दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 28 एप्रिल 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 08 वैशाख शके 1948; तिथि : द्वादशी 18:51; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 22:35
- योग : व्याघात 21:03; करण : बव 06:30;
- सूर्य : मेष; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:13; सूर्यास्त : 18:59;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
प्रसिद्ध मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक
टीम अवांतर
प्रसिद्ध मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म 28 एप्रिल 1931 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील करुळ गावात झाला. कोकणातील जैतापूरजवळील विजयदुर्ग बंदर या ठिकाणी परिवहन खात्यात लेखनिक म्हणून त्यांच्या नोकरीस आरंभ झाला. 1953 साली त्यांची विजयदुर्गहून कोल्हापुरला आणि 1956 मध्ये त्यांची मुंबईला बदली झाली. मुंबईतील अनुभवामुळे त्यांच्या लेखनाचा परिघ विस्तारत गेला.
कर्णिक यांच्या साहित्यनिर्मितीचा आरंभ शालेय जीवनापासून झाला. 1951 साली रत्नाकर या साप्ताहिकात त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्या कथेचे नाव ‘कृष्णाची राधा’. विजय तेंडुलकर संपादित ‘वसुधा’ मासिकात त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्याचबरोबर मुंबईवरून निघणाऱ्या ‘कथासृष्टी’ मासिकात त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या.
हेही वाचा – वास्तव अन् आभासी जगामधली धूसर रेषा!
कर्णिक यांनी सातत्यपूर्ण लेखन करून साठोत्तरी कालखंडात स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या समृद्ध आणि वाड्मयीन व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. त्यांनी कथा, कादंबरी आणि ललितगद्य या वाड्मयप्रकारात विपुल निर्मिती केली. याबरोबरच कविता, नाटक, चरित्र आणि आत्मचरित्र हे वाड्म़यप्रकारही हाताळले. त्यांचे कथा आणि कादंबरी वाड्मयप्रकारातील योगदान लक्षणीय आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृतीविषयक विविध संस्थांवर त्यांनी सातत्याने आणि कृतिशील कार्य केले आहे. साहित्यनिर्मिती आणि साहित्यविषयक कार्यामुळे त्यांना बरीच लोकप्रियता लाभली आहे. साधारणपणे 41 कथासंग्रह, 9 कादंबऱ्या, 6 ललित लेखनाची पुस्तके, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य यासोबतच ‘करुळचा मुलगा’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. याशिवाय, काही दूरदर्शन मालिका, मराठी-हिंदी चित्रपटांच्या पटकथा, आकाशवाणीवरील नभोनाट्ये, श्रुतिका, भाषणे, अनुवाद, स्तंभलेखन यातही त्यांनी भरीव योगदान दिले आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, केशवसुत स्मारक, कोकण कला अकादमी अशा कितीतरी चांगल्या गोष्टींच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. रत्नागिरी येथे भरलेल्या 64 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. अस्मितादर्श साहित्य मेळाव्याचे अध्यक्षपदही त्यांना लाभले. केंद्र शासनाच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, मॅजेस्टिक पुरस्कार, मॅग्नम फाऊंडेशन पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कार, रणजित देसाई पुरस्कार इत्यादी सन्मान त्यांना मिळाले आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
आजचे राशीभविष्य
मेष – नोकरदार जातकांना कार्यालयात स्वतःलाच आघाडी सांभाळावी लागेल, कोणीही मदत करणार नाही. चांगला आर्थिक लाभ संभवतो. तुमची प्रतिभा आणि मेहनत यामुळे आज इतरांपेक्षा वेगळे बनाल. घरात किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम गरजेचा आहे.
वृषभ – आज मन उलट सुलट विचारांमध्ये गुंतलेले राहील. अशावेळी कामाच्या ठिकाणी झालेली एक छोटीशी चूकही मोठा फटका देऊ शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. तुमचा विचार आणि दृष्टिकोन बदलण्याची संधी मिळेल. खर्च नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो.
मिथुन – कामासाठी दिवस चांगला आहे. काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या एखाद्या समस्येवर तोडगा निघू शकतो. निर्णय घेताना मात्र घाई करणे टाळा. कोणतीही नवीन कल्पना स्वीकारण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे ठरेल. नातेसंबंधांमध्ये स्पष्टता ठेवा.
कर्क – घर तसेच कामाच्या ठिकाणी लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी थांबा आणि विचार करा. पैशांची आवक चांगली असेल, पण खर्चही वाढेल. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. इतरांना मदत करण्यात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात अधिक रस असेल.
सिंह – कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. एखादे जुने काम पूर्ण होऊ शकते. व्यवसाय विस्तारासाठी आणि नवीन धोरणांवर काम करण्यासाठी दिवस चांगला आहे. प्रवासाचे नियोजन केले जाऊ शकते. पैशांचा ओघ चांगला राहील. नातेसंबंध चांगले राहतील.
कन्या – कामात सुधारणा करण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुमची कामे शांतपणे आणि संयमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, ज्याचे चांगले परिणाम दिसून येतील. पैशांचा सुज्ञपणे वापर करा. कौटुंबिक जीवनात शांतता नांदेल. मात्र इतर नात्यांमध्ये फार अपेक्षा ठेवू नका.
तुळ – तुमच्यासमोर काही नवीन संधी येतील, ज्यांचा स्वीकार करण्यासाठी मोकळ्या मनाने विचार करावा लागेल. नोकरदार जातकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक परिस्थिती ठीक असेल. नात्यांमध्ये स्पष्टपणे बोलणे सर्वोत्तम आहे, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात.
वृश्चिक – रखडलेल्या कामात आज प्रगती दिसून येईल. कोणताही निर्णय घ्या, मात्र तो तुम्हाला विचारपूर्वक घ्यावा लागेल, कारण योग्य निर्णयामुळे मोठे फायदे मिळू शकतात. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल, नातेसंबंध अधिक घट्ट होतील. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल.
धनु – कामाबद्दल तुमचा दृष्टिकोन सकारात्मक राहील, ध्येयांच्या दिशेने वेगाने वाटचाल कराल. तथापि, प्रयत्नपूर्वक संयम ठेवावा लागेल. कामाला विलंब होईल, पण त्याचे परिणाम चांगले मिळतील. चांगेल उत्पन्न मिळेल, पण जपून खर्च करा. जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील.
हेही वाचा – सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!
मकर – कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत दिसून येईल आणि त्याचे परिणामही दिसतील. एक नवीन जबाबदारी मिळू शकते. करिअरसंबंधीचे काही निर्णय तुम्हाला चिंतेत टाकू शकतात, पण हेच निर्णय भविष्यात यशाकडे घेऊन जातील. तुमची आर्थिक स्थिती स्थिर असेल.
कुंभ – नवीन कल्पना पुढे येतील, पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कामाच्या ठिकाणी सृजनशील विचार उपयुक्त ठरेल. स्थावर मालमत्तेशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला राहील. पैशांचा सुज्ञपणे वापर करा.
मीन – तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा गोष्टी बिघडू शकतात. आज अशा काही संधी मिळतील, ज्या तुमचे भविष्य सुधारण्यास मदत करतील. मात्र आर्थिक बाबतीत काळजी घ्या. कुटुंबाकडून भक्कम पाठिंबा मिळेल. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा.


