दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 24 मे 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 03 ज्येष्ठ शके 1948; तिथि : नवमी 28:30; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 26:50;
- योग : हर्षण 27:44; करण : बालव 16:23;
- सूर्य : वृषभ; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:08;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ माधव धनंजय गाडगीळ
टीम अवांतर
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ माधव धनंजय गाडगीळ यांचा जन्म 24 मे 1942 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वडील ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे’ आजीव सदस्य होते. सलीम अलींसारखे ख्यातनाम पक्षीतज्ज्ञ त्यांचे मित्र होते. जे. बी. एस. हाल्डेन हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ गाडगीळांच्या वडिलांच्या परिचयाचे होते. या पार्श्वभूमीवर जैवविविधता टिकवून ठेवलेल्या वेताळ टेकडीच्या परिसरात भटकंती करणाऱ्या माधवरावांना जीवशास्त्र या विषयात रस निर्माण झाला. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी पदवी मिळवली. नंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई येथून सागरी जीवविज्ञानातील पदव्युत्तर पदवी मिळवली.
हेही वाचा – रमेश वेटर अन् न दिलेली टीप
पीएच्.डी.च्या अभ्यासासाठी माधवराव अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात गेले. जीवशास्त्र विषयात गणितीय प्रतिमानांचा आधार असणारा प्रबंध सादर करणारे हार्वर्डमधील ते पहिलेच विद्यार्थी होते. त्यांच्या या कामाचा संदर्भ पुढे अनेक संशोधक दीर्घ काळ घेत राहिले. गाडगीळांना विल्यम बॉसर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली माशांच्या वर्तनाबद्दल जीवविज्ञानातील पीएच्.डी. मिळाली. त्यांच्या संशोधनासाठी हार्वर्ड कंप्युटिंग सेंटरने आय.बी.एम. शिष्यवृत्ती त्यांना दिली होती.
हार्वर्ड विद्यापीठात हार्वर्ड विद्यापीठात जीवशास्त्र व्याख्याता, स्टॅन्फर्ड विद्यापीठात मानवी जीवशास्त्राचे अतिथी प्राध्यापक व्याख्याता, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कलीत सन्माननीय भारतीय अमेरिकन व्याख्याता अशी पदे त्यांनी भूषविली. पुढे भारतात परत आल्यानंतर पुण्यात दोन वर्षे ‘महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’मध्ये (आता आघारकर संशोधन संस्था) वैज्ञानिक अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. 1973 ते 2004 दरम्यान ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ बंगळूरू हे त्यांनी आपल्या कामाचे केंद्र ठेवले. तेथे आधी सहाय्यक, सहयोगी प्राध्यापक, नंतर प्राध्यापक आणि शेवटी त्यांनी तेथेच ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ ही संस्था स्थापन केली आणि तिचे ते अध्यक्ष होते.
हेही वाचा – अधीर ‘मंजुळा’चं वेड
केंद्र शासनाच्या स्वतंत्र पर्यावरण विभाग स्थापन करण्यासाठीच्या समितीचे गाडगीळ सदस्य होते. त्यांनी त्याचा आराखडा बनवून स्वतंत्र पर्यावरण विभाग साकारला. जीवावरण संवर्धनासाठी ‘निलगिरी’ टेकड्या संरक्षित क्षेत्रासाठीचा प्रकल्प आराखडा गाडगीळांनी तयार केला. भारतातील हा पहिलाच प्रयत्न होता. 1986 ते 1990 या काळात ते भारताच्या पंतप्रधानांच्या विज्ञान तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे सदस्य राहिले. जैवविविधता परिषदेच्या सल्लागार समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. पंतप्रधानांच्या पुढाकाराने वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने स्थापलेल्या विशेष कार्यगटाच्या पाच निष्णात सदस्यांपैकी ते एक होते.
गाडगीळांना भारत सरकारतर्फे पद्मश्री आणि पद्मभूषण, आयसीएसएसआरतर्फे विक्रम साराभाई पुरस्कार आणि पर्यावरण संरक्षणासाठी दिला जाणारा प्यू (PEW) विद्वत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने गाडगीळांना पर्यावरणशास्त्रातील कामगिरीसाठी टायलर पुरस्कार दिला. सहा इंग्रजी पुस्तकांचे ते लेखक आहेत. सामान्यांसाठी मराठी, कानडी आणि इंग्रजी भाषांतून विपुल लिखाण आणि भाषणे त्यांनी केली. 7 जानेवारी 2026 रोजी या निसर्गप्रेमी अभ्यासकाचे निधन झाले.


