डॉ. किशोर महाबळ
वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट अतिदक्षता विभागात काम करत असताना खूपच गंभीर दिसत होता. एका ज्येष्ठ डॉक्टर प्राध्यापकाने ते पाहिले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या तणावाचे कारण विचारले.
एका विद्यार्थ्याने उत्तर दिले, “सर, सध्या आमची ड्युटी ही आयसीयूमध्ये असल्याने आम्ही तिथे काम करत असतो. मात्र अनेकदा आम्हाला विविध प्रकारचा तणाव, नैराश्य, चिंता, निद्रानाश, असहायता यांचा अनुभव येत आहे, त्यामुळेच आम्ही खूप थकलो आहोत. या सगळ्या परिस्थितीत आपण एखादा चुकीचा निर्णय तर घेणार नाही नं? अशी भीती देखील सध्या आमच्यावर अधिराज्य गाजवत आहे. खरंतर, यामागचं कारणही आम्हाला माहीत आहे की, हॉस्पिटलच्या ज्या विभागात आम्ही सध्या कार्यरत आहोत त्या आयसीयूमध्ये अनेक पेशंटची प्रकृती गंभीर आहे. आमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये नमूद केल्याप्रमाणे अशा पेशंटच्या बाबतीत नेमकं काय होणार आहे, याचीही आम्हाला पूर्ण कल्पना आहे. कोणत्याही पेशंटची स्थिती बिघडू शकते, तो पेशंट औषधांना, उपचारांना प्रतिसाद देऊ शकत नाही आणि अशावेळी आमच्या हातून काही कमी-जास्त झालं तर, त्यामुळे पेशंटचा मृत्यूही होऊ शकतो… बहुधा हाच विचार आमच्या बाकीच्या विचारांना झाकोळून टाकत आहे. सर, तुम्ही या सगळ्या तणावाचं व्यवस्थापन कसं करता आणि स्वतःला इतकं शांत कसं ठेवू शकता?”
तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर प्राध्यापकांनी उत्तर दिलं, “एक गोष्ट कृपा करून सगळ्यांनीच लक्षात ठेवा की, मलासुद्धा या सगळ्या समस्यांना दररोज सामोरं जावं लागतं. तथापि, मी तुम्हाला काही गोष्टी सुचवू शकतो, ज्यामुळे तुम्हालाही त्याचा फायदा होऊ शकेल.”
हेही वाचा – ‘तू मूर्ख’ आहेस!
“सगळ्यात आधी लक्षात घ्या की, आपण घेतलेल्या निर्णयांमुळे आपल्या उपस्थितीतच सर्वात वाईट गोष्टी घडतील, या एकाच शक्यतेचा विचार तुम्ही सगळे करत आहात. तुम्ही चुकीचा विचार करताय असं मी अजिबात म्हणत नाही, मात्र मला वाटतं की तुम्ही फक्त आणि फक्त एकाच शक्यतेचा विचार करत आहात. याउलट मी दोन शक्यता विचारात घेतो. पहिली म्हणजे, तुमच्यासारखीच मी सर्वात वाईट गोष्टी घडण्याची शक्यता विचारात घेतो, मात्र त्याचवेळी मी काहीतरी सकारात्मक, अकल्पनीय आणि चमत्कार घडेल, अशी शक्यताही विचारात घेतो, ज्याचा अद्याप कोणत्याही पाठ्यपुस्तकात किंवा वैज्ञानिक जर्नलमध्ये उल्लेख नाही आणि जगात कुठेही कोणत्याही शास्त्रज्ञाने याचा अनुभव घेतलेला नाही! कारण माझा ठाम विश्वास आहे की, प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो!”
“औषधे, डोसमध्ये केलेले बदल, आपल्यासारख्या डॉक्टरांनी कॉमन सेन्सवर आधारित घेतलेले निर्णय, ज्येष्ठ डॉक्टर तसेच ज्येष्ठ परिचारिका यांच्याकडून मिळणारा सल्ला, पेशन्टच्या केस हिस्ट्रीचा केलेला अभ्यास आणि त्याच्या जोडीला आपल्या सकारात्मक वर्तणुकीला आणि संदेशाला गंभीर आजार असलेला पेशंट देखील सकारात्मकच प्रतिसाद देऊ शकतो, सुधारू शकतो आणि जगू देखील शकतो, या शक्यतेचा मी नेहमीच विचार करतो. याशिवाय आणखी एक गोष्ट मी कधीही विसरत नाही की, पेशंट जिवंत आहे आणि म्हणूनच माझ्यासाठी ते एक मोठं आशादायक चित्र असते.”
“असं आशादायक चित्र जेव्हा बघायला मिळतं, तेव्हा पाठ्यपुस्तकं, रिसर्च जर्नल्समध्ये उपलब्ध असलेल्या माहितीच्या मदतीने वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पेशंटच्या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी, त्यावर योग्य उपचार करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांशी आणि विद्यार्थ्यांशी या प्रकरणावर चर्चा करण्यात मला अधिक रस असतो. बऱ्याच वेळा तुमच्याकडे अशा अभ्यासासाठी वेळ नसेल. पण अनेकदा असे प्रसंग येतात, जेव्हा असा अभ्यास करणं शक्य असतं.”
हेही वाचा – Professor and student : भावना नेहमीच खऱ्या असतात
“या अभ्यासामुळे मला तुम्ही आधी सांगितलेल्या सर्व समस्यांविरुद्ध लढण्यासाठी अधिक आत्मविश्वास, आंतरिक शक्ती प्राप्त करण्यास मदत मिळते. मात्र एक गोष्ट आहे की, अशा अभ्यासाचा आनंद घेण्यासाठी तुमच्यात लहान मुलासारखी उत्सुकता आणि तरुणासारखा उत्साह असणं आवश्यक आहे. या गोष्टीचा सराव करणं खूप कठीण आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे पण असा सराव खूप फायदेशीर ठरतो. आणखी एक गोष्ट नमूद करतो की, तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्हाला आणखी काही मार्ग सापडले तर, कृपा करून मलाही तो सांगा.”
डॉक्टर प्राध्यापकांना आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं. तोपर्यंत ते ज्येष्ठ डॉक्टर प्राध्यापक उत्साहाने आयसीयूमध्ये शिरले होते आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठं स्मितहास्य होतं.
(कै. डॉ. किशोर महाबळ यांच्या Two possibilities… या कथेचा आराधना जोशी यांनी केलेला स्वैरानुवाद)