Saturday, June 21, 2025
Homeअवांतरमाऊलीची चिक्की

माऊलीची चिक्की

चंद्रशेखर माधव

माझा जन्म पुण्यातच 1975 साली झाला. ही साधारण 1985 ते 1987च्या दरम्यानची गोष्ट आहे. पहिल्यापासूनच शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात झाले. राहायला पर्वती परिसरात असल्यामुळे इयत्ता 4थीपर्यंत आई शाळेत घ्यायला यायची. ये-जा करायचे साधन म्हणजे बस. रिक्षा नव्हत्या असं नाही, पण रोज रोज रिक्षाप्रवास परवडणारा नव्हता.

इयत्ता पाचवीनंतर मात्र आम्ही आपले-आपले स्वतंत्ररीत्या शाळेत ये-जा करू लागलो. आमच्यासोबत आमच्यापेक्षा तीन-चार वर्षांनी मोठे असे आमच्याच कॉलनीत राहणारे चार-पाच जण असायचे त्यामुळे तशी काळजी नव्हती.

माझ्याच शाळेत शिकणारा, पण माझ्यापेक्षा एक वर्षांनी लहान असणारा माझा मित्र विशाल आणि मी, असे आम्ही दोघे रोज मिळून बसने ये-जा करायचो. आम्ही साधारण एकाच वयाचे असल्यामुळे आमची मैत्री चांगली जमली होती.

आमची शाळा पुण्यात आप्पा बळवंत चौकामध्ये होती. शाळेच्या बाहेरच बसस्थानक होतं. त्याकाळी बस क्रमांक 37 आणि 38 या दोन बस आमच्या घराच्या इथून जायच्या. शाळा रोज दुपारी असायची. रोज म्हणजे सोमवार ते शुक्रवार दुपारी अन् शनिवारी मात्र शाळा सकाळी सात वाजता भरत असे आणि साधारण बारा-साडेबारा वाजता सुटत असे. आमचे घर दोन बस स्टॉपच्या मध्यभागी होते. पहिला बस स्टॉप म्हणजे निलायम टॉकीज पूल चढून गेल्यानंतरचा बस स्टॉप. तेव्हा त्याला ‘महिला मंडळचा बस स्टॉप’ असं म्हणत असत. दुसरा बस स्टॉप म्हणजे लक्ष्मीनगर वसाहतीतील…

हेही वाचा – अनाहूत सल्ला

गंमत काय होती, या दोन बसस्टॉपच्या दरम्यानच बसच्या भाड्याचा टप्पा बदलत असे. म्हणजे, महिला मंडळ बसस्टॉपपर्यंतचे भाडे 25 पैसे होते. पण लक्ष्मीनगर वसाहतीत जर उतरायचं असेल, तर मात्र भाडं पस्तीस पैसे होतं. आम्ही लक्ष्मीनगर वसाहतीत उतरणार असं सांगून वडिलांकडून रोज 35 पैसे घेत होतो, पण शाळेतून परत येताना मात्र आम्ही 25 पैसे भाडे भरून महिला मंडळाच्या स्टॉपला उतरत असे. दोन्ही बस स्टॉपवरून घरापर्यंत अंतर सारखंच होतं. विशाल आणि मी, आमच्या दोघांचा हा रोजचा उपक्रम झाला होता की सोमवार ते शुक्रवार रोज 10 पैसे या पद्धतीने वाचवायचे आणि जपून ठेवायचे.

शनिवार आला आणि बसने परत आल्यानंतर एकच्या सुमारास महिला मंडळ बस स्टॉपला उतरलं की, तिथून चालत घराकडे जायचो. त्या रस्त्यावर डाव्या बाजूला एक छोटं किराणामालाचं दुकान होतं .त्या दुकानामध्ये धोतर, टोपी असा पेहराव केलेली एक मध्यमवयीन व्यक्ती असायची. त्या व्यक्तीला सगळे “माऊली” म्हणत असत.

ते दुकान खूप काही मोठं होतं, असं नाही. होतं छोटसंच, पण त्या दुकानामध्ये आमच्याकरिता एक खास आकर्षण कायम समोरच्या काऊंटरवर बरणीत भरून ठेवलेलं असायचं. हे खास आकर्षण म्हणजे खोबऱ्याची चिक्की. सोमवार ते शुक्रवार रोज जे 10-10 पैसे जमा केलेले असत, त्या 50 पैशांमध्ये त्याकाळी मोठ्ठी अशी खोबऱ्याच्या चिक्कीची पट्टी मिळत असे. बसमधून उतरलं की, घरी जाताना आम्ही हमखास त्या दुकानात थांबून प्रत्येकी एक-एक खोबऱ्याच्या चिक्कीची पट्टी विकत घेत असू. तिथून घरापर्यंत अंतर चालत सुमारे 10 मिनिटांचे होते. ते अंतर आम्ही रमत गमत, चिक्की खात खात पार करीत असू.

हेही वाचा – मावशीची हाळी म्हणजे आंब्यांची वर्दी

बालपणाच्या अपेक्षा फार छोट्या-छोट्या असतात, पण पूर्ण झाल्या की, नितांत अन् निर्व्याज सुख देऊन जातात. तसंच काहीसं आमचं दर शनिवारी ही चिक्की विकत घेऊन खाण्याच्या बाबतीत झालं होतं. कधी एकदा शनिवारी येतो, असं होऊन जात असे.

आमचा हा दर शनिवारी चिक्की खाण्याचा उपक्रम सुमारे दोन वर्ष चालू होता, म्हणजे इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत. त्यानंतर मात्र आम्ही दोघं सायकलीवर शाळेतून ये-जा करायला सुरुवात केली. साहजिकच रोज 35 पैसे मिळायचे बंद झाले आणि त्या दुकानात जाऊन दर शनिवारी चिक्की खाण्याचा आमचा उपक्रमही बंद झाला.

कालांतराने ते दुकानही बंद झाले. ते कुटुंबही स्थलांतरित झाले. पण अजूनही त्या रस्त्याने गेलो की, माझं त्या बाजूला लक्ष गेल्याशिवाय राहात नाही. नकळत त्या बालपणाच्या शनिवारच्या आठवणी जाग्या होतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!