दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 27 ऑगस्ट 2025; वार : बुधवार
भारतीय सौर : 05 भाद्रपद शके 1947; तिथि : चतुर्थी 15:43; नक्षत्र : चित्रा अहोरात्र
योग : शुभ 12:33; करण : बव 28:48
सूर्य : सिंह; चंद्र : कन्या 19:20; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:57
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
श्रीगणेश चतुर्थी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – सर्जनशीलता आणि भविष्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी उत्तम दिवस आहे. वैयक्तिक ध्येयासाठी काम करत असाल किंवा करिअरमध्ये प्रगती करत असाल, तर मोठी स्वप्ने पाहण्याची आणि उच्च ध्येये गाठण्याची वेळ आली आहे.
वृषभ – नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे. आर्थिक निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. शिस्त आणि चिकाटी यांची मोठी मदत मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा, जोखीम घेण्यास घाबरू नका.
मिथुन – नियमित व्यायाम आणि आहाराबाबत विशेष काळजी घेत दिनचर्या निरोगी ठेवा. काही कारणांमुळे नैराश्य येत असेल तर, त्यासाठी समुपदेशकाची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. ताण घेऊ नका.
कर्क – ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे कर्क जातकांसाठी तंतोतंत लागू पडणारे आहे. चांगला लौकिक होईल, अशी एखादी मोठी कामगिरी तुमच्या हातून घडेल. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळेल. एक नवा उत्साह अंगात संचारेल.
सिंह – सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमचे सामाजिक वर्तुळ सक्रिय आणि मदतीला धावून येणारे असेल, त्यामुळे तुमच्या निर्णयांबाबत अधिक आत्मविश्वास असेल. विवाहोत्सुक जातकांना जोडीदार भेटण्याची शक्यता आहे.
कन्या – आज धनाची आवक वाढेल. फक्त ते लगेच खर्च करू नका. आलेल्या पैशांची लगेच गुंतवणूक करू नका. आज एखाद्या खास व्यक्तीबद्दल काळजी वाटेल. जोडीदाराला एखाद्या आवडत्या कामात मदत करा.
हेही वाचा – पालकांची जबाबदारी : नीटनिटकेपणा अन् स्पर्धेसाठी प्रोत्साहन
तुळ – आज आर्थिक परिस्थिती सकारात्मक असेल. कोणताही वाद, संघर्ष हे अंगभूत मुत्सद्देगिरी आणि निष्पक्षता यासारख्या गुणांचा वापर करून सहजपणे सोडवता येतील. आज जोडीदारासोबतचे संबंध खूपच सकारात्मक असतील.
वृश्चिक – आज भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. त्यासोबत लहान वादही त्रास देऊ शकतात, त्यामुळे जिभेवर नियंत्रण ठेवा. जोखमीच्या गोष्टींमध्ये पैसे अजिबात गुंतवू नका, आर्थिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत.
धनु – शारीरिक आणि मानसिक संतुलन साधता येईल. इतरांशी दृढ संबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. निष्पक्षतेची तीव्र भावना ही करिअरच्या वाढीसाठी तुमची मोठी ताकद आहे. आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती यात सकारात्मक वाढ होणार आहे.
मकर – दैनंदिन जीवनात निरोगी सवयी आणि दिनचर्येचा समावेश करून सकारात्मक उर्जेचा फायदा घ्या. तुमच्या मूल्यांशी आणि आकांक्षांशी जुळणारी स्मार्ट, कॅल्युलेटीव्ह अशी गुंतवणूक करा. सकारात्मक संबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करा.
कुंभ – आज, स्वतःच्या दीर्घकालीन ध्येयांवर आणि प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यास प्राधान्य द्या. संवादाचे महत्त्व समजून येईल. सकारात्मक, मंगलमय वातावरणाचा फायदा घेत, स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करायला लागा. खर्च कमी करा.
मीन – या राशीच्या जातकांना इतके भान आहे की, ते कोणत्याही परिस्थितीला खूप चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतात. यालाच जगण्याची कला म्हणतात. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमाच्या बाबतीत नशिबाची उत्तम साथ मिळेल. संततीची प्रगती सामान्य असेल.
हेही वाचा – एका संपाची कहाणी
दिनविशेष
इतिहास संशोधक सेतुमाधव पगडी
टीम अवांतर
इतिहास संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि महाराष्ट्र सरकारच्या ‘गॅझेटियर्स’चे संपादक अशी ओळख असणाऱ्या सेतुमाधव पगडी यांचा जन्म 27 ऑगस्ट 1910 रोजी निलंगा येथे झाला. गुलबर्गा, उस्मानाबाद आणि पुणे येथे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी 1928 आणि नंतर 1930 मध्ये अनुक्रमे बनारस हिंदू विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ येथून कला पदवी प्राप्त केली. सतत सुरू असणारे संशोधन, लेखन, अभ्यास, प्रवास यांच्या मदतीने सातत्याने साठ वर्षे इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून जवळपास मराठी आणि इंग्रजी भाषेत त्यांनी 66 ग्रंथ लिहिले. 1957 साली त्यांनी उर्दू भाषेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. मराठ्यांच्या इतिहासासंबंधी फारसी कागदपत्रांचा अभ्यास आणि अनुवादाचे महत्त्वाचे काम त्यांनी पार पाडले. 1960 ते 70 या दशकात उर्दू आणि फारसी भाषेतील जवळपास 40 ग्रंथांचा अनुवाद त्यांनी केला. 1987मध्ये त्यांना मराठवाडा विद्यापीठाकडून D.Litt पदवी प्रदान करण्यात आली. 1992 साली भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळाला. शिवाजी महाराजांवर त्यांनी लिहिलेले पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, फारसी अशा जवळपास 17 भाषा त्यांना अवगत होत्या. ‘जीवनसेतू’ हे आत्मचरित्र लिहिण्याआधी विविध भाषांमधील किमान शंभर आत्मचरित्रे त्यांनी वाचून काढली. अशा या अभ्यासू संशोधकाचे 14 ऑक्टोबर 1994 रोजी निधन झाले.