स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात –
- मेदूवड्यासाठी उडदाची डाळ भिजत टाकताना त्यात थोडा भाजलेला पापडखार (डाळीएवढा) घालावा म्हणजे तळताना तेल जास्त लागत नाही. वडे हलके आणि खुसखुसशीत होतात.
- इडलीचे पीठ पातळ झाले असल्याचे आयत्यावेळी लक्षात आल्यास काय करावे, हा प्रश्न पडतो. डाळ किंवा रवा मिसळणे अशक्य असते. तेव्हा जाड पोहे घेऊन मिक्सरमधून रवा काढावा आणि मिसळावा. इडल्या नेहमीप्रमाणेच छान आणि अधिक जाळीदार होतात.
- इडलीचा रवा भिजविल्यावर आणि त्यात उडदाची भिजवलेली डाळ बारीक करून घातल्यानंतर, एका कांद्याच्या चार फोडी करून त्या भिजविलेल्या पिठात घालाव्यात. म्हणजे, थंडीच्या दिवसातसुद्धा पीठ लवकर फरमेंट होते आणि इडली सुंदर बनते.
- मसाला डोसा करताना, डोशाच्या पिठात उडीद डाळ आणि तांदूळ दळतानाच त्याबरोबर एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा आणि एक कांदा (कच्चा) घालून हे पीठ दळावे. तसेच, याच पिठात एक टी-स्पून मेथ्या भिजवून घातल्यास वेगळीच चव येते. कच्चा कांदा आणि बटाटा घातल्याने डोसे कुरकुरीत (पेपर डोशाप्रमाणे) करता येतात. डोसे तव्यावर घालताना आधी तेल न घालता मिठाच्या पाण्याचा शिपका मारावा आणि स्वच्छ फडक्याने तवा पुसून मगच त्यावर पीठ पसरावे.
हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळा, खरबूज आणि कलिंगड यांच्या बियांचा वापर
- भजी करतेवेळी पालक, बटाट्याचे काप, मिरची इत्यादी जिन्नस 15 ते 20 मिनिटे आधी तुरटीच्या पाण्यात भिजत घालाव्यात. भजी कुरकुरीत व स्वादिष्ट होतात.
- ढोकळा करताना एखादे वेळी पीठ नीट फुलत नाही किंवा मधे गच्च राहते. बराच वेळ गॅसवर ठेवूनसुद्धा पीठ मनासारखे फुलत नाही. त्याची कारणे म्हणजे पीठ फार जुने होणे किंवा नीट न आंबणे असे असू शकते. अशा वेळी ते पीठ खाली काढून ताटात पसरावे, त्यात त्याच्या निम्म्याने तांदळाचे पीठ किंवा ब्रेड क्रम्स, बारीक कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून थोडेसे गरम तेल घालावे. नंतर त्याचे छोटे छोटे कबाब करावेत. कोणत्याही चटणीबरोबर द्यावे.
- काही वेळा बटाटे वडे करताना बटाटे वड्याचा मसाला संपतो आणि फक्त पातळ चण्याचे पीठ उरते. तेव्हा ते तसेच न ठेवता, झाऱ्यातून अथवा स्टीलच्या चाळणीतून त्याची बुंदी पाडावी आणि दह्यामध्ये टाकून रायता करावा. एक स्पेशल डिश तयार होते.
हेही वाचा – Kitchen Tips : कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही


