दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 25 नोव्हेंबर 2025; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 04 अग्रहायण शके 1947; तिथि : पंचमी 22:56; नक्षत्र : उत्तराषाढा 23:56
- योग : गंड 12:48; करण : बव 10:12
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:50; सूर्यास्त : 17:59
- पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – मोठे आर्थिक व्यवहार टाळण्याचा शक्यतो प्रयत्न करा. कुणाचा सल्ला न घेता आज कुठलीही मोठी गुंतवणूक करू नका. कोणत्याही वादात पडू नका. कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यांचे वर्तन बघून अस्वस्थ होऊ शकता. आज मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. आध्यात्मिक कार्यासाठी खर्च केला जाईल.
वृषभ – दिवस शुभ आणि फलदायी राहील. व्यवसायात चांगला नफा होईल, लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम राहील. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विवाहोत्सुक जातकांना जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे समाजातील प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा वाढेल.
मिथुन – व्यवसायात यश मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर खूश होतील. आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान मिळेल. पत्नी आणि मुलाकडून सकारात्मक पाठबळ मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
कर्क – आरोग्यात चढ-उतार बघायला मिळेल. वरिष्ठांमुळे कामाच्या ठिकाणी अडचणी उद्भवू शकतात. खर्च जास्त होईल. पण त्याचबरोबर आज मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्व अनुकूल होईल.
सिंह – मन शांत आणि प्रसन्न ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण करणे आणि अध्यात्मिक वाचनात मग्न राहाणे. राग आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा मोठ्या वादात अडकू शकता. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. आज जास्त खर्च होईल, ज्यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. नोकरदार जातकांनी काळजीपूर्वक कामे पूर्ण करावी.
हेही वाचा – ऋचा… आयुष्याच्या नव्या डावाची सिद्धता!
कन्या – व्यवसाय चांगला राहील, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र अनावश्यक खर्चाचे प्रमाणही जास्त असेल. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील, त्यामुळे कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. जुन्या मित्रांच्या भेटी होतील, कुटुंबाबरोबर सहलीचे नियोजन कराल. अतिविचारांमुळे मानसिकदृष्ट्या थकवा येईल. आरोग्याची काळजी घ्या.
तुळ – दिवस शुभ आणि फलदायी असेल. कामावर लक्ष केंद्रित केल्याने तसेच कठोर परिश्रम केल्याने यश निश्चित होईल. हे यश आनंद देईल. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. कौटुंबिक वातावरण देखील अनुकूल असेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आनंदी आणि निरोगी रहाल. मात्र, भावनांच्या भरात वाहून जाऊ नका.
वृश्चिक – दिवस चांगला जाईल. व्यवसायात आर्थिक फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे काम यशस्वी होईल. लेखन आणि सर्जनशील कामात अधिक रस घ्याल. बौद्धिक चर्चांमध्ये सहभागी व्हाल, त्यामुळे कामात आणखी यश मिळेल. कीर्ति आणि प्रतिष्ठा वाढेल.
धनु – हट्टी स्वभाव सोडून द्या, अन्यथा अडचणीत येऊ शकता. भावनांवर नियंत्रण ठेवल्याने मानसिक चिंता कमी होईल. आर्थिक बाबी सुरळीत होतील. कपडे आणि सौंदर्यप्रसाधनांवर खर्च होईल. आज कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळा. बौद्धिक आणि तार्किक कामांवर लक्ष केंद्रित करा. पोटाशी संबंधित आजारांपासून सावध रहा, प्रवास टाळा.
मकर – मन प्रसन्न राहील, मानसिकदृष्ट्या प्रसन्न वाटेल. कुटुंबातील सदस्यांसोबत विविध समस्यांवर चर्चा होईल, त्या समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल. मित्रांसोबत जवळीकता आणखी वाढेल. आज प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. काहीशी मानसिक चिंता जाणवेल, पण ती तात्पुरती असेल. जमीन, घर, वाहन याबाबत व्यवहार करताना काळजी घ्या.
कुंभ – व्यवसाय चांगला चालेल. दुपारनंतर मित्र आणि नातेवाईकांच्या भेटीमुळे आनंद मिळेल, मन चिंतामुक्त असेल. आज, संपत्तीत वाढ होण्याची शक्यता हे. तुमच्यावर भावंडांच्या प्रेमाचा वर्षाव होईल. कुटुंबातील एखादा सदस्य असमाधानी असू शकतो, त्यामुळे नाहक वादविवादांनी कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये, याची काळजी घ्या.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटासाठी हस्तव्यवसाय
मीन – कामाच्या ठिकाणी किरकोळ समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे चिंता निर्माण होईल. मनातून नकारात्मक विचार काढून टाका, अन्यथा ते त्रासदायक ठरतील. बोलण्यात संयम ठेवा. अनावश्यक खर्चाबाबत सावधगिरी बाळगा. आज स्वतःमधील निर्णयक्षमतेचा अभाव जाणवेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील, कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल.
दिनविशेष
‘चकदा एक्स्प्रेस’ झुलन गोस्वामी
टीम अवांतर
महिला क्रिकेट जगतात ‘चकदा एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झुलन गोस्वामीचा जन्म 25 नोव्हेंबर 1982 रोजी पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील चकदाहा येथे झाला. वयाच्या 15 व्या वर्षी तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 1992 सालच्या विश्वचषक स्पर्धा टीव्हीवर पाहिल्यानंतर तिला क्रिकेटमध्ये रस निर्माण झाला होता. 1997 च्या महिला क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियन फलंदाज बेलिंडा क्लार्कला पाहिल्यानंतर क्रिकेटर होण्याचा निर्णय घेतला. कोलकाता येथील क्रिकेट प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, तिला बंगाल महिला क्रिकेट संघातून खेळण्यासाठी बोलावण्यात आले. 2001-2002 मध्ये, तिने वयाच्या 19 व्या वर्षी चेन्नई येथे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2006 मध्ये, इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी तिची निवड करण्यात आली. 2007 मध्ये, तिने आयसीसी महिला खेळाडूचा पुरस्कार जिंकला. त्या वर्षी कोणत्याही भारतीय पुरुष खेळाडूला वैयक्तिक पातळीवर हा पुरस्कार मिळालेला नव्हता. 2008च्या अखेरीस तिने मिताली राजकडून कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली आणि 2011 पर्यंत ती कर्णधारपदावर होती. 2010 मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि 2012 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याने हा मान मिळवणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. नोव्हेंबर 2020 मध्ये तिला आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द डिकेड पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. एकदिवसीय सामन्यांमध्ये 250 पेक्षा जास्त विकेट्स मिळवणारी ती जगातली एकमेव महिला खेळाडू आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्सचा विक्रमही तिच्याच नावावर आहे. दोन दशकांच्या कारकिर्दीत झुलन 12 कसोटी सामने, 202 एकदिवसीय सामने आणि 68 टी-ट्वेंटी सामने खेळली. मध्यमगती गोलंदाज ही तिची मुख्य ओळख असली, तरी फलंदाजीतही तिने संघासाठी योगदान दिलं आहे. झुलनने ऑगस्ट 2018 मध्ये टी-20 सामन्यांमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर 2022 हे तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं शेवटचं वर्ष ठरलं. झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित एक चित्रपट देखील तयार असून यात अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने झुलनची भूमिका साकारली आहे.


