही.
विमानात बसल्या बसल्यास कोल्हापुरातील दिवस आठवले. कुरुंदवाडसारख्या त्यावेळच्या लहान गावातून बी.ए. केल्यानंतर इंग्लिशमधून पोस्ट-ग्रॅज्युएशन करण्यासाठी कोल्हापुरात आलो. घरची अत्यंत गरीबी, अंगावरचा एक ड्रेस आणि पायात फाटक्या स्लीपर घालून शेजारच्या कोंडीबा बरोबर कोल्हापुरात आलो. कोंडीबाच्या ओळखीमुळे हॉस्टेलमध्ये सोय झाली. कोल्हापूर मोठे शहर, कोणीच ओळखीचे नव्हते. रूम पार्टनर कोकणातला होता, मला सांभाळून घ्यायचा. हॉस्टेलमध्ये वरच्या वर्गातील मुलं होती, ती पण सांभाळून घ्यायची. फी माफी होती म्हणून शिक्षण करू शकत होतो. जयसिंगपूर कॉलेजमधून बी.ए.ला पहिला आलो. इंग्रजी जास्त आवडायचे. कॉलेजमधील प्रोफेसरांची भीती वाटायची. सीनियर मित्र सांगायचे – ‘‘अजून वैद्य सरांना भेटला नाहीस तू! या युनिव्हर्सिटीच्या इंग्रजी विभागामध्ये गर्दी होते, ती वैद्य सरांमुळे. सरांचे वाचन, शिकविण्याची पद्धत, मुलांवरचे प्रेम वगैरे गोष्टी ऐकत होतो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर वैद्य सरांच्या केबिनबाहेरून जाताना नेहमी व्यवस्थित कपड्यांतील वैद्य सर दिसायचे. समोर टेबलावर नवनवीन पुस्तके दिसायची. एकदा तरी सरांनी वर्गात येऊन एखादे लेक्चर घ्यावे, असे वाटत होते. पण सर नेहमी दुसर्या वर्गाला शिकवायचे.
सहामाही परीक्षेचा रिझल्ट लागला आणि अचानक वैद्य सरांकडून मला बोलावणे आले. मी प्रथम घाबरलो. माझे काय चुकले आहे हे लक्षात येईना. घाबरत घाबरत सरांच्या केबिनमध्ये गेलो सरांपुढे उभे राहून म्हणालो…
‘‘सर, मी मनोहर शिंदे, पहिल्या वर्षाला आहे.’’
सरांनी माझ्याकडे वरपासून पायापर्यंत पाहून घेतले. मग मला म्हणाले,
‘‘शिंदे, तुझा सहामाहीचा इंग्लिश पेपर आत्ता पाटील सरांनी दाखविला, चांगला लिहिला आहेस. तुला सर्वांत जास्त मार्क्स आहेत. मी येथील प्रोफेसर्स क्वॉटर्समध्ये राहतो. संध्याकाळी घरी ये.’’
मी मान हलवून बाहेर पडलो. सरांच्या घरी जायचे, बापरे! सरांच्या घरी कोण कोण असतील, माझ्या अंगावर कपडे हे असे… एकच जुना ड्रेस, पायात फाटक्या स्लीपर्स. मी रूमवर आलो, माझा रुमपार्टनर उमेश पण रूमवर होता. त्याला म्हटले – ‘‘मला वैद्य सरांनी घरी बोलावलयं, पण माझे हे असे कपडे आणि चप्पल, मला एक दिवस तुझे कपडे देतोस का घालायला? त्यांच्याकडून आलो की धुऊन देतो तुला.’’
उमेशकडे पण दोनच शर्ट होती. त्याने ताबडतोब एक शर्ट दिला. माझ्या चप्पल घाल म्हणाला. मी उमेशचा शर्ट घातला. मी तब्बेतीनं किरकोळ अन् तो मध्यम. त्याचा शर्ट मला ढिला होत होता. उंचीला आखूड होत होता. पण शेवटी घातलाच. त्याच्या चप्पलपण झिजले होते, पण माझ्यापेक्षा बरे होते. शेवटी उमेशचे कपडे, चप्पल घालून मी प्रोफेसर्स क्वॉटर्सच्या दिशेने निघालो. ओळीने बंगले होते. चौकशी करत करत वैद्य सरांच्या घराजवळ आलो. त्यांच्या घराजवळ पोहोचलो तर वैद्य सर पांढरा लेंगा, झब्बा घालून बाहेरच पडत होते. मला पाहून म्हणाले –
‘‘अरे मनोहर, मी फिरायलाच बाहेर पडतोय. चल माझ्याबरोबर.’’
मी पण त्यांच्या समवेत चालू लागलो. सरांनी पुन्हा एकदा कपड्यांकडे पाहिलं आणि माझी चौकशी सुरू केली.
‘‘गाव कोणतं?’’
‘‘कुरुंदवाड, वाडीजवळचं..’’
‘‘हो, हो माहीत आहे, कुरुंदवाडची बासुंदी प्रसिद्ध… घरी कोण कोण असतं?’’
‘‘आई-बाबा, मागची तीन भावंडं’’
‘‘बाबा काय करतात?’’
‘‘पाटलाच्या शेतात कामाला जात्यातं, आये बी कामाला जाते, मागची भावंडं शाळत जात्यात…’’
‘‘मनोहर आता तू शहरात राहतोस, ए.एम. इंग्रजी करतोस, आपली भाषा बदलावी लागेल. आपली गावाकडची भाषा वाईट असते असे नव्हे, पण शहरात शुद्ध मराठी बोलणं बरं. इंग्रजीपण बोलता यायला पाहिजे… जर आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर, चांगल्या भाषा बोलता यायला पाहिजेत.’’
हेही वाचा – निपाणीच्या उरुसात हरवलेली गंगी ‘आईविना भिकारी’
‘‘व्हयं सर…’’
‘‘होय सर म्हणावं, भाषेला वळण लाव. एम.ए.ला इंग्रजी स्पेशल घेतलंस तर वाचन हवं. मराठी काही वाचतोस की नाही?’’
‘‘थोडफार, अण्णाभाऊ साठे, बाबा कदम वाचलेत सर…’’
‘‘ते ठीक आहे, माझ्याकडून पुस्तके घेऊन जा. सत्यकथेचे जुने अंक आहेत ते वाच. एकाच प्रकारचे वाचन करायचे नाही. शहरी, ग्रामीण, दलित सर्व वाचायचं. यंदा मराठी वाचन सुरू कर. पुढच्या वर्षी इंग्रजी साहित्य!’’
‘‘हो सर…’’
फिरुन आल्यावर सरांनी नरहर कुरुंदकरांचे एक पुस्तक दिलं. शांता शेळके यांचा कविता संग्रह दिला. “ही पुस्तके वाचून दोन दिवसांनी परत करायची आणि आणखी दोन पुस्तके न्यायची.”
‘‘हो सर…’’
मी पुस्तके घेऊन रूमवर गेलो आणि अधाशासारखा पुस्तकावर तुटून पडलो. सरांनी पुस्तके वाचायला दोन दिवस दिले होते. मी ती पुस्तके वाचून दुसर्याच दिवशी पुस्तके परत करायला गेलो. सर घराच्या दारात बाहेर जायच्या तयारीत उभे. मी त्यांना पुस्तके दिली. त्यांनी कौतुकाने घेतली आणि घरात ठेवली. मला म्हणाले –
‘‘मनोहर, चल आपण गावात जाऊ’’
मी त्यांच्याबरोबर चालू लागलो. कॅम्पस बाहेर येताच त्यांनी रिक्षा थांबवली आणि महाद्वारे रोडला रिक्षा घेण्यास सांगितले. उतरल्यावर एका कापड दुकानात मला घेऊन गेले. तिथल्या सेल्समनला सांगून माझ्यासाठी दोन पॅन्टची आणि दोन शर्टाची कापडे विकत घेतली. मी पाहात राहिलो.
‘‘सर हे कशासाठी?’’ असं म्हणताच, “अरे, युनिव्हर्सिटीमध्ये शिकताना बरे कपडे हवेच…” असं म्हणून माझं तोंड बंद केलं. जवळच्या ज्योतिबा रोडवरील टेलरकडे जाऊन माझ्या पॅन्ट, शर्टचे माप घ्यायला लावले. तिथल्या जवळच्या रेडिमेड कपड्याच्या दुकानात जाऊन आतले कपडे विकत घेतले आणि चपलांच्या दुकानात जाऊन कॅनव्हास बुट, सॉक्सपण घेतले. परत रिक्षात बसताना मी गप्प गप्प होतो. उपकाराच्या ओझ्याने शर्मिंदा झालो होतो. रिक्षातून मला हॉस्टेलकडे सोडताना सर मला म्हणाले – “उद्या रविवार. मेसमध्ये जेवण नसतं ना? उद्या दुपारी घरी जेवायला ये. तुझा अभ्यास वगैरे आटप आणि बाराच्या सुमारास ये…” असं म्हणून सरांची रिक्षा घराच्या दिशेने वळली.
दुसर्या दिवशी मी घाबरत घाबरत सरांच्या घराकडे गेलो. तर सर आणि एक तरुण मुलगी हॉलमध्ये कॅरम खेळत होती. मला पाहताच सर म्हणाले,
‘‘ये रे मनोहर! रविवारचा आमचा थोडासा कॅरम असतो. हिला ओळखतोस की नाही?’’
मी म्हटलं, “नाही.’’
“अरे, ही माझी धाकटी बहीण अरुणा… आम्ही दोघंच असतो या घरात. ही माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी लहान. मी लग्न केलेलं नाही. जोपर्यंत हिचं लग्न होत नाही, तोपर्यंत ही सोबत आहेच. जेवण करायला एक बाई येतात. अरुणापण करते जेवण, पण ती युनिव्हर्सिटीमध्ये इतिहास घेऊन एम.ए. करतेय. तिला लेक्चर्स असतात. तिला गाण्याची फार आवड. त्यामुळे गाणं पण शिकतेय. म्हणून एक बाई येतात, घरातील सर्व आवरतात, जेवण बनवतात आणि आत्तापण बाई आतमध्ये स्वयंपाक करत आहेत. सरांनी माझ्या हातातील पुस्तके घेऊन शेल्फवर ठेवले. मी सरांच्या शेल्फकडे पाहत राहिलो. शेकडो पुस्तके होती. मराठी, इंग्रजी सर्व व्यवस्थित लावली होती. आत गेलेल्या अरुणाने पाणी आणून ठेवलं. सरांनी तिची माझ्याशी ओळख करून दिली.
‘‘अरुणा, हा मनोहर शिंदे, कुरुंदवाडचा आहे. इंग्रजीत एम.ए. करतोय. हुशार आहे. त्याचा सहामाहीचा पेपर मी पाहिला. छान लिहिलाय. मनोहर पुढच्या वर्षी मी तुला शिकवायला असणार.’’
ही अरुणाची पहिली भेट, तिचे फॅशनबेल कपडे पाहून मला न्यूनगंड आला. सर आणि अरुणा दोघे घरात स्लीपर्स वापरत होते. मला आणि माझ्या भावंडांना बाहेर जाताना फाटके स्लीपर्स मिळत नव्हते. मग सरांनी आपल्या कुटुंबाबद्दल बोलायला सुरवात केली.
‘‘आम्ही मुळचे गोव्याचे. आम्ही दोन भावंडे… आई-वडील हयात नाहीत. नोकरीच्या निमित्ताने पंधरा वर्षे कोल्हापूरात राहतो. अरुणाने जेवण वाढल्याची सूचना केली आणि सरांनी मनोहरला आत बोलावले. अरुणापण जेवायला बसली. समोर जेवणाची भांडी ठेवलेली होती. प्रत्येकाने हवे ते वाढून घ्यायचे. सुरवातीला ताटात सलाड, मग चपाती, अंडा मसाला वगैरे… मला असे सुरुवातीला सलाड वगैरे खाण्याची सवय नव्हती. मी हळूहळू सरांकडे आणि अरुणाकडे बघून जेवत होतो. सरांचे माझ्याकडे लक्ष होतेच. ते ‘कसे जेवावे’ हे मला जणू शिकवत होते. सुरुवातीला सलाडकडे नजर गेली. मी सलाड खायला लागलो. मग चपाती अंडा मसालामध्ये बुडवून घ्यायला लागलो. तोंडात घास गेल्यानंतर तोंडाचा आवाज येऊ नये, घास चावून खावा, जेवण झाल्यानंतर पाणी प्यावे, मधेच पिऊ नये… इत्यादी मी सरांकडून शिकत होतो. जेवण झाल्यावर सरांनी आपलं ताट उचललं, बाजूचं उष्ट ताटात टाकलं आणि ताट बेसीनमध्ये ठेवलं, मी पण तसं केलं. गेली 25 वर्षे मी नोकरीनिमित्त दिल्लीत आहे. सरांनी दिलेली ही जेवण जेवणाची सवय अजून गेली नाही.
क्रमश:


