दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 17 जून 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 27 ज्येष्ठ शके 1948; तिथि : तृतीया 21:39; नक्षत्र : पुनर्वसु 13:37;
- योग : ध्रुव 20:51; करण : तैतिल 11:12;
- सूर्य : मिथुन; चंद्र : मिथुन 08:13; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:17;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
टेनिसपटू लिएंडर पेस
टीम अवांतर
विजय अमृतराज यांच्यानंतर टेनिसमध्ये भारताचा तिरंगा फडकवत ठेवणाऱ्या लिएंडर पेस याचा जन्म 17 जून 1973 रोजी गोव्यात झाला. लिएंडरचे वडील व्हेस पेस हे निवृत्त हॉकी खेळाडू होते. 1972च्या म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये त्यांचा समावेश होता. तर, लिएंडरची आई जेनिफर पेस ही माजी बास्केटबॉल खेळाडू होती. 1982 साली त्यांनी भारतीय बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले होते.
1985 साली लिएंडर मद्रासमधील ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकादमीमध्ये दाखल झाला. इथेच त्याच्या टेनिस जीवनाला आकार मिळण्यास सुरुवात झाली. 1990 साली विम्बल्डन स्पर्धेच्या जुनियर स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवून लिएंडर प्रसिद्धी झोतात आला. आपल्या कारकीर्दीत लिएंडरने पुरुष दुहेरीमध्ये 8 तर मिश्र दुहेरीमध्ये 10 ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे मिळवली. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वोत्तम दुहेरी टेनिस खेळाडूंपैकी एक मानला जातो.
हेही वाचा – विहिरीतला आवाज…
भारतामधील आजतागायत सर्वात यशस्वी टेनिस खेळाडू म्हणून पेसची ओळख आहे. ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवण्यासोबतच पेस याने 1996 अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेमधील पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक पटकावले. 1992 ते 2012 दरम्यान सलग सहा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला पेस हा एकमेव भारतीय खेळाडू तर जगातील एकमेव टेनिस खेळाडू आहे.
इतर स्पर्धांमध्ये त्याने भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. डेव्हिस करंडकासाठीच्या भारतीय संघाचा तो अनेक वर्षे कर्णधार होता. 2010 सालच्या विम्बल्डन स्पर्धेमध्ये विजय मिळवून पेस हा रॉड लेव्हर याच्याखालोखाल तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये विम्बल्डन विजेतेपदे मिळवणारा दुसरा टेनिस खेळाडू ठरला.
त्याचवर्षी पेसने ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट या गीत सेठी आणि प्रकाश पडुकोण यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये प्रवेश केला. भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देणे तसेच अधिकाधिक जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हे या संस्थेचे ध्येय आहे.
1996-97मध्ये लिएंडरला राजीव गांधी खेल रत्न, 1990मध्ये अर्जुन पुरस्कार तर 2001 साली पद्मश्री तर 2014 साली पद्मभूषण अशा अनेक उच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
आजचे राशीभविष्य
मेष – कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा पद मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक दृढ होईल. विरोधकांच्या बोलण्याला फार महत्त्व देऊ नका. लहान योजनांमधून देखील मोठ्या लाभांची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांची ध्येये साध्य करण्यासाठी पूर्ण एकाग्रतेने कठोर परिश्रम करावे लागतील.
वृषभ – स्पर्धात्मक वृत्ती तुम्हाला अधिक मेहनत करण्यास प्रवृत्त करेल. स्वतःला सिद्ध करण्याची तीव्र इच्छा असेल. तुमचे गोड बोलणे देखील लोकांना आकर्षित करेल. काही प्रशासकीय किंवा राजकीय समस्यांमुळे अडचणी येऊ शकतात, त्यामुळे सतर्क राहा. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील.
मिथुन – प्रत्येक परिस्थितीत संयम आणि संतुलन राखणे आवश्यक आहे. व्यवसायात मोठे धोके पत्करणे टाळा, कामात स्पष्टता ठेवा; यामुळे गुंतागुंत टाळण्यास मदत होईल. सरकारी योजना किंवा सुविधांमधून लाभ मिळण्याची सकारात्मक चिन्हे आहेत. कामाशी संबंधित काही समस्या येत असतील, तर त्या आता सुटण्याची शक्यता आहे.
कर्क – तुमची नेतृत्व क्षमता सर्वांना दिसून येईल. टीमसोबत मिळून काम केल्याने नवीन ओळख आणि आदर मिळू शकतो. भक्कम आर्थिक परिस्थितीमुळे समाधान मिळेल. संपत्तीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. हरवलेली, मौल्यवान वस्तू सापडल्याचा आनंदही अनुभवता येईल. नवीन वाहन खरेदी करण्याचे स्वप्नही साकार होताना दिसत आहे.
सिंह – नोकरदार जातकांसाठी दिवस खास असेल. आवडीचे काम मिळाल्याने उत्साह वाढेल आणि मेहनतीला सकारात्मक फळ मिळेल. नवीन लोकांना भेटणे फायदेशीर ठरू शकते. कामात स्पष्टता राखा. विरोधकांच्या प्रभावाखाली येऊ नका, ध्येयांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. एखाद्या सरकारी प्रकरणी चिंता निर्माण होऊ शकते, त्यामुळे ते त्वरित हाताळणे उत्तम.
कन्या – आजचा दिवस यश आणि समाधान दोन्ही घेऊन येईल. जुनी कर्जे फेडू शकाल, त्यामुळे आर्थिक बाबींसाठी आगाऊ नियोजन करा. कुटुंबात एखाद्या शुभकार्याची तयारी सुरू होऊ शकते, ज्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. दीर्घकाळापासूनची एखादी इच्छा पूर्ण झाल्याने मन आनंदाने भरून जाईल.
तुळ – दिवस करिअरसाठी शुभ आहे. अडकलेला पैसा परत मिळाल्याने दिलासा आणि आनंद दोन्ही मिळेल. एखादा रखडलेला प्रकल्प पूर्णत्वाकडे, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. गरजेनुसार कृतींचे नियोजन केल्यास यश मिळेल. संभाषणातून कौटुंबिक वाद मिटतील आणि नात्यांमध्ये आपलेपणाची भावना पुन्हा निर्माण होईल.
वृश्चिक – सभोवतालचे वातावरण आनंद आणि सकारात्मकतेने भरलेले असेल. इतरांशी जुळवून घेण्याच्या वैशिष्ट्यामुळे लोकांची मने जिंकाल. कोणाच्याही सल्ल्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे शहाणपणाचे नाही; स्वतःचे निर्णय स्वतः घेणेच उत्तम. काही अनावश्यक खर्च उद्भवू शकतात, परंतु कुटुंबाच्या पाठिंब्याने प्रत्येक समस्येचे निराकरण होईल.
हेही वाचा – संशय
धनु – प्रगती आणि यशासाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वाढलेल्या जबाबदारीमुळे प्रतिष्ठा आणि स्थान मजबूत होईल. पगारवाढीचेही संकेत आहेत. नवीन प्रकल्प सुरू करण्याआधी कुटुंब आणि भावंडांचा सल्ला अवश्य घ्या. अविवाहित जातक नवीन नातेसंबंध सुरू करण्याची शक्यता आहे.
मकर – सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाने भरलेला असा दिवस असेल. नवीन योजना आणि अभिनव उपक्रमांचा आनंद घ्याल. गरजू लोकांना मदत केल्याने मनःशांती मिळेल. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असाल, तर आदर मिळण्याची शक्यता आहे. भूतकाळातील चुकांमधून शिकून पुढे जाणे, हाच यशाचा मार्ग असेल.
कुंभ – नोकरीच्या ठिकाणी सभोवतालच्या लोकांपैकी काहीजण अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, सावध रहा. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणे टाळा, जाणकारांचा सल्ला घ्या. संततीकडून येणारी चांगली बातमी आनंद घेऊन येईल. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होऊ शकतात.
मीन – दिवस सन्मान आणि यशाचा आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील. सहकाऱ्यांचा पाठिंबा प्रत्येक कामात बळ देईल. अर्थात, आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण अगदी लहान गोष्टींमुळेही गैरसमज निर्माण होऊ शकतात. ऐकीव माहितीवर अवलंबून राहणे टाळा.


