दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 19 डिसेंबर 2025; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 28 अग्रहायण शके 1947; तिथि : अमावस्या अहोरात्र; नक्षत्र : ज्येष्ठा 22:50
- योग : शूल 15:46; करण : चतुष्पाद 18:07
- सूर्य : धनु; चंद्र : वृश्चिक 22:50; सूर्योदय : 07:04; सूर्यास्त : 18:04
- पक्ष : कृष्ण; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
अमावस्या
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – धोरणात्मक निर्णयांसाठी त्वरित हालचाल करणे आवश्यक आहे. आक्रमक पवित्र्यामुळे एखाद्यासोबतच्या भावनिक संबंधांना धक्का बसू शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. प्रवास पुढे ढकलणे फायदेशीर ठरेल.
वृषभ – कौटुंबिक जीवनात एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर सगळ्यांसोबत झालेले एकमत परस्परांवरील विश्वास वाढवेल, जो भविष्यातील अनेक समस्या सोडवण्यास उपयुक्त ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले जाईल.
मिथुन – विरोधक कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यावर हुशारीने उपाय शोधावे लागतील. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसोबत भावनिक संबंध वाढतील. नवीन व्यवसाय सुरू होण्यास वेळ लागेल, त्यामुळे धीर धरा.
कर्क – तुमच्या संवेदनशील स्वभावात बदल होईल. पूर्ण आत्मविश्वासाने समस्या सोडवली तर परिस्थितीवर तुमचेच नियंत्रण राहील. कौटुंबिक जीवनात तुमच्या मतांना अधिक महत्त्व मिळेल.
सिंह – भावनिकदृष्ट्या शांत राहणे थोडे कठीण जाईल. संभाषणादरम्यान आपल्याच प्रियजनांवर शाब्दिक हल्ला करणे टाळा. आर्थिकदृष्ट्या, नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची ही योग्य वेळ नाही. शेअर बाजारापासून दूर राहणे फायदेशीर ठरेल.
हेही वाचा – चंद्र आहे साक्षीला…
कन्या – वर्चस्वाच्या संघर्षाला राजनैतिकतेची आवश्यकता असेल. कामाच्या ठिकाणी, तुमचे प्रयत्न जास्त पण श्रेय कमी, अशी परिस्थिती असेल. मात्र, निराश होऊ नका, उशिरा का होईना श्रमाची दखल घेतली जाईल. भावंडांशी बोलताना एकमेकांवर आरोप करणे टाळा.
तुळ – संतुलित वर्तनाने, दोन भिन्न मतांमध्ये तुमचा दृष्टिकोन मांडण्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे प्रत्येकाच्या आदरास पात्र ठराल. तुमच्या चातुर्याचे कौतुक केले जाईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याबाबत काही काळासाठी चिंता होऊ शकते.
वृश्चिक – एखाद्या विशिष्ट मुद्द्यावरून मन अस्वस्थ होऊ शकते. आज एखाद्या विशिष्ट व्यक्तीसोबत सूडबुद्धीने वागणे टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. मतभेदांचा आदर करा. नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल.
धनु – तुमच्यावर आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. उच्च आर्थिक जोखीम असलेल्या निर्णयांपासून दूर राहणे चांगले. विरोधकांना हाताळताना संयम बाळगावा लागेल. भूतकाळातील एखादी घटना आयुष्यात तणाव निर्माण करू शकते.
मकर – अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन उपक्रम फायदेशीर ठरतील. भागीदारीत सुरू केलेल्या व्यवसायात मतभेदांमुळे काही तणाव निर्माण होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात जोडीदाराच्या भावनांना प्राधान्य द्यावे लागेल.
कुंभ – वेळ तुमच्या बाजूने वळत आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त भत्ते मिळू शकतात. आज वरिष्ठांच्या मतांशी सहमत व्हावे लागेल. सध्या नोकरीत कोणताही बदल करणे फारसे फायदेशीर ठरणार नाही. तसा विचार असल्यास बेत पुढे ढकला.
हेही वाचा – “आई तू असं का केलंस?”
मीन – भावनिकदृष्ट्या आज एकटे वाटू शकते. परिस्थितीत बदल होण्याची चिन्हे आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करताना किंवा अन्य आर्थिक गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. थोड्याशा निष्काळजीपणामुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात.
दिनविशेष
प्रख्यात गुजराती कवी उमाशंकर जोशी
टीम अवांतर
आधुनिक काळातील प्रख्यात गुजराती कवी, एकांकिका लेखक, निबंधकार आणि समीक्षक अशी ओळख असणाऱ्या उमाशंकर जोशी यांचा जन्म 21 जुलै 1911 रोजी गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील बमना या गावी झाला. शिक्षणासाठी ते मुंबईत आले. इथूनच त्यांनी एम्. ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे ते गुजरात विद्यापीठात पदव्युत्तर अध्यापनासाठी गेले आणि नंतर तिथेच ते गुजराती भाषेचे प्राध्यापक झाले. याच विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ लँग्वेजिस’ संस्थेचे नंतर ते संचालकही बनले. तर 1966 ते 1972 या काळात ते गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू होते.
गुजरातीशिवाय त्यांना हिंदी, मराठी, संस्कृत, बंगाली आणि इंग्रजी या भाषा चांगल्या अवगत होत्या. याशिवाय या भाषांमधील साहित्याचाही त्यांचा सखोल व्यासंग होता. प्रादेशिक आणि आखिल भारतीय स्तरांवरील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारही त्यांना लाभले. ज्यात रणजीतराम सुवर्णचंद्रक, महिदा पुरस्कार, नर्मद सुवर्णपदक, उमा स्नेहरश्मी पुरस्कार, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार, नानालाल काव्य पुरस्कार यांचा अंतर्भाव आहे.
उमाशंकरांनी विविध प्रकारची विपुल साहित्यनिर्मिती केली. ज्यात विश्वशांती, गंगोत्री, निशीथ, विराट प्रणय, प्राचीना यासारखी पद्यनाट्ये; आतिथ्य, महाप्रस्थान, अभिज्ञासारखे काव्यग्रंथ; सापना भारा, शहीद हे एकांकिकासंग्रह; श्रावणी मेळो, विसामो यासारखे लघुकथासंग्रह; पारकां जण्यां सारखी कादंबरी; अखो : एक अध्ययन, समसंवेदन, अभिरूचि, शैली अने स्वरूप, निरीक्षा, कविनी साधना, श्री अने सौरभ इत्यादी समीक्षाग्रंथ; गोष्ठी हा निबंधसंग्रह; प्रा. बळवंतराय ठाकोर आणि बालाशंकर यांच्या काव्यांचे केलेले उत्कृष्ट संपादन; पुराणोमां गुजरात हा महत्त्वाचा संशोधनपर ग्रंथ; उत्तररामचरित आणि शाकुंतल हे त्यांनी केलेले संस्कृत नाटकांचे अनुवाद अशा विपुल साहित्य संपदेचा समावेश आहे. त्यापैकी निशीथ या पद्यनाट्याला भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कार प्राप्त झाला. अशा या महान साहित्यिकाचे 19 डिसेंबर 1988 रोजी निधन झाले.


