माधवी जोशी माहुलकर
विदर्भातील खाद्यसंस्कृती समृद्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडा या गावांसह इतर खेड्यांमधे वाळवणाचा असाच एक पापडा हा पारंपरिक प्रकार केला जातो. पापडा करताना गहू ओलावून पीठ तयार करतात. हे पीठ चांगले मळून, दीड-दोन तास मुरत ठेवतात. नंतर त्याच्या मोठमोठ्या पोळ्या लाटून घेतात आणि त्या परत हातावर घेऊन त्यांना दोन्ही हातांनी गोल गोल फिरवत अजून मोठा आकार देतात. एका मोठ्या परडीवर तो पापडा वाळत घालतात. पापडा उन्हात कडकडीत वाळले की त्यांचा हातानेच चुरा करून हवाबंद डब्यात भरून ठेवतात. हा प्रकार वर्षभर साठवून ठेवला जातो. अगदी फोडणीच्या पोळीसारखा किंवा फोडणीच्या शेवयांसारखाच असणारा हा पदार्थ कसा करतात ते पाहूया!
एकूण कालावधी – 20 ते 30 मिनिटे.
साहित्य
- पापडा (पापडचुरा, पापळा) – 2 वाट्या
- चिरललेला कांदा – 1
- हिरव्या मिरच्या – 3 ते 4
- कढीलिंबाची पाने – 5 ते 6
- शेंगदाणे – मुठभर
- लाल तिखट – 1 ते 2 चमचे
- हळद – 1 चमचा
- मीठ – चवीनुसार
- मोहरी – 1 लहान चमचा
- जिरे – 1 लहान चमचा
- हिंग – लहान अर्धा चमचा
- साखर – चवीनुसार
- बारीक चिरलेली कोथिंबीर – मुठभर
- तेल – 1 पळीभर
- पाणी – 1 पेला
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले
कृती
- कढईत तेल तापवून घ्यावे.
- तेल तापल्यावर त्यात मोहरी, जिरं टाकून ते तडतडल्यावर हिंग टाकावा आणि लगेच कढीलिंबाची पाने आणि हिरव्या मिरच्या टाकून ते परतून घ्यावे.
- थोड्या परतल्यावर त्यामध्ये शेंगदाणे टाकावे आणि गॅस मंद करून शेंगदाण्यांचा रंग थोडा बदलल्यावर कांदा टाकून तोपण थोडा गुलाबी होऊ द्यावा.
- नंतर त्यात एक चमचा हळद, दोन चमचे तिखट टाकावे आणि त्या फोडणीत एक पेलाभर पाणी टाकावे.
- त्या पाण्यात चवीनुसार मीठ आणि साखर टाकावी.
- पाण्याला उकळी आली की, त्यामध्ये पापडा किंवा पापडचुरा टाकावा.
- गॅसची आच थोडी कमी करून कढईवर झाकण ठेवावे.
- हा पापडा छान सुटा होईपर्यंत नरम शिजवून घ्यावा. यातील पाणी शोषले जाऊन पापडा सुटसुटीत, मोकळा आणि छान नरम होतो.
- गॅस बंद करून दोनेक मिनिटे कढई ताटलीने झाकून ठेवावी.
- हा पापडा सर्व्ह करताना त्यावर मुठभर कोथिंबीर पेरावी
- हा चविष्ट पदार्थ दही आणि लोणचे यासोबत खायला द्यावा.
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


